1995 च्या मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घोटाळा प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावर कोर्टाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर
कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीवर सुनावनी सुरु. कोकाटेंच्या मिळकतीवर कोर्टात युक्तीवाद सुरु. माणिकराव कोकाटेंची याचिका तसेच हस्तक्षेप याचिका दाखल करून घेण्याची तयारी हायकोर्टाने दाखविली आहे. या याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतली जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
माणिकराव कोकाटेंची याचिका तसेच हस्तक्षेप याचिका दाखल करून घेण्याची तयारी हायकोर्टाने दाखविली आहे. या याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतली जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टात त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. उपचार सुरू असल्याने काही दिवस तात्पुरता दिलासा मिळावा, अशी मागणी वकिलांनी कोर्टात केली. कोर्टाने लीलावती रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांची माहितीही सुनावणीदरम्यान घेतली.
माणिकराव कोकाटे यांचे वकील रविंद्र कदम यांच्याकडून मिळकतीची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री कोट्यातून घर घेताना असलेली आर्थिक परिस्थिती नंतर सुधारली. घर मिळाले त्यावेळची आर्थिक स्थितीप्रमाणे ते मिळाले. नंतर स्थिती सुधारल्याचा दावा कदम यांनी कोर्टात केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना नाशिकमध्ये कोर्टाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच कोर्टाने अटक वॉरंटही जारी केले आहे. या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी याचिका करण्यात आली आहे. सध्या कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकांमध्ये युतीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहेत. आज आमदार अनिल परब यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. जवळपास १० महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे समजते.
भाईंदरच्या पूर्वेकडील नागरी भागात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. मागील सात तासांपासून यंत्रणांकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. बिबट्या नागरी वस्तीत घुसल्याने घबराट पसरली होती. यादरम्यान सात जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी व अन्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाची साथ सोडत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. संदीप तिवारी यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर पक्ष प्रवेश करण्यासाठी गर्दी केली होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलण्यात यावे, असा अर्ज या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाकडे केला आहे. निकम हे राजकीय पक्षाशी निगडित असल्याने सुनावणी वर परिणाम होत आहे, असे आरोपींनी अर्जात नमूद केले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधुंची संयुक्त प्रचार सभा होणार असल्याची शक्यता आहे. संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमात मुंबई,नाशिक, ठाणे, पुणे येथे एकूण 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचार कार्यक्रमात दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपासाठी गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2017 साली जिंकलेल्या 84 जागांवर आपला दावा सांगितला. मात्र, भाजपने एकनाथ शिंदे शिवसेनेची ही मागणी सपशेल धुडकावून लावल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. आकडेवारीनुसार, ठाणे महापालिकेत 90 टक्के जागावाटप निश्चित, मीरा-भाईंदरमध्ये 95 टक्के, वसई-विरारमध्ये 90 टक्के, कल्याण-डोंबिवलीमध्ये 85 टक्के जागावाटप निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महायुतीच्या आधीच ठाकरे बंधूंचे जागावाटप पूर्ण होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर थोड्याच वेळात अँजिओग्राफी केली जाणार आहे. रुग्णालयात सध्या त्यांच्या मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झिज झाली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणीही केली. मात्र याबाबत सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्याने विठ्ठल मूर्तीचा वज्रलेप रखडल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान विठ्ठल व रूक्मिणी मूर्ती सुरक्षित असल्याचा दावा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं. काँग्रेसच्या मतांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडून आला, आतापर्यंत आमदारकी असेल किंवा खासदारकी, जे काय मतदान मिळालं ते काँग्रेसचे मत त्यांना ट्रान्सफर होत होते. मात्र काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फायदा होत नव्हता, हे आता काँग्रेसला समजलं. आपल्या मुळेच त्यांच्या जागा निवडून येत असल्याने काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळावर लढायचा घेतलेला निर्णय घेतला आहे, काँग्रेसचा हा निर्णय मला चांगला वाटतो, त्यामुळे काँग्रेसला माझ्या शुभेच्छा, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.
भाजपचा सांगली जिल्ह्यावर राग आहे, सांगली जिल्ह्यासाठी भाजप कोणताही निधी देणार नाही, फसवणूक करणारा पक्ष असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. दहा वर्ष भाजपचा खासदार होते. त्यावेळी निधी का, दिला गेला नाही? त्यामुळेच त्या खासदारांनी भाजप सोडली, असा आरोप देखील विशाल पाटलांनी केला आहे.
राजकारणामध्ये शब्द पाळण हे फार महत्त्वाचं असतं. काही लोक म्हणतात, निवडणुकीत आश्वासन हे चुनावी जुमला, प्रिंटिंग मिस्टेक मात्र कधी आम्ही ते म्हणणार नाही. आम्ही जे बोललो ते करणार आणि जे नाही होणार तेही केलेलं आहे, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप अन् काँग्रेसचं नाव न घेता केली.
काँग्रेसच्या ऍड. सीमा तेलंगे यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर गंभीर आरोप करत, आदिवासी कुटुंबियांना धमकविल्याचा आरोप केला आहे. उईके यांनी सूतगिरणीसाठी आदिवासी शेतकऱ्याची जमीन हडपली, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या कन्येला मंत्रिपदाचा वापर करून, मुंबई उच्च न्यायालयात 'ब' वर्ग समुपदेशकपदी नियुक्ती करून घेतली. याबाबत पत्र परिषद घेतल्याने मंत्री यांनी कुटुंबियांना धमकाविले आणि सोशल मीडियावर देखील धमकी वजा पोस्ट केल्,या असा आरोप सीमा तेलंगे यांनी केला. तर तेलंगे यांचे आरोप खोटे व बिनबुडाचे आहे, काँग्रेस दिशाहीन झाल्याने व नेत्यांना जनाधार न उरल्याने हे बेमालूम आरोप करत असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी केली.
इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याचीशक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशची आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून या बैठकीत महाविकास आघाडी सोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार आहेत. पक्षाकडून महाविकास आघाडीत लढताना २२ जागांचा प्रस्ताव तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पुण्यात आज महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काही जागांवर सेनेकडून प्रस्ताव दिला जाणार आहे. 22 तारखेला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. तर शिवसेनेला 25 ते 30 जागा भाजपकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांची आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच कोकाटे यांच्यावर पुढची कारवाई होणार असल्याची माहीती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.