Mns Leader Avinash Jadhav  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Update : निवडणूक आयोगानं भाजपच्या दबावात हा निर्णय घेतला - अनिल देशमुख

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates: राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

निवडणूक आयोगानं भाजपच्या दबावात हा निर्णय घेतला - अनिल देशमुख

आम्ही दोन तीन दिवसांपूर्वी सर्व पक्षीय एकत्र येऊन निवडणूक आयोगाला मागणी केली होती. मतदान याद्यांमध्ये मोठी त्रुटी आणि घोळ आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दामून चुका करण्यात आल्या. लाखाचा मोर्चा सर्व पक्षीय नेत्यांनी काढला. सर्वांनी अगोदर याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली. नंतर निवडणुका घ्या म्हटलं. नाहीतर पारदर्शक निवडणुका होणार नाहीत. सत्ताधारी पक्षाला फायदा होईल असे मत निवडणूक आयोगां मांडलं. मात्र, निवडणूक आयोगानं भाजपच्या दबावात हा निर्णय घेतला, असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

'निवडणूक आयोगाकडून फारशा अपेक्षा राहिल्या नाहीत...'; मनसे नेते अविनाश जाधव यांची टीका 

मनसे नेते अविनाश जाधव यांनी नागरिकांना आता निवडणूक आयोगाकडून फारशा अपेक्षा राहिल्या नसल्याची टीका त्यांनी केली. आयोगाला निवडणुका घेण्याची घाई लागली असून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही केला आहे. हल्लाबोलही त्यांनी केला.800 ते 900 लोकांच्या यादीत 200- 250 नावे मिळत नसतील, तर अशा निवडणुका कशासाठी घेतल्या जात आहेत असा सवालही जाधव यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप,एकाच कुटुंबात शेख, कांबळे, जैन...

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळ आणि ‘मतचोरी’वर गंभीर आरोप करतानाच एकाच कुटुंबात शेख, कांबळे, जैन अशी वेगवेगळी नावे मतदारयादीत आढळल्याचं नमूद केलं आहे. याचवेळी त्यांनी बुलढाणा येथे 5,250 मयत व्यक्तींनी मतदान केल्याचं धक्कादायक प्रकारही समोर आणला आहे.

'...तर धनंजय मुंडेसारखे अनेक मंत्री मी पदावरून काढून टाकणार!';करुणा मुंडे यांचं विधान 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी पुन्हा मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या, मुंडे घराण्याच्या सुनेला पक्ष काढावा लागला,आमच्या घराण्यात एकाच दिवसात दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. महिलांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आमच्या घरातील एक मंत्रिपद काढून टाकले. जर आमच्या पक्षाला योग्य ताकद मिळाली तर धनंजय मुंडेसारखे अनेक मंत्री मी पदावरून काढून टाकणार असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule : ओबीसी आरक्षणासह निवडणूक याचा आनंद

राज्य निवडणूक आयागोने नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणूक होणार असल्याने आनंद झाल्याचे बावनकुळे म्हणाले.

Rohit Pawar News : मतचोरीवरून आक्रमक

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले. पत्रकार परिषदेत पवार यांनी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित करत आयोगावर निशाणा साधला.

Election Commission Live : व्हीव्हीपॅटचा वापर नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, असे दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. मतदानासाठी केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Election Commission Live : मतदारयाद्यांबाबत आयोगाने जबाबदारी झटकली

मतदारयाद्यांमधील त्रुटींबाबत विरोधकाकांकडून आरोप केले जात आहेत. एकाच घरात अनेक मतदारांची नोंदणी आहे. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरही काही मतदारांची नोंदणी आहे. त्यावरून निवडणूक आयुक्तांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले. मात्र, यावेळी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाची कामे आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या कामांकडे बोट दाखविले.

Election Commission update : निवडणुकीच्या तारखा जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल. अर्ज भरण्यासाठी १० ते १७ नोव्हेंबर ही मुदत असेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

Election Commission live : मतदार यादी ७ नोव्हेंबरला

मतदार यादी ७ नोव्हेंबरला प्रसिध्द होणार आहे. त्यानुसार नगरपंचायत व नगरपरिषदांसाठी मतदान करता येईल. या निवडणुकीसाठी १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असतील. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

Election Commission live : दुबार मतदारांसमोर चिन्ह

मतदारयाद्यांमध्ये संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार हे चिन्ह दोनदा देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून कुठे मतदान करणार, याची माहिती घेतली जाईल. त्यानुसार त्यांना त्याच मतदान केंद्रावर मतदान करता येईल, असे आयोगाने स्पष्ट केले.

Election Commission live :आयोगाची पत्रकार परिषद सुरू

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून निवडणुकीबाबत माहिती दिली जात आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

इस्लामपूर आता 'ईश्वरपूर' होणार! बावनकुळेंची मोठी घोषणा

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता 'ईश्वरपूर' करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नामांतराची घोषणा केली होती. बावनकुळे यांनी म्हटले होते की, 'आजपासूनच इस्लामपूर चे नाव ईश्वरपूर करणार'. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला होता, ज्याला आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवरून आणि काही हिंदुत्ववादी संघटनांकडून ही मागणी केली जात होती. या निर्णयामुळे आता सर्व शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात 'ईश्वरपूर' हे नाव वापरले जाईल.

मुंख्यमंत्री फडणवीस संतापले ; मुंबईतील अधिकारी, कंत्राटदारांना सुनावले खडेबोल

राज्यातील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'पाच-पाच वर्षांची टाइमलाइन आता जगात कुठेही चालत नाही, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवा', अशा कडक शब्दांत फडणवीसांनी कामाच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केला. कुठल्याही परिस्थितीत कामांना विलंब सहन केला जाणार नाही, असे बजावत त्यांनी ठरलेल्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे बंधनकारक आदेश दिले. 'जनरेशनल प्रोजेक्ट्स' म्हणजे अनेक वर्षे चालणारे प्रकल्प आम्हाला मान्य नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वॉर रूम बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक कामाचे नियोजन करून ते वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

लोकसभा-विधानसभा ज्या मतदार याद्यांवर झाल्या, त्याच यादीवर निवडणूक होणार : बावनकुळे

लोकसभा आणि विधानसभा ज्या मतदार याद्यांवर झालेल्या आहेत त्याच यादीवर या निवडणुका होणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुणे हादरलं! संतापजनक प्रकार! 50 वर्षीय नराधमाने शाळकरी मुलीवर अत्याचार

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने ५० वर्षांच्या व्यक्तीने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई हायकोर्टात मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

मतदार यादीला आव्हान देणाऱ्या काही याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की निवडणुकीची अधिसूचना कधीही लागू शकते, त्यामुळे तत्काळ सुनावणी घ्यावी. मात्र न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली. “तुम्ही याचिका दाखल करायला उशीर केला आहे, त्यामुळे आता तत्काळ सुनावणीचे कारण नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. या याचिकांमध्ये मतदार यादीतील त्रुटी व पात्र मतदारांना वगळल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. न्यायालय पुढील काही दिवसांत यावर सविस्तर सुनावणी घेणार आहे.

रामराजे नाईक निंबाळकर आज पत्रकार परिषद

रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहेत.

Sangamner Crime : प्रतिबंधित मांगरू मासे वाहतूक करणारा ट्रक पकडला; साडेचार टन मासे नष्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीर मांगरू मासे वाहतूक करणारा ट्रक पकडत मोठी कारवाई केली. मानवी आरोग्यास अपायकारक मांगरू माशांच्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रतिभा सुधाकर पाटेकर यांनी फिर्याद दिली आहे.

Baramati Politics : बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा

Jay Pawar

बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. बारामती नगर परिषद नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचे मतदान काटेवाडीत, जय पवार यांचे मतदान बारामतीत असल्याने चर्चांना बळ मिळत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जय पवार प्रचारात सक्रिय होते.

Thane Politics : ठाणे महापालिकेच्या दिवा परिसरात तब्बल 17 हजार 258 दुबार नावे

विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमधील घोळामुळे मतचोरी झाल्याचा आरोप केला जात असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील मतदार याद्यांमध्ये तब्बल 17 हजार 258 दुबार नावे आढळली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.

Rohit Pawar : भाजपच्या दृष्टीने मित्रपक्षांची उपयुक्तता संपली; रोहित पवार यांचा टोला

भाजपच्या दृष्टीने मित्रपक्षांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे कुबड्या काढून फेकण्याची नांदी झाली असून, त्या अडकविल्या जातील की चुलीत पेटविल्या जातील, हे पाहावे लागेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Mumbai Update : मुंबईतील स्थानकांच्या नावापुढे खासगी कंपन्यांच्या नावावरून काँग्रेस आक्रमक

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो तीन मार्गिकेतील स्थानकांच्या नावापुढे खासगी कंपन्यांची नावे जोडली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सिद्धिविनायक स्थानकांसह अनेक स्थानकांच्या नावापुढे खासगी कंपन्यांची दिल्याच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. हा प्रकार देवदेवता अन् महापुरूषांचा अपमान असून, तो खपवून घेणार नाही, असा काँग्रेसने इशारा दिला आहे.

Maharashtra State Election Commission : राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद; 'स्थानिक'च्या घोषणेची शक्यता

State Election Commission

राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही घोषणा होते का, याकडे आता लक्ष लागले आहे. आयुक्त दिनेश वाघमारे या पत्रकार परिषद घेणार आहे.

Bala Nandgaonkar : बाळा नांदगावकर यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा

आझाद मैदान पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उपाध्यक्ष बाळा नांदगावकर यांच्यासह सहा पक्ष पदाधिकाऱ्यांवर दक्षिण मुंबईत परवानगी न घेता 'सत्याचा मोर्चा' आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसेने काढला होता.

Uttam Jankar : 'एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, 'ईव्हीएम'चा घोळ बाहेर काढतो'

नायक चित्रपटात अनिल कपूरला जसे एक दिवसासाठी मुख्यमंत्री केले होते, त्यापध्दतीने हे राज्य एक दिवसासाठी माझा ताब्यात द्या, ईव्हीएम मशीनचा घोळ बाहेर काढतो, असे खुले आव्हान माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिले. मंत्री आशिष शेलार यांनी माळशिरस तालुक्यात मुस्लिम समाजाच्या दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मंत्री शेलार यांनी हे आव्हान दिले आहे.

Amravati Voter : अमरावतीत मतदार यादीत सहा हजारांपेक्षा जास्त मतदारांची दुबार, तिबार नावं

अमरावती जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे दोन, तीन आणि चार वेळा मतदार यादीत असल्याचं समोर आलं आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने नाव लिंग, पत्ता, छायाचित्राची तपासणी होणार आहे. हमीपत्रानंतरच मतदाराला मतदान करता येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 6 हजार 689 मतदारांच्या नावांची तब्बल 13 हजार 513 वेळा नोंद असल्याचे उघड झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबरला मतदार यादीतील दुबार नावात उपाय योजना मार्गदर्शन सूचना दिले आहे.

20 नोव्हेंबरला मुंबई विमानतळ 26 तास बंद राहणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून दरवर्षी करण्यात येणाऱ्या वार्षिक रनवे मेंटेनन्स कामासाठी विमानतळ बंद ठेवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महायुती सरकार दिवाळखोर झालं आहे, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी टीका केली होती. त्याला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही दुजोरा दिला आहे. किशोर पाटलांचे काय घेऊन बसलात, राज्यातील एकालाही आमदार निधी मिळालेला नाही. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याबाबत सर्व विरोधी पक्ष आणि शेतकरी सरकारकडे आस लावून बसले आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ घोषणा केली. शेतकऱ्यांना नुकतेच पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेजचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. जाहीर केलेल्या पॅकेज एनडीआरएफ योजनेतून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देऊ शकले नाही. राज्यातील महायुती सरकार दिवाळखोर झाले आहे, अशी टीका खडसेंनी महायुती सरकारवर केली आहे.

Anil Ambani : ईडीकडून अनिल अंबानींची साडेसात हजार कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये त्यांनी अंबानी यांची मुंबई आणि दिल्ली दरम्यानची तब्बल साडेसात हजारी कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही, तुम्हाला उडवून देऊ, काँग्रेस खासदाराची मोदी फडणवीसांना धमकी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भंडाऱ्यातील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उडवून देऊ, अशी धमकी दिली आहे. पडोळे म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाचे मोठं नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये भेटले साहेब 18 रुपयांनी काय होतं? धोरणं बदलाना साहेब आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी. यावेळी शेतकरी आत्महत्या करणार नाही, तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही, तुम्ही शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही, यावेळेस आम्ही तुम्हाला उडवून देऊ.'

दिवाळीत तुळजाभवानी मंदिर संस्थानाला 3 कोटींहून अधिक उत्पन्न

दिवाळीच्या सुट्टीत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर संस्थानाला भरघोसपणे दान मिळाले आहे. मंदिर संस्थानाला जवळपास 3 कोटी 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचं समोर आलं आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळात साडेतीन कोटींहून अधिक भाविकांनी तुळजाभवानी मंदिराला भेट दिली आहे.

Local Body Elections : 'स्थानिक'च्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, उद्या फैसला होणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या 28 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर उद्या तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे.

Rohit Arya: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मानवाधिकार आयोगाची एन्ट्री

मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केलेल्या रोहित आर्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. या एन्काऊंटरचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास पांढरे आणि आयोगाचे निबंधक, न्यायाधीश विजय केदार हे या घटनेचा तपास करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT