महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
सांगलीच्या राजकारणात आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचे पुत्र व खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटलांची एंट्री झाली आहे. हर्षवर्धन पाटील हे आता सांगली महापालिका निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे प्रतीक पाटील यांचे मोठे पुत्र आहेत. पुणे एमआयटी मधून शिक्षण घेत थेट इंग्लंडमधून एमएस शिक्षण पूर्ण करून हर्षवर्धन पाटील आता थेट सांगलीच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत.
अमरावती इथल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना व युवा स्वाभिमान पार्टी या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच पुन्हा रखडले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत येणार आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी चार वाजता अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
देशभरात चांदीचे भाव दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक वाढत आहेत. खामगाव इथला प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीचा आजचा भाव हा 2,63,000 रु GST सह प्रति किलो झालेला आहे. आज वरचा हा सर्वात उच्चांकी भाव असल्याचं चांदीचे व्यापारी सांगतात. जगभरातील राजकीय परिस्थिती व विकसित देशांमध्ये लागलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे हा भाव सातत्याने वाढत असल्याचं जाणकार सांगत आहेत. 1 जानेवारी 2025ला प्रतिकिलो 90 हजार 500 रुपये असलेला चांदीचा भाव आज उच्चांक वाढला आहे.
बीडच्या नेकनूर इथल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा वाद धुसफूसत होता. काल दुपारी 12 वाजता दोन्ही बाजूच्या गटातील 30 ते 40 लोकांकडून अहमदपूर-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर एकमेकांना लोखंडी पाईप, लाठ्या-काठ्या आणि दगडाने बेदम मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेत 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. अद्याप पोलिसात कुठलीही तक्रार दाखल झालेली नसून काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.
बारामतीतील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी बारामती आले आहेत. ते नुकतेच बारामती विनातळावर दाखल झालेत.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा उत्सव व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.यामध्ये दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहर पोलिसांकडून पुढील पाच दिवस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.
महायुतीत जागावाटप संदर्भात मॅरेथॉन बैठका होऊनही अद्याप घोळ मिटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर मंत्री मुश्रीफांनी घटक पक्षाला घाम फोडत समानधारक जागा घेत तोडगा काढल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून भाजप ३५, शिवसेना ३२ आणि राष्ट्रवादी १४ जागा घेत असल्याची माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पुणे शहरातील 41 प्रभागांमध्ये असलेल्या 41 उमेदवारांचा प्रस्ताव दिला होता. मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये 50-50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. तर जिथे भाजपविरोधात मविआला उमेदवार सापडत नाही तिथे आम्हाला स्थान दिलं जातंय, त्यांच्या या खेळीला आम्ही बळी पडणार नाही, त्यामुळे सध्या तरी आमच्यात कुठलीही युती नाही असं वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी सांगितलं आहे.
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आज बारामतीत येणार आहेत. त्यांच्या हस्ते बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला जेष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार उपस्थित असणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. पहाटे पाच वाजता त्यांनी बारामतीतील बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करता येतील, यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.