Maharashtra IAS officer transfer .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात 'या' 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Marathi Politics Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्र राजकारण अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्य व देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात 'या' 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील मंगळवारी(ता.18) 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. यात त्रिगुण कुलकर्णी, राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपकडून पक्षप्रवेशाला स्थगिती, पालघर साधू हत्याकांड प्रकरणी कशिनाथ चौधरी यांचा खळबळजनक दावा 

भाजपकडून पालघर जिल्ह्यातील कशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. चौधरी यांच्यावर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. याच आरोपांवर त्यांनी आता माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणात केवळ एक साक्षीदार होतो,पण मलाच आरोपी करण्यात आले. यावेळी झालेले आरोप आणि टीकेमुळे कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचंही ते म्हणाले. तसेच आपल्याविरुद्धचं हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

तपासयंत्रणांचं मोठं यश, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भावाला लवकरच भारतात आणलं जाणार  

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्याकांड, तसेच अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला,यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. अनमोल बिश्नोईला भारत आणणे हे तपासयंत्रणांच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश आहे.

Ganesh Naik : बिबट्याच्या नियंत्रणासाठी तीन विभाग एकत्रितपणे काम करणार : गणेश नाईक

बिबट्याचे नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय वन्यजीव मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे, त्यामुळे भविष्यात त्यांची वाढ होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. या उपाय योजनांसाठी बिबट्यांना इंजेक्शन दिली जातील, तसेच इतरही उपाय योजना करण्यात येणार आहेत. तसेच बिबट्यांच्या नियंत्रणासाठी गरजेच्या सर्व गोष्टी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यात पोलिस प्रशासन, महसूल विभाग आणि वनविभागाला एकत्रित काम करण्याच्या विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Parth Pawar : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठे समितीकडून पार्थ पवार यांना क्लिनचिट

मुंढव्यातील जमीन गैरव्यवहाप्रकरणी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने पार्थ पवार यांना क्लिनचीट दिल्याची माहिती आहे. कारण या अहवालात कुठेही त्यांचे नाव नाही. मात्र, या व्यवहारात अमेडियन कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, या व्यवहारात पार्थ पवारांचे कुठेही नाव नाही, त्यामुळे त्यांना मुठे समितीकडून क्लिनचीट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Angar Nagar Panchayat Election : अनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाेलिस बंदोबस्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (ता. १८ नोव्हेंबर) छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली.

Local Elections : मुश्रीफ-घाटगेंच्या एकीची अधिकृत घोषणा

कागद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असल्याची अधिकृत घोषणा दोन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नगराध्यक्षपद मुश्रीफ यांच्या गटाला तर उपनगराध्यक्षपद घाटगेंच्या गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mahayuti News : उद्यापासून महायुतीतील पक्षप्रवेश थांबणार

महायुतीतील पक्षांतील नेत्यांचीच फोडाफोडी सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये मित्रपक्षातील नेत्यांना पक्षात न घेण्याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

BJP Politics : अद्वय हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील पक्षप्रवेश वाढले आहेत.

Mahayuti Politics : बावनकुळे शिंदेंच्या भेटीला

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहे. भाजप आणि शिवसेनेतील इन्कमिंगवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवरही बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, शिंदेंच्या शिलेदाराची जहरी टीका 

कागलमध्ये कट्टर राजकीय शत्रू राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एक आल्याने दोन्ही राष्ट्रवादी जिल्ह्यात दुसऱ्यांचा एकत्र आल्या. यानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी, मुश्रीफ यांना वाटतं की, आपल्याला आमदार राहायचं आहे. त्यामुळं प्रत्येकाला जवळ घेऊन त्यांच्यासोबत युती करायची आणि युती झाल्यावर वापरा आणि फेकून द्या हीच त्यांची नीती असल्याचे म्हटलं आहे.

शिंदेंच्या नेत्यांकडून मोक्काआरोपीला सपोर्ट? माजी नगरसेवक महेश पाटलांचा गंभीर आरोप करत भाजपमध्ये प्रवेश

कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे. मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला आमच्या पक्षातीलच लोक सपोर्ट करत आहेत. दोन दिवसांपासून मी प्रचंड दडपणाखाली होतो, असा थरारक खुलासा महेश पाटील यांनी केला असून, याच कारणामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणाही करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

शरद पवारांना धक्का? नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची शक्यता

दोंडाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या छाननी प्रक्रियेत मोठ्या घडामोडी समोर आल्या असून मंत्री जयकुमार रावल यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या मातोश्री नयन कुवर रावळ यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे बाद होण्याची शक्यता आहे. भावसार यांच्या कुटुंबीयांनी महानगर पालिकाचा कर थकवल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने अर्धा तासांची मुदत देत तांत्रिक अडचणी दूर करण्याची मुभा दिली आहे.

भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवाराचा विरोधी उमेदवारांच्या अर्जावर अक्षेप, न्यायालयात जाण्याचा इशारा

कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता जोरदार हालचाली सुरू झाल्या असून अर्ज पडतळाणीवरून भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी विरोधकांच्या अर्जात त्रूटी आणि अपूर्ण कागदपत्रे असताना देखील त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या त्रूटी दूर करण्यासाठी आता छाननीच्या वेळी त्‍यांना दोन तासाचा वेळ दिला जातोय, असा आरोप केला आहे. तर या चुकीच्या निवडणूक प्रक्रियेबाबत न्यायालयात दाद मागणार असल्‍याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दर्यापूर नगर परिषदेमध्ये दोन्ही जावा-जावा आमने-सामने

गेल्या आठ टर्म पासून विधानसभेच नेतृत्व करणारे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. आमदार पत्नी नलिनीताई भारसाकडे निवडणुकीत उभ्या असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान याच निवडणुकीत नलिनीताई भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदाताई भारसाकडे या काँग्रेस पक्षातर्फे उभ्या आहे. त्यामुळे निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. मंदाताई भारसाकडे यांच्या पतीचे दहा वर्षे पालनपोषण करूनही दिराने पत्नीला विरोधात उभा केल्याने आपल्याला वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया नलिनीताई भारसाकडे यांनी दिली आहे.

खेड नगरपरिषद निवडणुकीत युतीमध्येच राजकीय आखाडा, अखेरच्या क्षणी भाजप डाव टाकला

खेड नगरपरिषद निवडणुकीत युतीमध्येच राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता असून अखेरच्या क्षणी भाजपने आपल्याच मित्र पक्षाला खुले आव्हान उभे केले आहे. येथे भाजप नेते वैभव खेडेकर यांनी अपक्ष म्हणून आपल्या पत्नीला मैदानात उतरवलं आहे.

Washim Crime : जैन मंदिरात चोरी; 19 किलो चांदी,40 हजार रोख लंपास...

वाशिम कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक इथल्या श्री पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात मध्यरात्री चोरांनी चोरी केली. मंदिरातील चांदीची दोन मुकुटे, चांदीची छत्रे नऊ, चांदीचे तोरण ती, चांदीचे दिवे, यंत्रे आणि चोवीसी, असे एकूण 19 किलो चांदी आणि मंदिरातील दोन दान पेट्या फोडून त्यामधील 40 हजार रोख रक्कम चोरांनी चोरून नेली. धनज पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

NAXALISM Current Affairs : नक्षली नेता हिडमा व त्याची पत्नी ठार; छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर चकमक

छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात नक्षली नेता हिडमा व त्याची पत्नी ठार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच चकमकीत 6 नक्षली ठार झाल्याचे कळते. ही चकमक छत्तीसगड-आंध्रपदेश सीमेवर झाली.

Nashik Politics : येवला तालुक्यात शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार; संभाजी पवार चालले राष्ट्रवादीत

येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला मोठे खिंडार पडले. मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार हे आपले काका व माजी आमदार मारुती पवार यांच्यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.

Jalna Politics : परतूर नगरपालिका निवडणुकीसाठी NCP अजित पवार, शिवसेनाUBT अन् 'वंचित'ची युती

जालन्यातील परतूर नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. परतूर नगरपालिकेमध्ये भाजपला धोबीपछाड करण्यासाठी हे तीन पक्ष एकत्रित आले. महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहे.

Jalgaon Plitics : जळगाव महापालिका तीन प्रभागांमध्ये 'जैसे थे'; दोन ठिकाणी नव्याने आरक्षण

जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत त्रुटी राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने सुधारित प्रारूप सोडतीचे आदेश दिले होते. त्यानुसार 13 प्रभागांचा समावेश करून नागरिकांचा मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्ग महिला जागांसाठी प्रभाग 4, 6, 7, 8 व 17 मध्ये पाच जागांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. दोन प्रभागांत नव्याने हे आरक्षण निघाले; तर तीन प्रभागांत तेच आरक्षण निघाले. त्यामुळे तीन ते चार प्रभागांत सर्वसाधारण जागेत बदल झालेले आहेत.

BEED Update : पवनचक्की कंपनीकडून मनमानीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

बीडच्या चाकरवाडी शिवारात पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही विचारणा न करता उभ्या पिकात विद्युत पोल उभारण्यासाठी ऐन मधोमध दहा फुटांचे खड्डे करण्यात आलेत. शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे शेतकरी दहशतीत आहेत.

Accident : मद्यधुंद चालकाने ट्रकने 10 ते 12 दुचाकीस्वारांना उडवले

शहापूर तालुक्यातील किन्हवली इथं रात्री एक मद्यधुंद चालकाने ट्रक चालवून दहा ते बारा बाईकला धडक दिली. यात एका मुलाला देखील उडविले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी मुलावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाने पुढे हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये घातला. यामुळे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा ट्रक मुरबाडवरून नाशिकच्या दिशेने जात होता.

Latur Politics : औसा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीमधील भाजपविरुद्ध राष्ट्रवादीत सामना

लातूरच्या औसा नगर परिषद निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. महायुतीतील भाजपविरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशी थेट लढत औसा नगरपरिषद निवडणूक होईल. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांचे नातेवाईक परवीन शेख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर काल शक्ती प्रदर्शन करत भाजपने देखील डॉ. ज्योती बनसोडे यांना नगराध्यक्ष पदाच तिकीट जाहीर केलं आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Thane Congress Politics : चेतनसिंग पवार यांची ठाणे जिल्हा काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड

Thane Congress Politics

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी चेतनसिंग पवार यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण पद हे रिक्त झाले होते. काँग्रेसकडून ठाण्याच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंग पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडतील.

BJP Politics : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अनमोल म्हात्रेंचा समर्थकांसह प्रवेश

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुतीतील प्रमुख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत.

पुणे जिल्ह्यात नगरसेवक पदासाठी २ हजार ६७१ अर्ज

पुणे जिल्ह्यात ३९८ नगरसेवक पदासाठी जागांसाठी २ हजार ६७१ अर्ज दाखल तर नगराध्यक्ष पदाच्या १७ जागासाठी १९३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक अर्ज बारामतीत आले आहेत.

गणेश नाईकांच्या जनता दरबाराबाबत आज सुनावणी

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दराबरविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सिंधुदुर्गात जिल्ह्यात भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

सिंधुदुर्गात जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असून पक्षाकडून चारही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.

मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात हिरे यांचा पक्षप्रवेश होणार

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी अखेर ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात अद्वय हिरे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

Maharashtra Politics: नगरपरिषदा, नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची आज निवडणूक अधिकारी छाननी करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT