शिवसेना-भाजपची जवळपास 210 जागेवर सहमती झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण यामध्ये अजूनही 17 जागेच्या तिढा कायम आहे. यासाठीच रंगशारदा या ठिकाणी युतीची बैठक होणार आहे. बैठकीला सेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे व मिलिंद देवरा उपस्थित राहणार तर भाजपकडून आशीष शेलार, अमित साटम व प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. आज हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये यादीवर शेवटचा हाथ फिरवण्यात आल्याची माहितीही साम टीव्हीच्या सुत्रांकडून मिळते आहे.
काँग्रेससोबत आमची आघाडी झालेली आहे. आम्ही 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. जागावाटपाबद्दल अंतिम चर्चा सुरु आहे सगळीकडे आमचे उमेदवार अर्ज भरत आहेत, अंतिम चर्चेनुसार कुठले उमेदवार फायनल करायचे हे ठरवू असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. आम्ही सगळीकडे ताकद लावत आहोत. मुंबईत आम्ही 25 ते 30 जागा लढवण्याच्या विचारात आहोत पण आम्हाला किती दिल्या जातात ते पाहू असे जानकर म्हणाले.
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा आणि निर्णायक बदल झाला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर निश्चित झाली आहे. या युतीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व 90 जागा लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप-शिंदेंसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये जागावाटपाचा फार्म्युला निश्चित झाला आहे. भाजप १४० जागांवर, तर शिवसेना ८७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, ‘आमची शिवसेनेसोबत युती आहे, आता फक्त जागा वाटपाबाबतच तुम्हाला सांगायचे राहिले आहे,’ असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अभिषेक घोसाळकर यांचा फोटो तेजस्वी घोसाळकर यांनी वापरू नये, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर तेजस्वी घोसाळकर यांनी भाष्य केले आहे. मी प्रत्येकाला उत्तर देणार नाही. ज्यांना जे बोलायचं आहे, ते बोलू द्या. योग्य वेळ आली की उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
परभणी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहे. युतीमध्ये आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा घेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
माजी महापौर प्रशांत जगताप हे समविचारांच्या लोकांसोबत राहिले आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद आहे. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आले असते तर आणखी आनंद झाला असता. त्यापेक्षा जास्त आनंद ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहिले असते तर झाला असता, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहीर यांनी विधान केले आहे.
खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. काळोखे हे शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होत. काळोखे यांची आज सकाळी हत्या करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी पक्षाची ताकद वाढल्याचा दावा करत सन्मानपूर्वक युतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. '२०२५ मध्ये परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे समसमान जागावाटप व्हावं,' अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भाजपने काही जागा जास्त घेतल्या तरी हरकत नाही, पण युती सन्मानपूर्वक व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या २६ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. "सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस त्या पक्षात राहिलो, कधीही गद्दारी केली नाही," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पुण्याच्या ट्रॅफिक जॅम आणि गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणास भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. "माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे," असे सांगत त्यांनी काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या भाषणात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचेही आभार मानले.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत आता रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार आहे. रेल्वे मार्गात महत्त्वाचे बदल करण्यसाठी अनेक प्रकल्पांची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी १८,३६४.९४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत त्यांनी हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले. उद्धव-राज युती ही केवळ स्वार्थासाठी असल्याचा टोला लगावत फडणवीसांच्या भूमिकेची आठवण करून दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चव्हाण मुंबईकडे रवाना झाले. कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि पनवेल महापालिका युतीबाबत, चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असून, काही जागांवर मैत्री पूर्ण लढतीची दोन्ही बाजूने तयारी सुरू आहे. एकाच आठवड्यात रविंद्र चव्हाण आणि शिंदे यांची तीन वेळा भे झाली.
जळगावात अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत 26 जागांवर महापालिका निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. भाजपकडून राष्ट्रवादीला केवळ चार ते पाच जागांचाच प्रस्ताव दिल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी दिली. महायुतीत जागांबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आमदारांची मनधरणी करण्याचा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून प्रयत्न आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार अनिल पाटलांसोबत तब्बल तीन तास चर्चेनंतरही जागांबाबत तोडगा निघाला नाही.
नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे.प्रभागात ज्या पक्षाचा ताक़दवान उमेदवार ती जागा त्या पक्षाला सुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच आहे. मिरजेतल्या दिग्गज नगरसेवकांच्या प्रवेशानंतर सांगलीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या नगरसेवकांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत सांगलीतल्या विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत भोसले, स्नेहन सावंत आणि भाजपाच्या नसीमा नाईक यांचा समावेश आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 27 गावांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मोठा आणि आक्रमक निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी 27 गावांतील निवडणुकीवर बहिष्कार घालावा, असे आवाहन समितीने केले आहे. समितीने स्पष्ट इशारा दिला असून, या निर्णयाला डावलून कोणीही निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली, तर समिती सक्रिय आणि कठोर भूमिका घेईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे केडीएमसीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाड नगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसेनेचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांचा माणगाव कोर्टाने 2 वेळ आणि मुंबई कोर्टाने 1 वेळा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाड नगरपालिका निवडणुक मतदानाच्या दिवशी झालेल्या या राडा प्रकरणी विकास गोगावले यांच्यासहित एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी मारहाण, वाहनांची तोडफोड, शस्त्र बाळगणे, अशा गुन्ह्याखाली महाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तरी निवडणूक घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली पाहिजे, असं मत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, 'घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलोय. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिलेत. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा, काय होता तू काय झाला तू, बरबाद झाला तू...'
छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या शिवसेना आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. यासाठी संध्याकाळी ६ वाजता क्रांती चौकातून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ठाकरेंच्या सेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मनसेतून बाहेर पडलेल्या प्रकाश महाजन यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी 12.30 वाजता ठाण्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.