Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live : महायुतीतील मित्र पक्षासह विरोधकाकडून चक्रव्यूववात अडकवण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण

Marathi Politics Headlines Updates: आज शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजीच्या राज्यासह देशभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

Roshan More

ashok Chavan : जनता मला या चक्रव्यूवातून बाहेर काढेल

महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकाकडून मला चक्रव्यूवात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण मला विश्वास आहे, जनता मला या चक्रव्यूवातुन बाहेर काढेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. नांदेड येथील एका कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

Political News : संगमनेरमधील व्यापाऱ्याला दिली धमकी

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच आता शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात अमोल खताळ यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अमोल खताळ यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

Nilesh Rane : रवींद्र चव्हाण यांचा आमच्या कुटुंबावर वैयक्तिक राग दिसतोय : नीलेश राणे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्गात महायुती नको होती. त्यांना रत्नागिरीत युती चालते. पण सिंधुदुर्गा युती का नको, याची कारणं तरी सांगितली पाहिजेत ना? पण त्यांचा सिंधुदुर्ग, आमच्या कुटुंबावर रवींद्र चव्हाण यांचा राग दिसतो आहे. कारण त्यांचं वैयक्तिक भांडण वाटतं. कसंही झालं तरी नीलेश राणेंना आणि आमच्या उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप आमदार नीलेश राणे यांनी केला.

Girish Mahajan : गिरीश महाजनांचे आक्षेपार्ह विधान; ‘थकून भागून घरी गेला तर नवरा बायको मच्छरदाणीत झोपा’

बांधकाम कामगारांना पेट्या मिळाल्या का? त्यात काय काय आहे. बांधकाम कामगारांना ग्लोज दिले आहेत, त्यांना गमबूटही दिले आहेत. तसेच मच्छरदाणीही दिली आहे. थकून भागून घरी गेला तर नवरा बायको मच्छरदाणीत झोपा, असे आक्षेपार्ह विधान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

Devendra Fadnavis : तीन चार वर्षांपूर्वी मला जास्त केस हेाती; आता ती कमी झालीत : फडणवीस

समीर कुणावार यांचं मनापासून अभिनंदन करेन. आम्ही जेव्हा वर्धा जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय केला. त्या वेळी जोपर्यंत मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करत नाही, तोपर्यंत समीरभाऊंनी आमचा पिच्छाच सोडला नाही. तुम्ही बघा तीन ते चार वर्षांपूर्वी मला जास्त केसं होती. पण आता कमी झाली आहेत, ती समीरभाऊंमुळेच कमी झाली आहेत, असे मजेशीर विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Dhananjay Munde : ज्याच्यामुळे माझं घर फुटलं, त्यानेच माझ्याशी बेईमानी केली : धनंजय मुंडे

माझा एक साथीदार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासाठी मी सगळं कामधंदा सोडून त्याच्याकडे गेलो. त्याचा जीव वाचला. तो माझ्याशी बेईमानी करू शकतो, तर तो जनतेसोबत काय इमानदार राहील. ज्याच्यामुळे माझं घर फुटलं, त्यांनीच आता माझ्याशी बेईमानी केली तर मी काय बोलणार. त्यांच्यावर काय बोलावं, त्यांनी तर मंदिरालाही सोडले नाही, असा आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.

Ram Khade : राम खाडेंच्या पत्नीचा सुरेश धसावर गंभीर आरोप; हल्ले सुरेश धसच घडवून आणत आहेत

राम खाडेंवर यापूर्वी पंचायत समिती आणि आष्टीमध्ये दोनदा हल्ले झाले आहेत. खाडे हे गैरव्यवहार बाहेर काढत होते, त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला घडवून आणले जात आहे. या हल्ल्यामागे आमदार सुरेश धस हेच आहेत. त्यांनीच हल्ल्याची ही घडवून आणली आहे. सुरेश धसांचे गैरव्यवहार बाहेर काढत असल्यामुळेच ते राम खाडेंवर हल्ले करत आहेत. यापूर्वी आमची बोलेरोही जाळण्यात आली आहे, असा आरोप राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी केला आहे.

Ahilyanagar Update : मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 व 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर

नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकी अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना 1 व 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत.

Eknath Shinde : म्हणून लाडक्या बहीण योजनेचा जन्म!

"मी गरिबी पाहिली आहे. आईची, पत्नीची गरिबी पाहिली आहे. म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कोणीही मायका लाल आला, तरीही लाडकी योजना बंद होणार नाही. छोट्या योजनांमधून बहिणींना लखपती करायच्या आहे," असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या येवल्या इथल्या सभेत केले.

OBC reservation : भाजप सरकारकडून ओबीसी समाजाची फसवणूक; काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची टीका

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला, तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना, 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण 50% च्या वर गेले आहे, त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपने ओबीसी आरक्षणासंदर्भातील केलेले सगळे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. ही सपशेल बनवाबनवी आहे, अशी टीका काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली.

BJP Ravindra Chavan : भाजपच्या रवींद्र चव्हाणांकडून 2 तारखेचा पुनरूच्चार

मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी रोख रक्कम पकडून दिल्यानंतर 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अकोल्यात बोलतांना पुन्हा 2 तारखेला सांगेल, असं म्हटलं आहे. त्यामुळे 2 तारखेची राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे. आज नाही, 2 तारखेपर्यंत थांबा. त्यामुळं 2 तारखेचा चमत्काराबद्दल काय? याबद्दल रवींद्र चव्हाण दोन तारखेला काय बोलणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Pimpri Chinchwad Politics : 'टॅक्स पावत्या बनवताना चुका होत नाही, मग मतदार याद्यात कशा चुका होतात?'

टॅक्स पावत्या बनवताना चुका होत नाही, मग मतदार याद्या बनवताना चुका कशा होतात, असा सवाल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरपीआयच्या माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे यांनी केला आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र निडवूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका आहेत.

RPI Politics : आरपीआयची भाजपकडे 15 जागांची मागणी

आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने 15 जागेची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी पाच प्रमाणे 15 जागेची मागणी आरपीआयने भाजपकडे केली आहे.

Navneet Rana : राम मंदिरावर बोट दाखवेल, त्याची बोटं छाटा; नवनीत राणा यांचा वादग्रस्त विधान

अकोला इथल्या मुर्तिजापूरमध्ये प्रचारादरम्यान भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी, 'जो राम मंदिरावर बोट दाखवेल, त्याची बोटं छाटा,' असं विधान केलं आहे. संविधानाला धरून काही लोकांनी नौटंकी केली नसती, तर माझा अमरावतीत पराभव झाला नसता.आज विधानसभेत आम्ही अमरावती जिल्हा काँग्रेसमुक्त केला. असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

Congress Vs BJP : आशिष देशमुखांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी; विजय वडेट्टीवारांची मागणी

कापण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार आशिष देशमुखांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. आशिष देशमुख आज जे ऐश्वर्य भोगत आहेत, ते कुणामुळे? याचा आधी विचार करावा. त्यांच्या वडिलांना आमदार, मंत्रिपद कुणी दिले? मेडिकल कॉलेज कुणाच्या काळात मिळाले, हे देशमुख विसरले काय? अशी चिथावणीखोर भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे, अशी भाषा करणाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, अन्यथा हा आणि मुख्यमंत्री दोघेही बुडतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

Amravati Crime : आम आदमी पार्टीच्या युवती उमेदवाराची घरात घुसून छेडछाड

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 22 वर्षांच्या युवती उमेदवाराची घरात घुसून छेडछाड करण्याचा प्रकारानं खळबळ उडाली आहे. या 22 वर्षीय युवती उमेदवाराला संबंधिताने घरात घुसून शिवीगाळ देखील केली. निवडणुकीत कशाला उभी राहिली? ताबडतोब निवडणुकीतून माघार घे, अन्यथा जीवाने मारले, अशी धमकी सुध्दा दिली आहे. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune Police: शीतल तेजवानी हीला पुणे पोलिसांची तिसऱ्यांदा नोटीस

पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हीला पुणे पोलिसांची तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलीस चौकशीला हजर राहा, असे नोटीशीमध्ये पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

MVA News: निवडणुकीनंतर आघाडी फुटणार...

'नगरपरिषद निवडणुकीनंतर मविआ फुटणार', असा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. निकालानंतर मविआचे तकलादू मनोरे कोसळतील, असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

Devandra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची हिंगणगाठ जाहीर सभा

हिंगणघाट नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंगणघाट येथे जाहीर सभा होणार आहे.

46 शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेची नोटीस

40% पेक्षा कमी प्रमाणात दिव्यांग असल्याचे आढळलेल्या 46 शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेने कारणे दाखवा नोटीस बजावली असून या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या संबंधितास विरोधात विभागीय कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला आहे. चारशेहून अधिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचे आढळले आहे.

सिडको जमीन घोटाळा प्रकरणी समिती गठीत

नवी मुंबईच्या ५००० कोटीच्या सिडको जमीन घोटाळा प्रकरणात सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. आमदार रोहित पवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप केला होता, दरम्यान, समितीच्या स्थापनेनंतर रोहित पवार म्हणाले की, सरकारचा निर्णय म्हणजे ‘देर आये दुरुस्त आये’ असंच म्हणावं लागेल.

तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तेजस्वीनी घोसाळकर या ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असून त्या शिंदेंकडून महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन तारखेपर्यंत युती टिकवण्याची आहे - रवींद्र चव्हाण

शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शिरले होते. त्यांनी तेथे ठेवले पैसे दाखवले. दरम्यान, या बाबात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, येत्या दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईल.

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलंडल्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या निकालावर राज्यातील 246 नगरपालिका,42 नगरपंचायतींच्या निवडणुकींचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलणार का याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT