Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव द्या, अन्यथा भव्य मोर्चा काढणार

Sarkarnama breaking Updates : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी रिक्त जागांसाठी आज मतदान, माणिकराव कोकाटेंची अटक टळली यासह19 डिसेंबर रोजीच्या विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव द्या, अन्यथा भव्य मोर्चा काढणार 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली आहे.या मागणीसाठी आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि मागणी पूर्ण होईपर्यंत मुंबईतून न हटण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सांगितले. 

मोठी बातमी: भाजप नेते आशिष शेलार अन् उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट

राज्याचे सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मीरा रोड येथे भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यात मुंबई महानगरपालिकेसह मीरा-भाईंदरच्या निवडणुकांबाबतची महायुतीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मतदारांना तीन तास डांबून ठेवलं; नांदेड जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान मतदारांना तीन तास डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये मंगल कार्यालयात शेकडो मतदारांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचे आमिष दाखवून डांबल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.

नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, नेमकं कारण काय?

नांदेडमधील धर्माबादमध्ये नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून बोगस मतदानाचा आरोप करण्यात आली. सध्या याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. हा प्रकार प्रभाग क्रमांक १ मधील फुलेनगर येथील मतदान केंद्रात घडला असून बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत रचीता गौड जंगमपल्ली आणि एका पुरुषाला जमावाने मारहाण केली. रचीता या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिता गौड जंगमपल्ली यांची मुलगी आहे.

अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी? नेमका प्रकार काय?

आयोगाच्या ईव्हीएम हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे 'बोगस' आयकार्ड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन उमेदवारांनी आक्षेप घेतला असून हे अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. इथल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने नवीन मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चक्क बोगस ओळखपत्रे आढळली. या आयकार्डवर फोटो, नाव आणि अधिकाऱ्यांचे शिक्के नसल्याने सर्वच उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. या गोंधळामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालें होतं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रीया 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवर सुरक्षितता, पारदर्शकता व शिस्तबद्धता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

बारामतीतील ढवाणवस्ती मतदान केंद्रावर आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर, मतदान एकाचे केलं दुसऱ्यानचं

निवडणुकीतील गोधळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. आयोगाचा आणखीन एक गोधळाचा कार्यक्रम समोर आला असून बारामती ढवाणवस्ती येथील मतदान केंद्रावर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. येथे एक मतदार मतदानाला गेल्यानंतर त्याच्या जागी दुसरच कोणीतरी मतदान करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उलट आयोगाने मतदाराला मतदाना करण्यापासून वंचित ठेवले आहे.

राजकीय क्षेत्रात शोककळा! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्यांनी माहिम येथील राहत्या घरी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

योग्य जागावाटपासाठी तटकरे फडणवीसांना भेटणार

मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीत जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात योग्य वाटा मिळावा, अशी मागणी करणार आहेत.

Laxman Dhoble : मंगळवेढ्यात मताला सहा हजारांचा भाव; माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा आरोप

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून पैसे वाटप झाले आहे. मताला पाच हजार, सहा हजार रुपये, सात हजार रुपये वाटले आहेत. दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांनी मताला सहा हजारांचा रेट काढण्यात आलेला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला आहे.

Ashish Shelar : तटकरेंनंतर आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Phulambri : फुलंब्रीमध्ये मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचा प्रकार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये मतदान केंद्राबाहेबर जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. फुलंब्रीमधील भारतमाता मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचा हा प्रकार घडला असून त्या ठिकाणी काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळले आहे.

Sanjay Raut : संजय राऊत हे राज ठाकरेंना तीन दिवसांत दोनदा भेटले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी भेट आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे, त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे.

BJP MLA : भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली

मुंबईतील घाटकोपर येथे भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षाचालकाच्या कानाखाली आवाज काढला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे आमदार शाह यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Manikrao Kokate : आमदारकी वाचविण्यासाठी माणिकराव कोकाटे आता सुप्रीम कोर्टात जाणार

सदनिकेच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला स्थगिती द्यावी, यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने कोकटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आता कोकाटे हे आमदारकी वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.

Congress : काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार : पक्षाचे प्रभारी चेन्निथला यांची घोषणा

काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिका अखेर स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यावर अखेर चेन्निथला यांच्या घोषणेने शिक्कामोर्तब केले आहे.

"पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ! आबा बागुलांचा 'हात' सुटला; आता हाती शिवबंधन

पुणे येथे काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी आज शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करून नवी राजकीय वाटचाल सुरू केली.

वसमत नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना  EVM बंद पडल्याने गोंधळ

वसमत नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 15 मधील लिट्ल इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर EVM बंद पडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मॉकपोल दरम्यान मशीन मधील बटन दाबत नसल्याने हा गोंधळ झाला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ मशीन बदलल्या असून आता या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे.

भाजप प्रवेशासाठी संजोग वाघेरे मुंबईत

उद्धव ठाकरेंनी मावळ लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी दिलेले आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहा. यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत.

आसाममध्ये रेल्वेच्या धडकेत आठ हत्तींचा मृत्यू

मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीला जाणाऱ्या ‘राजधानी एक्स्प्रेस’ रेल्वेच्या धडकेत आठ हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या धडकेत एक हत्ती गंभीर जखमी झाला आहे. आसाममधील होजाई जिल्ह्यात ही घटना घडली. तर हत्तींच्या कळपाला धडक दिल्याने रेल्वे इंजिन व पाच डबे रेल्वे रूळावरून घसरले आहेत.

भाजपने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास राष्ट्रवादीसोबत युतीची तयारी - हेमंत पाटील

भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा भाजपला दिला आहे. शिवाय भाजपने चांगला प्रतिसाद न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आला असून भाजपने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास राष्ट्रवादीसोबत युतीची तयारी असल्याचंही हेमंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

अंबरनाथमध्ये तब्बल 208 संशयित बोगस मतदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अंबरनाथमध्ये पोलिसांनी सुमारे २०८ बोगस मतदारांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. भाजप व काँग्रेसकडून काल रात्री २०० बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संजोग वाघेरे पाटील हे आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा प्रवेश होणार असून पिंपरी गाव येथून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

बारामतीत मतदानाला प्रतिसाद

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सकाशी 7.30 वाजता सुरुवात झाली. 41 जागां पैकी 34 जागांसाठी आज मतदान होत आहे. आठ जागा या बिनविरोध निवडणूक आल्या आहेत. सकाळपासूनच मतदानासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

ऑपरेशन लोटस यशस्वी, 22 जण भाजपात

आज पुण्यातील तब्बल 22 नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी नगरसेवक राहुल कलाटे, वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संजोग वाघेरे, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल त्यांचे पुत्र हेमंत बागुल तसेच सध्या राष्ट्रवादीत असलेले विकास दांगट, सायली वांजळे यांचा समावेश आहे.

मालेगाव पालिका राष्ट्रवादी भुजबळांच्या नेतृत्वात लढणार

मालेगाव महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात लढणार आहे. रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखीत पार पडणार आहेत या मुलाखती समीर भुजबळ यांच्या उपस्थित होणार आहेत.

निवडणुकीमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीकरिता शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जेथे निवडणूक आहे तेथे ही सुट्टी लागू होणार आहे. जिल्ह्यातील बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदेच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.

अंबरनाथ, फलटण, बारामतीसह 23 नगरपरिषदांसाठी आज मतदान

अंबरनाथ, फलटण, बारामती नगरपरिषदेसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT