म्हाडातर्फे महाराष्ट्र राज्य भाडेतत्त्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा सादर करण्यात आला आहे. उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी हितधारकांना रचनात्मक सूचना देण्याचे आवाहन केलं आहे. या धोरणाची चार तत्त्वे आहेत. यामध्ये परवडणारी, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुलभता याचा समावेश आहे. तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ, स्थलांतरित कामगार, महिला, प्रकल्पग्रस्त यांसह सर्व उत्पन्न गटांचा यात समावेश आहे.
यामध्ये 'स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल' विकसित करण्याचा प्रस्ताव असून भाडेकरू व्यवस्थापनापासून दस्तऐवजीकरणापर्यंत सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत. खाजगी विकासकांसाठी जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, विकास शुल्कात ५० टक्के सूट, टीडीआर, एफएसआय शिथिलीकरण अशा सवलतींचा प्रस्तावही यात आहे.
मालेगावच्या डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली. पीडित कुटुंबियांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा होईल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. दरम्यान, पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी चित्रा वाघ यांच्यासमोर टाहो फोडला
कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर आमचाच असा दावा शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून केला जातोय. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केडीएमसीमध्ये महापौर भाजपचाच होणार असं विधान केलं आहे. युती झाली तरी महापौर भाजपचा होणार. पक्षाची ताकद जास्त आहे, आमचे जास्त नगरसेवक निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे. युतीत लढलो तर महापौर महायुतीचा असेल आणि एकटे लढलो तर आमची ताकद संघटना आहे, त्यामुळे महापौर भाजपचाच होणार.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात खेम-सावंत राजे घराण्यातील श्रद्धा लखन सावंत भोसले निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. श्रद्धा सावंत भोसले या राजघराण्यातील आणि उच्चशिक्षित असून त्यांना भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. पहिल्या मुलाखतीतच त्यांना मराठी बोलता येत नसल्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. श्रध्दा सावंत भोसले या मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. लग्न करून सावंतवाडीत आल्यानंतर त्या सावंतवाडीकर झाल्या आहेत, त्या आपली संस्कृति शिकत आहेत. निवडणुका येतील जातील मात्र आमच्या जिल्ह्यातील माता-भगिनींची अशा प्रकारे बदनामी कोणी करू नये. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी श्रद्धा सावंत-भोसले यांची बाजू माडंली.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ 'छोटम' यांच्यासह एकूण 21 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या भोईर आणि त्यांच्या 21 साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. चोंढी येथील कम्प्युटर सेंटर संचालिका रूपाली थळे, त्यांचे पती विजय थळे आणि त्यांच्या नातेवाईकांवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांनी 25 आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटे पडले आहेत. पक्ष फुटतो की काय? याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. याच भितीपोटी त्यांचे नाराजी नाट्य सुरू आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी झालेली नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. पण सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असे अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी दीड तासापूर्वी नेरुळ पोलीस शिवतीर्थवर दाखल झाले होते. मात्र दीड तास वाट पाहुणही अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही.
केंद्र सरकारच्या महत्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता आज वितरीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मदत होणार आहे. योजना शेतकऱ्यांना निश्चित वार्षिक उत्पन्न सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत रु. 2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाते.
राज्यातले अनेक रुग्णालय प्रायव्हेट संस्थेच्या ताब्यात देण्याचा सरकारचा घाट असून अकोल्यातील सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलही प्रायव्हेट संस्थेच्या घशात घालण्याचे षडयंत्र सरकार आखत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. तर यासाठी आज मुंबईत आरोग्य अधिकाऱ्यांसह मंत्र्याची बैठक पार पडते, असाही आरोप त्यांनी केला आहे.
बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेने काँग्रेसला जोरदार दणका दिला असून काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती त्यांनी पक्षप्रवेश केलाय. संजय जाधव हे काँग्रेसचे सक्रिय नेते असून त्यांनीच काँग्रेसला हात दाखवल्यामुळे बदलापुरात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं बोललं जातंय.
लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला 15 हजाराचे मताधिक्य दिले. याच फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का? असा भावनिक प्रश्न शिवसनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपला केला आहे. सांगोला नगर पालिका निवडणुकीत भाजपने ऐनवेळी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून शिवसेने विरोधात दंड थोपटले आहेत. त्यावर बोलताना शहाजी बापू पाटील यांनी हे भाष्य केलं आहे.
सातारा नगरपालिकेत निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदानाच्याआधीच महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. येथे प्रभाग क्रमांक 13 मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून रुपेश विलास गौंड यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी घेतली निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता धुसर झाली असून शिवसेना आणि भाजपने अर्ज भरल्यानंतर आता प्रचार सुरू केला आहे. तर येथे महायुती होईल असा विश्वास शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. जर येथे युती झाली तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष आदेशाप्रमाणे अर्ज मागे घ्यावेत. पण आदेशानंतरही जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत सामंत यांनी दिले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात मोठा हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आहे. तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केल्याचा आरोप राणांनी केला आहे. दरम्यान, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीमध्येच होता असा देखील दावा त्यांनी केला.
अहिल्यानगर (कोपरगाव) येथे शिवसेनेने (शिंदे गट) मोठी राजकीय ताकद दाखवली आहे. कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि उबाठा गटाचे सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. यामुळे कोपरगावमधील उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेनेची ताकद वाढली आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील जिल्हा निवडणूक प्रभारींची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा आढावा, जिल्हानिहाय तयारी आणि पुढील निवडणूक धोरणावर सविस्तर चर्चा झाली. पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यावर आणि निवडणूक तयारीला गती देण्यावर भर देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
राज्यात बिबट्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे वनविभाग आणि राज्य सरकार उपाययोजनांसह सज्ज झाले आहे. बिबट-माणूस संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदी, रेस्क्यू सेंटर यांसह व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र वाढती बिबट्यांची संख्या ही या मोहिमेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
पुण्यातील डेक्कन परिसरात मध्यरात्री 'कोयता गँग'ने अनंत रेस्टॉरंट अँड बारवर दरोडा टाकला. मास्क घातलेल्या चार जणांनी बारमध्ये घुसून राडा केला आणि रोख 20 हजार रुपये पळवले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
50 टक्केच्यावर आरक्षण नको, असा कोर्टाचा आदेश असताना अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदेने आरक्षण 75 टक्के ओलांडले आहे, त्यामुळे चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 20 नगरसेवकापैकी 15 जागेवर आरक्षण काढले आहे.
Devendra Fadanvis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा 22 नोव्हेंबरपासून त्यांचा प्रचार दौरा सुरु होणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री प्रचार सभा घेणार आहेत.
नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा दिला आहे. नगरपालिका अध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील व्यक्तीला देताना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान आहे, त्यामुळे राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते हसन मुश्रीफ यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू आघाडीबरोबर युती करण्याचा निर्णय घाई गडबडीत घेतल्याने त्यांनी ही माफी मागितली आहे.
पुण्यात पेट्रोल पंपावर काम करणाफ्या कर्मचाऱ्यांवर मागील काही दिवसातून हल्ले होत आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
बिहारचा निवडणुकीचा निकाल बघितला तर लोकांची फसवणूक करून, निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजर दाखवून निवडणूक जिंकल्या जातात हे दुर्दैव आहे. लोकांनी मात्र आपलं कोण आपल्या अडचणीला कोण समजून घेतंय हे ओळखणे गरजेचे आहे, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर टीका केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपालिकेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला. वंचितचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ६ नगरसेवकांचे अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता या उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) अध्यक्षपदी पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्याची (IAS) नियुक्ती करण्यात आली आहे. यशदा येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री जोरदा राडा झाला. उमेदवारी अर्जाची छाननी होती. यावेळी रात्री उशिरा भाजपा नेते योगेश क्षीरसागर नगरपालिकेबाहेर आले असता त्यांच्यासमोरच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे एमआयएम आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यातील वारजे येथे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याचे नागरिकांनी समोर आणून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावत पथ विभागाच्या दोन अभियंत्यांवर त्यांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.