Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Update : देश-विदेशासह महाराष्ट्रात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates: आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची राजकीय पक्षांकडून तयारी, हिवाळी अधिवेशनाची अपडेट यासह बोगस मतदानावर विरोधक अन् सत्ताधाऱ्यांत आरोप-प्रत्यारोप यासह देश आणि राज्यातील 03 नोव्हेंबर 2025 रोजीच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कारखान्याची धुराडे पेटू देणार नाही - राजू शेट्टी

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कारखान्याची धुराडे पेटू देणार नाही. आजच्या बैठकीला एकही कारखानदार उपस्थित नव्हता त्यांना मस्ती आलेली आहे आणि ही मस्ती आम्ही उतरवल्याशिवाय सोडणार नाही. शेतकऱ्यांनी देखील जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ऊस तोडी करू नये. मुख्यमंत्र्यांनी उद्या या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालावं अन्यथा परवा कोल्हापुरात मुख्यमंत्री येणार त्यांना अडवण्यात येईल. 3,751 रुपये एक रकमी विनाकपात एफआरपी द्यावी आणि मागील हंगामातील दोनशे रुपये द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी यांचा इशारा

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्यावर मुंबईत हृदयशस्त्रक्रिया

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना काही दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे.

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरेंच्या खासदारांना भेटण्यास नकार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविद सावंत आणि अनिल देसाई हे तक्रार देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना भेटण्यासाठी नकार दिल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी भेटत नसल्यामुळे खासदारांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरेंच्या खासदारांना निवडणूक आयोगाने ताटकळत ठेवल्याचाही आरोप आहे.

Jain Muni : जैन मुनी नीलेशचंद्र यांचे बेमुदत उपोषण मागे

मुंबईतील बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनी नीलेशचंद्र यांनी आजपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर जैन मुनी नीलेशचंद्र यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. कबुतरखान्यासंदर्भात पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारने दिले आहे. पंधरा दिवसांत तोडगा निघाला नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा निर्धारही जैन मुनींनी बोलून दाखवला आहे.

Prakash Mahajan : रुपाली चाकणकर अजूनही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण ग्रामीण रुग्णालयाची डॉक्टर युवतीचे चरित्र्यहनन केले. त्यामुळे चाकणकर अजून पदावर कशा? असा प्रश्न मला पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कसे काय गप्प बसतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिनचिट देऊ शकतात आणि आता तुम्ही एसआयटी स्थापन करता.? चौकशीत निर्दोष आढळले तर ठीक आहे ना. किती दिवस झाले, अजित पवार पीडिताच्या कुटुंबाला फोनवर बोलले? चाकणकरांना का घरी पाठवलं नाही? असं कोणत्या रुपात अजित पवार अडकलेत?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.

Ranjit Naik Nimbalkar : फलटणमध्ये सभा

भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची थोड्याच वेळात फलटणमध्ये सभा होणार आहे. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्यांनी फलटणमध्ये सभा होत आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Sushma Andhare : जयकुमार गोरेंनी आधी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं!

जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का? त्या आधी गोरेंनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं असा टोला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी लगावला. या प्रकरणात जी सहा नावे आली आहेत त्यांना चौकशीच्या कक्षात घ्यावे, अशी मागणीही अंधारेंनी केली. फलटणमधील मृत महिलेला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. 

Sushma Andhare : सातारा पोलीस, आमदार-खासदारांच हे फेल्यूअर! फलटण प्रकरणी अंधारे यांचा आरोप

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. 'हे फलटणचं फेल्यूअर आहे, हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्यूअर आहे, हे सातारा पोलिसांचं फेल्यूअर आहे आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्यूअर आहे,' अशा शब्दात अंधारे यांनी व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवले आहे. फलटणमधील इतर ५ ते ६ हत्या प्रकरणांमध्ये आरोपी मोकाट असूनही पोलीस चार्जशीट दाखल करू शकलेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. एका महिलेवर झालेल्या अत्याचारावेळी पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी आपला सद्सद्विवेक का वापरला नाही, असा संतप्त सवाल विचारत अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची मागणी केली.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या बंगल्यातील चोरी प्रकरणात तिघांना अटक; रोख, सोने सापडले..

एकनाथ खडसे यांच्या घरात चोरी करण्यापूर्वी त्यांनी खडसे यांच्या घरची काही दिवस रेकी करण्यात आल्याचं पोलिस तपासत समोर आले आहे. या घटनेत खडसे यांनी कागदपत्र ,आणि सीडी चोरीस गेल्याचा आरोप केला होता. मात्र या बाबत खडसे यांनी पोलिसात केवळ दागिने चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती, त्या नुसार मुद्देमाल जप्त केला आहे. तर सीडी अथवा कागदपत्र चोरी बाबत अद्याप पोलीस तपासात समोर आलेले नाही, त्याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं.

Girish Mahajan : दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या; रामदास चारोस्कर यांचा पक्षप्रवेश

दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनिता चारोस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. सुनिता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र आता चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिंडोरीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. चारोस्कारांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्री गिरीश महाजन यांनी दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, असे त्यांनी म्हटले. 

Khamgaon APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालत होता. या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 18 सदस्य आहेत. तर सुभाष पेसोडे हे राष्ट्रवादीचे सभापती आहेत. मात्र आज खामगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. कारण 18 पैकी 13 सदस्य हे काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अविश्वास प्रस्ताव दाखल करून अज्ञात वासात निघून गेलेत.

पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. अ‍ॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिलेले आहेत. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

उद्धव ठाकरे ५ तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे हे ५ तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना सरकारकडून दिवाळीपूर्वी जाहीर झालेले मदतनिधी मिळाले की नाही, याची पाहणी करणार आहेत.

नागपुरात अधिकारी लाच घेताना व्हायरल, गिरीश महाजनांचा थेट कारवाईचा इशारा

नागपुरातील एका अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पैसे मागितल्यावर दिले नाही आणि म्हणून पंचनामा राहिला किंवा कोणाला पैसे मिळाले नाही तर त्याची तक्रार संबंधित लोकप्रतिनिधींकडे, लेखी स्वरूपामधे काय मुख्यमंत्री महोदयांकडे, पालकमंत्र्यांकडे कुणाकडे केली तर त्या कर्मचारी असेल अधिकारी असेल त्याच्याविरुद्ध अतिशय कडक कारवाई कठोर कारवाई ठिकाणी केली जाईल,' असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.

निवडणूक आयोग कोणाची नोकरी करतंय हे उघड होत चाललंय - उद्धव ठाकरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदोष मतदार याद्यांवरून निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक आयोगाची ही करप्ट प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललंय,' असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एकाच घरात चाळीस ते पन्नास नावे घुसडल्याचा दावा करत, जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेलारांचा ठाकरे बंधूंवर हल्ला, 'काँग्रेसचा रोग लावून घेऊ नका'

भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शेलार म्हणाले, 'काँग्रेसचा तर लांगूल चालण्याचा रोग लागलाच आहे पण तुमची बोबडी उद्धवजी का वळली आहे?'. काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या राजकारणावर बोट ठेवत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुस्लिम दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून शेलार यांनी ठाकरे बंधूंना धारेवर धरले. पाटील आणि दलित मतदारांबाबत वेगळी भूमिका आणि मुस्लिम दुबार मतदारांबाबत मौन का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे बंधूंनी काँग्रेसचा लांगूलचालनाचा रोग लावून घेऊ नये, असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंनी व्होट जिहाद करू नये: शेलार

महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर आशिष शेलार यांनी निशाणा साधला. निवडणुका याद्या स्वच्छ झाल्या पाहिजे, आमची देखील तीच भूमिका असल्याचे आशिष शेलार म्हणाले. शेलार यांनी यावेळी राज ठाकरे यांचा दावा खोडला. राज ठाकरेंनी व्होट जिहाद करू नये, असे शेलार म्हणाले.

गुडलक चौकात चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन

Pune: पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय महिला एकटवल्या आहेत. गुडलक चौकात चाकणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या रूपाली ठोंबरे, ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारी यांनी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन करीत आहेत.

विरोधकांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही: शेलार

निवडणूक आयोगावरील विरोधकांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेेलार यांनी सांगितले. सत्य आणि खरे मांडण्याची आमची भूमिका आहे, असे शेलार म्हणाले.

पावसाचा मुक्काम 7 नोव्हेंबरपर्यंत

दिवाळी संपली तरी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरुच आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा काळ वाढला असून 7 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

स्थानिकच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसला खिंडार

स्थानिकच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील भाजपच्या वाटेवर असून त्यांचे शेकडो कार्यकर्ते सात नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच हा पक्ष प्रवेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, पाटील,पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या प्रवेशामुळे माळशिरस तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडणार आहे.

Supriya Sule : महिला डॉक्टरच्या कुटुंबाला न्याय देणं आपली नैतिक जबाबदारी : सुप्रिया सुळे

फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. यानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा असी मागणी केली. तसेच त्यांनी एसआयटीची मागणी ही पूर्ण करावी. निवृत्त सरन्यायाधीशांकडे याची जबाबदारी द्यावी तर राजकीय हस्तक्षेपाशिवाय कुटुंबाला न्याय द्यावा असेही म्हणत ही नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule Live : सुप्रिया सुळे यांचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंकदर शेख प्रकरणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांच्याशी बातचीत केली असून या प्रकरणात माहिती घेतल्याचे म्हटलं आहे.

मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू करण्यासाठी मुनी निलेशचंद्र यांचं आमरण उपोषण सुरू 

मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू करण्यासाठी मुनी निलेशचंद्र यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. ते आझाद मैदानात उपोषणाला बसले असून दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे.

सुषमा अंधारे यांचे आज फलटण पोलिस ठाण्यासमोर आंदोलन 

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या फलटण पोलिस ठाण्यासमोर आज आंदोलन करणार आहेत. त्यामुळेे परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे वडगाव बुद्रुक येथे दाखल

फलटणमध्ये डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बीडमधील वडगाव बुद्रुक येथे दाखल

प्रभागनिहाय मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचा पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय

मतदार याद्यातील गोंधळावरून राज्यभर वाद सुरू आहे. पुण्यातही प्रभागनिहाय मतदार याद्यांत घोळ असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल पुणे महानगरपालिकेनं घेतली आहे. येथील निवडणूक विभागाने नुकतेच आदेश जारी केले असून, सहाय्यक आयुक्तांकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने प्रभागानुसार मतदार याद्यांचे विभाजन करून त्याची फेरपडताळणी केली जाणार आहे.

Winter Session : निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन तारीख पुढे ढकलण्याची शक्यता असून ही माहिती अनौपचारिक चर्चेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आगामी स्थिनिकच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळाचा कमतरता जाणवू शकते, यामुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.  

Phaltan Doctor death news : फलटणमध्ये डॉक्टर तरुणीची आत्महत्या, डॉक्टर संघटनांकडून आज काम बंद आंदोलन

फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सखोल आणि योग्य दिशेने चौकशी आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपायोजना कराव्यात या मागणीसाठी आज राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप राज्यातील विविध डॉक्टर संघटनांनी केला असून डॉक्टरांच्या सुरक्षितता प्रश्न पुन्हा समोर अल्याच या संघटनांचे म्हणणं आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड त्यासोबतच IMA, अस्मि माझ्या सर्व डॉक्टरांच्या संघटना एकत्र येऊन या आंदोलनात आज सहभागी होणार आहेत.

Bacchu kadu | कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपसह मित्र पक्षाला मतदान करू नका : बच्चू कडूंचे आवाहन

शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप आणि मित्र पक्षाला आगामी निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची’ स्थापना केली आहे. पण 30 जून 2026 पर्यंत सरकारने कर्जमाफी केली नाही तर 1 जुलै रोजी हंगामा होईल, असाही इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT