Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Updates : पुण्यात गणेश बिडकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Breaking News Today : महापालिका निवडणुकीसाठी राज्यभरात आज ता. 29 डिसेंबर 2025 कोणत्या पक्षांने कुणाशी युती-आघाडी केली आणि जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा ठरला, याबाबतच्या दिवसभरातील घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

PMC Election : गणेश बिडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार आणि भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज भरला. गणेश बिडकर यांनी चंद्रकांत पाटील, हेमंत रासने यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर एबी फॉर्मच्या प्रतिक्षेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक इच्छुकांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. पेडणेकरांना मात्र अद्याप फॉर्म न मिळाल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे त्या आता थेट मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. त्यांना फॉर्म मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

NCP Alliance : पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी आज मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

MNS Election update : मनसेच्या उमेदवारांची यादी आजही नाही ?

मनसेच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागावाटप पूर्ण झाले असले तरी पक्षाने गुप्तता राखण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल होईपर्यंत यादी जाहीर केली जाणार नाही, अशी मनसेची स्पष्ट रणनिती आहे.

BMC Election News : मोठी बातमी! भाजपकडून BMC साठी 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. भाजपने आज 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने अनेक नवीन युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. 

RPI BMC Elaction : मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी केलेल्या चोरळ्या होत आहेत व्हायरल

आम्ही करणार नाही कोणाची गय,

कारण महायुतीचा होणार आहे विजय!

मुंबईतून घालवू आम्ही दादागिरी,

आणि करू फक्त विकासाची कारागिरी!

दरेकर साहेबांनी दिलाय शब्दाला मान,

म्हणूनच आरपीआयचा वाढणार आहे शान!

आमचा निर्णय आहे एकदम पक्का,

आता विरोधकांना बसणार आहे जोराचा धक्का!

Amravati Election : अमरावतीसाठी शिवसेना ठाकरे सेना पक्षाची उमेदवारी जाहीर

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

Akola Politics : महायुती होत नसल्याने अकोल्यात तिढा कायम; शिवसेना-राष्ट्रवादी युती करत भाजपला बाजूला सारणार

अकोल्यात महायुतीत कोण घालतोय खोडा? लवकर निर्णय घ्या, नाहीतर वेगळा विचार केलाय जाईल, असा इशारा भाजपकडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिंदे शिवसेनेला देण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत अकोल्यातील महायुतीचे भविष्य ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपसोबत महायुती न झाल्यास एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची शक्यता.

Sangli Update : सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू, तर वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर

सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये पेठ इथल्या गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या सेप्टिक टँक साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी टँकमध्ये उतरलेल्या तिघा कामगारांचा ऑक्सिजन न मिळाल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला पाच जणांची प्रकृती ही बिघडली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tuljapur Drugs Racket : तुळजापूर एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधाराला अटक, दहा महिन्यापासून होता फरार

तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणातील गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेला आणि संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल श्याम अग्रवाल याला अटक करण्यात तामलवाडी पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरातून तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत 39 आरोपींना अटक करण्यात आली असून, अग्रवालच्या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. अतुल अग्रवाल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, गेली 20 वर्षे मुंबईत स्थायिक आहे. तो मीरा-भाईंदर भागात एका लाँड्रीच्या दुकानाच्या आडून ड्रग्जचा काळा बाजार चालवत होता.

Buldhana Accident : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाला. या कार मध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कारचालक, असे तिघे गंभीर जखमी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकरकडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. गंभीर जखमींना वाशीम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.रात्री उशिरा अपघात घडल्याने याबद्दलची माहिती मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आली.

Bachchu Kadu : कर्जामुळे किडनी विकली, बच्चू कडू सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढणार

कर्जामुळे किडनी विकणाऱ्या रोशनच्या घरापासून बच्चू कडू तीन जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार आहे. या ठिकाणी मानवी अवयवाची तस्करी झाली आहे, यावर संशोधन झाले पाहिजे. सावकारशाही ठोका, शेतकरी वाचवा, यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. तसंच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात एक समिती असली पाहिजे. रोशनचे 74 लाखाला लुटले गेले, त्याला ते 74 लाख परत मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या विदर्भात जर असं होत असेल, तर मग इथले भय संपत का नाही? या सगळ्या घटना थांबत का नाही? हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आक्रोश मोर्चा काढत आहोत, असे बच्च कडू यांनी म्हटले आहे.

Solapur politics : सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सोलापूर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना 30 जागा लढावणार आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पाठोपाठ शिवसेना ठाकरे सेना पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी उमेदवार यादी जाहीर केली.

Mumbai BMC Election : 'मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार हे अगोदरच ठरलेले'

मुंबई महापालिकेसाठी महायुतीतून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायचीच नाही, हे अगोदर ठरले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवाब मलिक नेतृत्व करत आहेत. त्यांच्यावर मुंबई बाॅम्बस्फोटाचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपकडून आरोप होत आहेत. असे असल्याने राष्ट्रवादीबरोबर युती केली नाही, असे सांगितले जाते. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Mumbai Election : मुंबईत वंचितला जास्त जागा सोडल्यावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस अन् वंचितमध्ये आघाडी झाली असून, वंचितसाठी 62 जागा सोडण्यात आल्या आहे. वंचितला एवढ्या मोठ्याप्रमाणात जागा सोडण्यावरून काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विशेष करून, मुंबई शहराध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Chandrapur Politics : चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी वंचित अन् शिवसेना ठाकरे सेना पक्षाचा जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला

चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना युती पक्षाची युती जाहीर करण्यात आली. 50–50 जागा वाटप करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे आणि इतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे सेना पक्षाची युती जाहीर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT