महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून बाहेर आले असून वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या भूमिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि मनसेच्या आघाडीवर वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी याबाबत चंद्रपुरमध्ये बोलताना असे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात, असे सांगत सावध भूमिका घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आता रंग चाढताना दिसत असून उमेदवार आपल्या प्रचारात जोरदार टीका करताना दिसत आहेत. दरम्यान लोणावळ्यात भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याने अजितदादांच्या आमदारावर टीका करताना बेताल वक्तव्य केलं तेही भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ समोर असताना यामुळे आता याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुरेखा जाधव या महिला नेत्याने माळवचा आमदार आपला नसला तरी त्यांचा बाप आपला मुख्यमंत्री आहे असे विधान केलं आहे.
नांदेडच्या लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या वतीने सहा उमेदवार देण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांचे इतर सगळे पाच नातेवाईक आहेत. यावर नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, निवडून येण्यासाठी एक गणित धरलं जातं एखाद्याचं आडनाव पवार आहे आणि पवार नावाचे सहा उमेदवार दिले तर ते एकाच परिवारातील होत नाहीत. मेरिटमध्ये, सर्वे मध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा खुलासा अतुल सावेंनी केलाय.
संगमनेर नगरपरिष निवडणुकीत शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती विरुद्ध सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वातील संगमनेर सेवा समिती ही स्थानिक आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहे. आमदार तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून यापूर्वी सत्यजीत यांच्या आईने अनेक वर्षे संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशीच वडिलांची तब्येत बिघडल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्यांना सौम्य अटॅक आल्याचे समोर आले आहे. तर आता त्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून एक ते दोन दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे.
बारामती नगरपालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे, चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी केला. जे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे असंही युगेंद्र पवार म्हणाले. तसेच आमच्याविरोधात मोठी शक्ती आहे असं म्हणत युगेंद्र पवारांनी अजित पवारांकडे बोट दाखवलं.
मोहोळमध्ये पंडित देशमुख यांची संतोष देशमुख यांच्यापेक्षाही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले. त्यात माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील हा मुख्य तर इतर एकूण 13 आरोपींना निर्दोष सोडण्यात आले होते. पोलिसात ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली ते कोर्टात फुटले होते. त्यातील साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर, सोलापुरात गाळे देण्यात आले आहेत, त्याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली. दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाराणी वाडकर यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदासह सर्व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राजू शिंदे यांचा प्रवेश झाला तेव्हाच वाडकर यांचाही प्रवेश होणार अशी चर्चा होती. पण तेव्हा तो लांबला होता. आज भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी शिल्पाराणी वाडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला.
सुंस्कृत राजकारणाचे बोट सोडलेल्या भाजपने अनैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. विरोधकांना कोर्ट कचेऱ्यात गुंतवून भाजप सोयीचे राजकारण करत आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपने अत्यंत चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. भाजपने आणलेला फोडाफोडीचा नवा ट्रेंड लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घातक असल्याचेही त्या म्हणाल्या.
अर्थमंत्री असलं म्हणजे काय झालं? राज्याची सगळी तिजोरी तेच लुटून नेऊ शकतात आणि त्यांनाच सगळे अधिकार संविधानानं दिले असे नाही. मतदान मागत असताना विकासाच्या नावानं मागा ना. विकास काय... विकासात भ्रष्टाचाराची जास्त साथ आहे. विकासाचं नाममात्र चित्र तिथं दिसत आहे. एकीकडे फडणवीस येऊन सांगतात की, मी मुख्यमंत्री आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सांगतात की मी उपमुख्यमंत्री आहे. या लोकांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत का? अशा शब्दात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यासह महायुती सरकारवर टीका केली.
विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यामुळे सांगोल्यामध्ये आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदेंचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा शेकापच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर आरोप केला आहे.
ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर हे काही दिवसांतच संतोष बांगर की जय म्हणतील, असे विधान आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. त्याला खासदार अष्टीकर यांनी प्रत्युतर दिले आहे. संतोष बांगर हे काहीही बोलत असतात. त्यांच्या बेताल वक्तव्याला काही लगाम नसतो. ते काय बोलतील याचा काहीही भरोसा नसतो. मी उद्वव ठाकरेंसोबत खुश आहे. माझ्या पक्षनिष्ठेला बांगरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. जे आदल्या दिवशी रडतात आणि दुसऱ्या दिवशी पळून जातात, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेबाबत सांगू नये. जुळवाजुळवीचं गणितं चालू झाली तर संतोष बांगर हेच पहिले भाजपमधील जातील किंवा ठाकरे सेनेत येतील, असे अष्टीकरांनी म्हटले आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले, हे ठीक आहे. पण त्यासाठी सर्व गोष्टींचा वापर करण्यात आला. आमच्या काही उमेदवारांना वीस वीस लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला. वीस लाख रुपये हे सामान्य घरातून आलेल्या आमच्या उमेदवारांसाठी मोठी रक्कम आहे. एवढ्या मोठ्या रकमेपुढे कोणीही दबावाला बळी पडतात. तसे आमचे दोन उमेदवार अमिषाला बळी पडले आणि एक दोघांवर प्रचंड दबाव आणला गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवलीचे मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना भोईर म्हणाले, मी दोन हजारमध्ये जेव्हा राजकारणात आलो, तेव्हाही माझ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे. आताही विषय झाला तर माझे कार्यकर्तेच निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनीच मला आतापर्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढलेले आहे. ती मग अपक्ष उमेदवारी असो किंवा मनसेतून लढाई असू. हे सर्व कार्यकर्त्यांनी केलेले आहे. कार्यकर्ते हेच नेत्याचे कान, नाक, डोळे असतात, त्यामुळे कार्यकर्त्यांना सोडून मी निर्णय घेऊ शकत नाही.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री म्हणून काम पाहत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रचंड प्रमाणात बिघडली आहे, त्याला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. लोंढा यांना धमकी देणाऱ्या अस्लम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा आज सांगली होणार होता. मात्र, त्याआधीच तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी विवाहसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यावर पंकजा मुंडे यांनी पोलिसांनी योग्य तो तपास करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनंत गर्जेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीचा छळ सुरू होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांकडून अनंत गर्जेचा शोध घेतला जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी अमित ठाकरे नेरूळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर ते पोलीस ठाण्याकडे रवाना झाले.
मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झालेत. नेरुळमधील शिवस्मारकाचं अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याची नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. 'शिवसेना एक संघ आहे आणि एक संघ राहील, कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही,' असे ते म्हणाले.
पणदेरी धरणाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हणाले, “मी इथून तीस वर्षे हलत नाही; दापोली मतदारसंघाचा विकास पूर्ण होईपर्यंत माझी जागा अढळ आहे”
माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांचे पती मनोहर बेहनवाल यांना बेदम मारहाण करण्यात आली. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याकरिता नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, मात्र स्थानिक निवडणुकीत त्यांनी वेगळी चूल मांडली आहे, तासगाव नगर परिषदेसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे.स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढत आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडेचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. मात्र, ही आत्महत्या नाही तर हत्या असा आरोप तरुणीच्या कुटु्ंबीयांनी गर्जे कुटुंबावर आत्महत्या केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुलीचे कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईतील नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. तसंच ते यावेळी शिवस्मारकाचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी ते नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहेत.
स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून माजी खासदार संजयकाका पाटील हे तासगाव नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहेत. यासाठी त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे.
एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या बिलाल चौधरीला मुंबई पोलिसांनी अटक केली.विठ्ठलवाडी उल्हासनगर येथून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. ज्यांनी आयुष्यभर फक्त टक्केवारी गोळा केली त्यांना उठता बसता फक्त टक्केवारीच दिसते, त्यांनी सांगितलेली कामं न झाल्याने बहुतेक त्यांची टक्केवारी बुडाली असेल, असं गोरे म्हणाले.
आमच्या नेत्यांकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारी जमिनी लाटणाऱ्या माफियांकडे, मंत्रालयातल्या आपल्या कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या. अजित पवारांचे चिरंजीव हजारो कोटींच्या सरकारी जमिनी नावावर करून घेत आहेत, तिकडे लक्ष द्या नाहीतर महसूल मंत्रीपद ही कोणीतरी नावावर करून घेईल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.