Chhattisgarh Naxal Attack Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : छत्तीसडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 जवानही शहीद

Sarkarnama Headlines Updates : नगरपंचायत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली, मुक्ताईनगर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील-खासदार रक्षा खडसे यांच्यात वाद, युती टिकणार चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य यासह राज्य आणि देशातील घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

छत्तीसडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 जवानही शहीद

छत्तीसडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं आहे. या कारवाईदरम्यान, 3 जवानही शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे.

मंत्री भरत गोगावलेंच्या मुलासह त्याच्या साथीदारांवर महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान मोठा राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना मंगळवारी (ता.2 डिसेंबर) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आता महाड पोलीस ठाण्यात मंत्री भरत गोगावलेंचे चिरंजीव विकास गोगावलेंसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीची तोडफोड करण्यात आली, कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावण्यात आले होते.

पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आरोपी शीतल तेजवानीला अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या कसून चौकशीनंतर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती. याप्रकरणी आता तिला अटक करण्यात आली आहे. यामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीही पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

गोंदिया सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती... 

सालेकसा नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचे मतदान झाल्याच्यानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये न नेता तहसील कार्यालयामध्ये कंट्रोल युनिटचे स्विच ऑफ आहे की नाही हे पाहण्यात आलं आणि ही बातमी नागरिकांमध्ये पसरली त्यावर अनेक उमेदवार आणि नागरिकांनी आक्षेप घेतला. गेल्या आठ तासापासून तहसील कार्यालयांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी असून पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे.

बिजापूर चकमकीत तीन डीआरजी जवान शहीद, आणखी दोन जखमी, 12 माओवादी ठार

छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून यात आतापर्यंत बारा माओवादी ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक माहितीनुसार तीन डीआरजी जवानही शहीद झाले असून दोन जखमी झाले आहे. जखमी सैनिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी दिली आहे.

भगीरथ भालके यांच्यावर गुन्हा दाखल

पंढरपूर नगरपालिका निवडणूकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतपणे घुसून गोंधळ केल्याप्रकरणी व ईव्हीएम मशीनचे फोटो काढून गोपनीयतेचा भंग केल्यास प्रकरणी भगीरथ भालके व इतर अनोळखी पाच व्यक्ती विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक केंद्र प्रमुख दशरथ गोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजपकडून एकनाथ शिंदेंना धक्कातंत्र सुरूच! ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मुलाने हाती घेतले कमळ

शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्ती विकास देसले यांनी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या धक्क्यातून शिंदेंची शिवसेना सावरत नाही तोच सायंकाळी भाजपने दुसरा धक्का दिला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ यांचे सुपुत्र अभिजित थरवळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे.

चिंचवड येथील दुकानाच्या मॅनेजरला धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

चिंचवड येथील श्रीजी सिरामिक या दुकानदानातील मॅनेजर अरजनभा बुवा या मॅनेजरला तीन गाव गुंडांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण करून त्याच्याजवळ असलेली तीन लाख 80 हजार रुपये रोख रकमेची बॅग पळवली होती. या प्रकरणात फिर्यादीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिली होती. ज्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्याच्या अगदी काही तासानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पोलीस पथकाने आरोपीची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेऊन धडा शिकवला आहे. त्यांची दिंड काढली.

EVM Machine : ईव्हीएमचे सील तोडल्याचा दावा

गोंदियातील सालेकसा तहसील कार्यालयाबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यापूर्वी त्याचे सील तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे स्ट्राँगरूम बाहेर सध्या मोठी गर्दी जमली आहे.

Pune Police News : शीतल तेजवानीला अटक

महाराष्ट्रात गाजलेल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तेजवानी या व्यवहार प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप आहे.

Election Commision : निवडणूक आयोगाचा शेलक्या शब्दांत घेतला समाचार

नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीतील सावळ्या गोंधळावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंपासून ते इतर अनेक नेत्यांनी आयोगावर तोंडसूख घेतले आहे. त्यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर निवडणूक आयोगाचे मोजक्या शब्दात चांगले माप काढले. त्यांनी धारधार शब्दांची फुटपट्टीच लावली. त्यांनी निवडणूक आयोगाचा अशा शेलक्या शब्दांनी समाचार घेतला.

bharat Gogavale : मंत्री गोगावले यांनी केले तटकरे यांच्यावर थेट आरोप

महाड येथील गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये मतदानदिनी झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

Sanjay Gaikwad : मतदार याद्यांमधील बोगस, खोटी आणि मृत नावे न काढण्याचा आरोप

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय गायकवाड यांच्या मते, निवडणूक आयोगाने मतमोजणीचे निकाल लांबवण्याची गरज नव्हती, कारण यामुळे स्थानिक प्रशासकीय कामे २० दिवसांसाठी थांबली आहेत. ही कृती अयोग्य असून, महाराष्ट्रातील केवळ तीन-चार नगरपालिकांमधील समस्यांसाठी २९० हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल थांबवणे योग्य नाही. गायकवाड यांनी आयोगावर मतदार याद्यांमधील बोगस, खोटी आणि मृत नावे न काढण्याचा आरोप केला आहे.

UBT shivsena : महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही शिंदे सेनाला उद्धव सेनेने खिंडार पाडले आहेत. जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेला जेरीस आणण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Shirur Politics : शिरूर नगरपरिषदेत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला

​शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली असून, दोन्ही बाजुनं निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मतदान संपल्यानंतर माऊली कटकेंनी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रात प्रवेश करुन आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अशोक पवारांनी केला. तर दुसरीकडे, हा केवळ पराभवाच्या भीतीतून केलेला स्टंट असल्याचा पलटवार आमदार माऊली कटकेंनी केला.

Bharatshet Gogawale : महाडकर दादागिरी खपवून घेणार नाही; मंत्री गोगावलेंचा तटकरेंना टोला

'बाहेरून येऊन कोणी महाडमध्ये दादागिरी करणार असेल, तर महाडकर खपवून घेणार नाही,' असा मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. आमच्यावर जे आरोप करत आहेत, त्यांची पार्श्वभूमी तपासावी. जे झालय त्याला आम्ही सामोरे जातोय, पोलिसांना सहकार्य करू, असे मंत्री गोगावले यांनी म्हटले.

BJP Vs NCPSP : भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; विट फेकून मारल्याने निमजे गंभीर जखमी

भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांना विट फेकून मारली. यात निमजे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे गडचांदुर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे उमेदवार सुरज पांडे याने हा हल्ला केला. यात निमजे यांच्या डाव्या बाजूच्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.

Nashik Update : शेतात आकाशातून पडलं बलून मीटर, शेतकरी घाबरले

नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव इथले शेतकरी प्रणव पाटे सकाळी शेतात पाणी भरायला आले, असता त्यांना आकाशातून एक मीटर असलेली बलून सारखी वस्तू शेतात आढळली. शेतकऱ्याने तातडीने याची माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस व महसूलचे अधिकारी पोहोचले, असता त्यांनी त्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. चौकशी अंती आकाशात पडलेली वस्तू ही हवामान विभाग तापमान मोजण्यासाठी, अशा प्रकारचे बलून हवेत सोडत असल्याचे समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Pune Crime : आयटी पार्क हिंजवडीतील पंचतारांकित स्कूलला बॉम्बे उडवून देण्याची धमकी

पिंपरी चिंचवड इथल्या हिंजवडी फेज -1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मर्सिडीज इंटरनॅशनल स्कूलच्या ई-मेलवर धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचे बीडीडीएस पथक आणि डॉग स्कॉड पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्कूलची कसून तपासणी सुरू केली आहे.

BJP And ShivsenaUBT : फडणवीस, राऊत अन् शेलार एकत्र आले; राजकीय विरोधक एकत्र आल्यानं राज्यात चर्चांना उधाण

राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या समारंभानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, मंत्री आशिष शेलार एकत्र आले होते. फडणवीस अन् राऊत यांच्या १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. खासदार राऊत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब आहे. त्याची चौकशी फडणवीस यांनी केल्याचं समजतं. मात्र, या भेटीचे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Latur Election Update : रेनापुर बंद, निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्याने राजकीय पक्षांमध्ये संताप

लातूर जिल्ह्यातील रेनापुर नगरपंचायतच्या निवडणुकीला स्थगिती देत निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात, राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस यासह इतर पक्षांच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी रेनापुर बंदची हाक दिली आहे. दरम्यान सकाळपासून रेनापुर शहरातील बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. रेनापुर नगरपंचायतीसाठी निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया ही 20 डिसेंबरला ढकलल्याने, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी संताप व्यक्त केला.

Nandurbar Election : 'ईव्हीएम'च्या सुरक्षितेसाठी स्ट्रॉंग रूमला छावणीचं स्वरूप

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नंदुरबार आणि नवापूर नगर परिषदेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू होतं. निकालाची तारीख पुढे ढकलल्याने आता या सर्व मतपेट्या नंदुरबारच्या वखार महामंडळाचा गोडाऊनच्या स्ट्रॉंग रूममध्ये काटेकोर अशा सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत असून काल झालेल्या मतदानात सरासरी 70 टक्के मतदान हे झालेलं आहे. मतमोजणी ही 21 डिसेंबरला होत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Thane Crime : ठाण्यात केअरटेकरची हत्या; आरोपी अटकेत

ठाण्यातील संजय गांधी उद्यान इथल्या येऊर पंचवटी बंगल्यात भानू प्रताप सिंग नावाच्या केअरटेकरची किरकोळ वादातून हत्या झाली. मित्रासोबत पार्टी करत असताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच हत्या केली.

मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यामुळे लोकशाहीसाठी रात्रच नव्हे; दिवसही वैऱ्याचा

राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतींची मतमोजणी एकाच दिवशी, म्हणजे 21 डिसेंबर रोजी होईल, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालांवर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार, 12 जिह्यांमधील निवडणूक प्रक्रिया ‘नियमबाह्य’ झाल्याची निवडणूक आयोगानेच दिलेली कबुली, उच्च न्यायालयाने पुढे ढकललेली मतमोजणी अशा गटांगळ्या खात महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक सुरू आहे. जी मंडळी निवडणूक घोटाळा करूनच सत्तेवर आली आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. मतदान आणि मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यामुळे लोकशाहीसाठी रात्रच नव्हे; दिवसही वैऱ्याचा असणार आहे, असं सामनामध्ये लिहिलं आहे.

वृक्षतोड व्हावी असं आमचं कुणाचंही मत नाही - CM फडणवीस

नाशिक तपोवन येखील वृक्षतोड व्हावी असं आमचं कुणाचंही मत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा प्रयत्न करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर पर्यावरण आणि कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या चौकशीसाठी समिती स्थापन

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या चौकशीसाठी समिती स्थापन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समीती स्थापन करण्यात आली असून या समीतीकडून वीएसआयची चौकशी केली जाणार आहे.

Nilesh Ghayawal : निलेश घायवळ विरोधात आता रेड कॉर्नर नोटीस

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ सध्या फरार असून आता पोलिसांनी त्याच्याविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. अशातच आता पोलिसांकडून घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'नगारा' चिन्हा समोरील बटन दाबलं अन् 'कमळा'चा लाईट लागला, संतापलेल्या मतदाराने थेट EVM फोडलं

चंद्रपूरच्या गडचांदूर येथे एका मतदाराने चक्क ईव्हीएम फोडल्याची घटना समोर आली आहे. राम दुर्गे असं ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या मतदाराचे नाव आहे. आपण नगारा चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागल्याचा दावा करत या मतदाराने ईव्हीएम फोडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी राम दुर्गे यांना ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी नवीन ईव्हीएम लावून मतदानाची प्रक्रिया सुरू केली.

निवडणुकीत मदत केली नाही म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण

चंद्रपुरात निवडणुकीत मदत केली नाही म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट राजुरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. यावेळी राजुरा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगळे देखील उपस्थित होते.

निवडणुकीचा खेळखंडोबा झाला - विजय वडेट्टीवार

नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे, राज्यातील निवडणुका हा पोरखेळ झाला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले हे सरकारला दाखवायचे होते, हे सरकार कोणत्या दिशेने काम करते? उद्याची मतमोजणी २१ डिसेंबरला गेली. निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे, त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या विरोधात अटक वाॅरंट काढा- प्रकाश आंबेडकर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटकर करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट काढा, अशी मागणी आंबेडकर यांच्या वतीने वकिलाने केली आहे. 

महापालिका निवडणूक 15 डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता

नगपंचायत निवडणुकीसाठी मतदान होताच महापालिका निवडणुकीसाठी हालचाल सुरु करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. 15 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत महापालिका निवडणुक होण्याची शक्यता आहे.

पन्नालाल सुराण यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. सुराणा यांनी भूदान चळवळीत भाग घेतला होता. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

टेन्शन वाढलं, इंदापूरमध्ये 8० टक्के तर, दौंडमध्ये 60 टक्के मतदान

नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशीरा मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये इंदापूरमध्ये 79.89% टक्के तर, दौंडमध्ये 59.32 टक्के मतदान झाले आहे. मंचरमध्ये 74.19%, माळेगाव 77.19%, जेजुरी 78.06%, वडगाव 74.85,सासवड 67.02 टक्के मतदान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT