शितल तेजवानीच्या इतर घरं, कार्यालय, आस्थापनांची पोलिस झडती घेण्याची शक्यता आहे. तेजवानीने जमीन व्यवहार केल्या प्रकरणी काही कागदपत्रांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तेजवानीचे पुणे, पिंपरी चिंचवड वगळता इतर कुठे घरं, कार्यालये आहेत का याचा देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क आणि पिंपरी चिंचवड येथील घराची झडती घेतली. गुन्ह्याशी संबंधित असलेल्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रयत्न सुरु आहेत.
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिगो विमानाचे बुकींग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेतली आहे.
सिगारेट आणि पानमसाला महागणार आहे. लोकसभेत याबाबतचे विधेयक मंजूर झाले आहे. यातून मिळणारा पैसा सुरक्षेच्या बजेटसाठी वापरले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी तपोवनातील वृक्षतोड करण्यास निसर्गप्रेमी नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. संसदेतही काही खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर आजा मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यासाठीच्या कामांची पाहणी केली. तसेच अन्यत्र झाले लावण्याच्या जागेचीही त्यांनी पाहणी केल्याचे समजते. त्यामुळे सरकार झाडे तोडण्यावर ठाम असल्याचे दिसते.
राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार नाही किंवा त्यांच्यावर अतिरिक्त ताण वाढू शकतो, असे कारण सरकारने दिले आहे.
नवी मुंबईतील 500 कोटींहून अधिक रकमेची गरिबांची घरे लाटण्याचा प्रयत्न काही बिल्डरनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने केला आहे. तो विषय मी गेल्या अधिवेशनात उपस्थित केला. त्या वेळी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. त्याची बैठक नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मी माझं म्हणणं पुन्हा एकदा मांडलं आहे. काही बिल्डरकडून घरे घेण्यात आली आहेत, तर काहींकडून ती घेण्यात आली नाहीत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी दोन नियम कसे लावले, असा सवाल भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी केला आहे.
नाशिकमधील तपोवनमधील झाडे तोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. आमचा झाडे तोडण्याला तीव्र विरोध आहे, असे नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसैनिकांनी झाडे तोडण्याचे करवत जाळून या निर्णयाचा विरोध दर्शविला आहे. तपोवन वाचवा; नााशिक वाचवा अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या आहेत.
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी शीतल तेजवानी हिच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी पोलिस तिच्या कोरेगाव पार्कमधील घरी पोचले आहेत. शीतल तेजवानी हिला कालच अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांचं पथक तिच्या घराची झाडाझडती घेत आहेत.
मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगार युनियन आणि भाजपमध्ये ताज हॉटेलच्या बाहेर जोरदार राडा झाला आहे. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना मुंबईत का घडलंय, याची मला कल्पना नाही. पण मी त्याची माहिती घेईन. युनियन काढण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. पण कुठल्याही युनियनने हॉटेल किंवा इतरत्र राडा करणं, हे मान्य नाही. मग ती युनियन कोणाचीही असो. राडा मी होऊ देणार नाही, राडा करण्यावर मी कठोर कारवाई करेन. कामगार हितासाठी युनियन काढावं. पण त्या ठिकाणी आस्थापना बंद करणं, त्या ठिकाणी राडा केला जात असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
इंडिगोच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक उड्डाणे रद्द होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बेंगळुरू मार्गांवरील विमानभाडे अचानक ५० ते ६० हजारांपर्यंत पोहोचले आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून इतर एअरलाइन्स कंपन्यांनीही दर वाढवून आर्थिक ताण अधिकच वाढवला आहे.
वरळीत ठाकरे सेना आणि भाजप यांच्यात कामगार युनियनच्या वादातून तणाव वाढला. भाजप समर्थित युनियनचा लावलेला बॅनर विरोधकांनी काढून टाकल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. परिस्थिती ताणतणावी होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार बळवंत वानखडे यांचा अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरास तीव्र विरोध केला. भू-माफियांच्या षड्यंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली. अमरावती रेल्वे स्टेशन- जे ब्रिटीश काळातील वारसा असून शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि नागरी विकासाच्या केंद्रस्थानी आहे. ते स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला खासदार वानखडे यांनी कडाडून टीका केली.
'आरबीआय'ने रिपो दरात कपात केली. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होऊन सामान्यांना दिलासा मिळणार आहे. रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्याने गृहकर्ज, वाहन कर्जाच्या EMI चा भार कमी होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केले.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयसमोर शिक्षक संघटनांकडून टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या मुद्यावर जोरदार निदर्शनं करण्यात आली. टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनात अमरावती जिल्ह्यात 12 संघटनांचे हजारो शिक्षक सहभागी होत शाळा बंद आंदोलन केलं. आचारसंहितेच कारण देत आमच्या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली. जुनी पेन्शनचा मुद्दा बाजूला टाकण्यासाठी टीईटी परीक्षेचा मुद्दा सरकारने समोर केल्याचा शिक्षक संघटनेचा आरोप आहे.
टीईटीची (शिक्षक पात्रता परीक्षा) जातक अटी रद्द कराव्यात, यासह प्रमुख 14 मागण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्ह्यातील 80 ते 90 टक्के प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच माध्यमिक विद्यालय आणि शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या मोर्चा दहा ते पंधरा हजाराहून अधिक शिक्षक सहभागी झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली.
कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरातील केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर आधीच परिणाम झाला आहे. यातच आता दुसरीकडे या परिसरातील नामांकित के. सी. गांधी शाळाही सलग तीन दिवस बंद ठेवावी लागल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी वाहतूक पोलिस आणि केडीएमसी प्रशासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी के. सी. गांधी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
नगरपालिका मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, असा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी निवडणूक आयोगाला उपरोधिक टोला लगावला. 21 ला होणारी मतमोजणी 31 डिसेंबरला घ्यावी, अर्थातच आणखी 10 दिवस मतमोजणी टांगून ठेवावी. म्हणजेच नवं-वर्षाच्या मुहूर्तावर मतमोजणी घेतली, तर निश्चितच महायुती असो की, महाविकास आघाडी दोघेही नाराज होणार नाही.
तीन प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहे. वाढत्या बालमृत्यूवर न्यायालयाने चिंता व्यक्त केल्यानंतर पहिल्यांदाच प्रधान सचिवांची समिती आज मेळघाट दौरा करत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास विभाग या विभागांच्या सचिवांचा दौऱ्यात समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातील 7 नगारपालिकामध्ये एकही भाजपची जागा निवडून येणार नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी केला. प्रत्येक मताला 15 ते 20 हजार रुपये भाव चलला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील एका ही नगरपालिकेत भाजप निवडून येणार नसल्याचा खासदा जाधव यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनाप्रकरणी वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती ‘सी’चे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोंसालविस यांना मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोंसालविस यांना न्यायालयात चौकशीसाठी हजर करण्यात आले आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी विरार पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
येत्या सोमवारपासून नागपुरात सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर 33 मोर्चे येऊन धडकणार असल्याची माहिती आहे.17 संघटनांनी साखळी उपोषण, 22 संघटनांनी धरणे आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. श्रमिक कागगारांच्या 13 विविध संघटनांनी मोर्चासाठी अर्ज केले आहेत. संघटनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई भाजपची महापालिकेसाठी निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली या समितीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, पियुष गोयल, विनोद तावडे, रविंद्र चव्हाण विशेष निमंत्रित सदस्य होते. आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी होती. एकूण 150 सदस्यांची संचालन समिती पाहणार आहे.
सर्व प्रकारचे दाखले मिळण्यासाठी आता विलंब होणार नाही, दाखले ऑनलाईन मिळणार आहेत -चव्हाण
मुंबई पाच नवी परदेशी विद्यापीठ उभारली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परदेशात जाण्याची गरज राहणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे गतीमान काम सुरु आहे, केंद्र आणि राज्च यांचा समन्वय उत्तम आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांन पत्रकार परिषदेत सांगितले.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.याच दिवशी एमपीएससीची संयुक्त पूर्व गट-ब परीक्षा आहे. मतमोजणी व परीक्षेची वेळ एकत्र आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. असून एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी किंवा तत्काळ स्पष्टता द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट चकरी वळणावर नेपाळी ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी पाचच्या दरम्यान घडली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यानुसार आजच्या दिवसात ते सकाळी ११.३० वाजता- पुतीन राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊनरात्री ९ वाजता रशियाला रवाना होणार आहेत.
तपोवन येथील वृक्षतोडीचं समर्थन करताना भाजप नेते नितेश राणे यांनी अजब युक्तीवाद केला आहे. तपोवनातील वृक्षांची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का बसतात असा सवाल उपस्थित केला होता. याच वक्तव्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिलेश चित्रे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? असा सवाल करत त्यांनी राणेंना डिवचलं आहे.
नवले ब्रीज परिसरातील अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची आणखी एक नवीन उपाय योजना करण्यात आली आहे. ती म्हणजे आता कात्रज बायपास मार्गावर वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक करण्याक आली आहे.
कामठीमध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजपने व्होट चोरी आणि गैरप्रकार केल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन एकता मंचने केला आहे. तर या गैरकारभाराला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.