Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केले. उमेदवारांना प्रचारासाठी उरले केवळ दहा दिवस, अकोल्याच्या एमआयएमच्या सभेत चेंगराचेंगरी, असुद्दीने ओवीसींचे अयोग्य वर्तन यासह 05 जानेवारी 2026 यासह राज्य आणि देशभरात दिवसभरात घडणाऱ्या सर्व राजकीय आणि सामाजिक घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

मुख्याध्यापकांना कुत्रे पकडायला सांगितलेलं नाही - शिक्षणाधिकारी

मुख्याध्यापकांना कुत्रे पकडायला सांगितलेलं नाही. तर मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेच्या आवारात भटक्या कुत्र्यांसंदर्भात काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच भटक्या कुत्र्यांपासून मुलांनी विद्यार्थ्यांनी दूर राहावं, त्यांच्याजवळ जाऊ नये तसंच कुत्र्याच्या लाळेपासून रेबीज हा आजार होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा परिषद नाशिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली.

"दोन भावांवर बोलल्याशिवाय त्यांना TRP मिळत नाही"; अमित ठाकरेंनी साटम यांना सुनावलं

भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी नुकतीच ठाकरे बंधुंवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती केली आहे. त्यामुळं यांच्या युतीवर साटम यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना मनविसेचे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी साटम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. दोन भावांवर बोलल्याशिवाय त्यांना TRP मिळत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

तो अनपेड ट्रोलर आहे. हे सर्व पैसे घेऊन काम करणारे आहेत. तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार? आम्ही पगार घेऊन आमच्या शहराची *** बसलो? उद्धव ठाकरे बरोबर बोलले ते तसंच काम करत आहेत, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी अमित साटम यांच्यावर सडकून टीका केली.

Narayan Rane : चिपळूणमधील गेस्ट हाऊसकडे राणे रवाना

चिपळूणमधील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात नारायण राणेंना भोवळ आली होती, त्यांचा आवाजही बसल्याने त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तर, या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र, आता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. आता माझी तब्येत ठीक असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाषणात बोलताना माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबेटिस शुगर सव्वातीनशेच्या वर गेली होती. त्यामुळे, मला अस्वस्थपणा आणि चक्कर आली होती.

Sanjay Raut : संजय राऊत यांनी दिली माहिती

मुंबईत ठाकरे बंधूंची एकच मोठी सभा शिवतीर्थावर होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, इतर अनेक सभा घेण्याऐवजी शिवतीर्थावर एकच दणदणीत आणि प्रभावी सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात शिवसेना भवनात चर्चा झाली होती. या चर्चेअंती शिवतीर्थावर एकत्रित शक्ती प्रदर्शन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Pankaja Munde : परळी धनुभाऊला देऊन टाकली : पंकजा मुंडे

परळीएवढंच प्रेम मी माळाकोळीवर करते. उलट परळीवर धनुभाऊला प्रेम करू द्या. देऊन टाकलाय त्यांना परळी. आता मला माळकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हटलं तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही प्रेम करा. मी माळकोळीवर प्रेम करते, असं मी धनंजय मुंडेंना म्हटलं आहे, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Narayan Rane : राजकीय निवृत्तीवरून नारायण राणेंचा यू टर्न; मी तसं म्हणालोच नाही

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी कोकणात बोलताना राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र, त्यावरून राणेंनी आज यू टर्न घेतला आहे. कोकणात काल बोलताना आता मी ठरवलं आहे की आता घरी बसायचं. पण आज त्या वाक्यावरून नारायण राणेंनी यू टर्न घेत मी लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही, तर माझ्या पदाचा काय उपयोग? मग मी विचार करेन, असं माझं वाक्य होतं. माझ्या पदाचा उपयोग जनमाणसांना होत नसेल किंवा होऊ देत नसतील तर पूर्णविराम असं मी म्हटलं होतं, असा दावा राणेंनी केला.

Tanajai Sawant : आता तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी दिली जाईल : तानाजी सावंतांचं मोठं विधान

तुळजापूरच्या नगराध्यक्षपदावरून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मोठे विधान आहे. ड्रग्ज प्रकरणी जामीनावर बाहेर असलेले विनोद गंगणेला जनतेने तुळजापूरच्या नगराध्यक्षपदी निवडून दिलं आहे. त्यामुळे तुळजाभवानीच्या मंदिरात मातेचा प्रसाद देण्याऐवजी येणाऱ्या भक्ताला ड्रग्जची एक पुडी दिली जाईल, असा दावा सावंतांनी केला आहे.

Sujat Ambedkar : नाना पटोले हा भाजपचा माणूस, त्यांनी काँग्रेस-वंचितची आघाडी होऊ दिली नाही : सुजात आंबेडकर

आम्ही २०१९, २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसच्या पुढे हात केला होता. तेव्हाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सरळ सरळ भाजपचे काम करत होते, असं आमच्या निर्दशनास आले होते. पटोले हे भाजपचे आहेत, ते भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष कसं केलं, हे कोणालाच कळलं नाही. पण त्यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती कधीच होऊ दिली नाही. आता एक काँग्रेसी माणूस काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्याने वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Congress News : सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार काँग्रेस नेत्यांनी केला : अनंत गाडगीळ

सोमनाथ मंदिर पहिल्यांदा उद्‌ध्वस्त झालं, त्या घटनेला एक हजार वर्षे पूर्ण झाली आहे, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरावर विशेष लेख लिहिला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ यांनी टीका केली आहे. मोदी यांचे सर्व लेख वाचले आहेत. आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं. माझा काही त्यावेळी जन्म झालेला नव्हता. पण मी जे ऐकले आहे. ते असं की, काँग्रेस पक्षाची एक बैठक होती. त्यात वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं की आपल्या मंदिरांची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. त्यांनी काकासाहेब गाडगाळी आणि कन्हैयालाल मुन्शी यांच्यावर जबाबदारी टाकली होती. त्यांनी गुजरातमध्ये वेळोवेळी मुक्काम करून त्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला, असा दावा गाडगीळ यांनी केला आहे.

Ajit Pawar : युतीधर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे : अजित पवार यांचे भाजप प्रदेशाध्यक्षांना उत्तर

महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आमने सामने आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेले बरोबर आहे. युतीधर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे. आम्हीपण युतीधर्म पाळतो आहोत, असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिले आहे.

Devendra Fadnavis : पुण्यात फडणवीसांच्या दोन प्रचार सभा

पुण्याच्या कात्रज भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या सभा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Mahanagarpalika Election : बिनविरोध निवड आता 'रडार'वर! हायकोर्टात याचिका दाखल

राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाऐवजी न्यायालयाच्या थेट देखरेखीखाली चौकशी करावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. ही याचिका मनसेकडून असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis News : काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबईचा महापौर हिंदू मराठीच होणार, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पलटवार केला आहे. मुंबईचा महापौर दलित वंचित का होऊ शकत नाही? दलित महिला का होऊ शकत नाही?बौध्द, जैन, शीख व अल्पसंख्याक का होऊ शकत नाहीत? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने समानतेचा मार्ग दाखविला. आज त्याच संविधानाची शपथ घेऊन संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री त्याच संविधानावर घाला घालत आहेत. हा संविधानाचा अवमान आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde news : शिंदेंकडून ठाकरे, काँग्रेसला धक्का

कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व काँग्रेसला धक्का दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक विजय काटकर व काँग्रेस नेते सलीम काझी यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Congress News : राहुल नार्वेकरांचे वर्तन टपोऱ्यासारखे

राहुल नार्वेकरांचे वर्तन टपोऱ्यासारखे आहे. ते एकदिवस महाराष्ट्र बुडवील. संविधानाच्या छातीत सुरा खुपसण्याचं काम त्यांनी केलं. हरिभाऊ राठोड यांना दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Rahul Narwekar News : नार्वेकरांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निलंबित करण्याची मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला आज नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिले. टीकेकडे मी लक्ष देत नाही, असे सांगत त्यांनी जुन्या जखमा थंडीत उफाळून येतात, असा टोला ठाकरेंना लगावला.

Mahapalika Election : बिनविरोध उमेदवारांची आयोगाकडे तक्रार

महापालिका निवडणुकीत तब्बल ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरच संशय व्यक्त केला आहे. तसेच जाधव यांच्याकडून मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल केली जाणार आहे.

Ahilyanagar Politics : भाजप-अजित पवार राष्ट्रवादीच्या युतीसाठी अहिल्यानगरमध्ये चव्हाण, विखे अन् जगताप यांची रॅली

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर नगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते फोडण्यात आला. शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात विधिवत पूजा करून प्रचार रॅलीला सुरूवात करण्यात आली.

Jalna BJP Politics : जालना महापालिका निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना भाजपने डावल्याचा आरोप...

जालन्यात एकीकडे मुख्यमंत्र्यांची सभा असून, दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जालन्यात महापालिका निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना भाजपने डावल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांनी केला. जालन्यात दानवे, गोरंट्याल आणि लोणीकर यांनी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोणाकडे उमेदवारी मागायची? असा सवाल भाजप कार्यकर्त्यांचा उपस्थित केला. दरम्यान निष्ठावंतांना डावल्यामुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये नाराजी आहे.

Delhi Riots Case Hearing : उमर खालीद आणि शर्जील इमाम यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

उमर खालीद आणि शर्जील इमाम यांना दिल्ली दंगल प्रकरणात जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पण या गुन्ह्यातील अन्य 5 आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. उमर खालीद याला 13 सप्टेंबर 2020 मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Asaduddin Owaisi News : अकोल्यातील सभेतल्या गोंधळावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया समोर

अकोल्यात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळात चेंगराचेंगरी झाल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या सर्व घटनेला असदुद्दीन ओवेसी यांचा एक बेदबाबदारपणा कारणीभूत असल्याचं समोर आलं. त्यांनी उपस्थित गर्दीला व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानंतर या सभेत गोंधळ उडाला. दरम्यान, या प्रकरणावर बोलतांना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी, 'हे सर्व जनतेचं प्रेम' असल्याचं म्हटलं. पण आपल्या बेजबाबदारपणाबद्दल काहीही बोलायचं त्यांनी टाळलं.

Pune Chakan Update : पिसाळलेल्या कुत्र्याचा 27 नागरिकांसह लहान मुलांना चावा

चाकण बाजार समिती परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला करत, लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिकांसह एकूण 27 जणांचा चावा घेत जखमी केले. जखमींना चाकण इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून दुसरीकडून बिबट्यांच्या हल्ल्याची भिती असतानाच, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Parbhani Update : परभणी शहरातील मतदान केंद्र अचानक बदलल्याने मतदारांचे आंदोलन

परभणी महापालिकेतील मतदान केंद्र बदलत पाच किलोमीटर अंतरावर नेलं आहे. हे केंद्र शहरात घ्यावं, मतदारांना मतदानाला येणं सोपं होईल, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी करून देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. यामुळे प्रभागातील मतदार आक्रमक झालेत असून, आंदोलन सुरू केलं आहे. सत्ताधारी पक्षाला आमचे मतदान होवू द्यायचे नाहीत, असा आमदार राहुल पाटील यांनी केला आहे.

Sangali Politics : विश्वजीत कदमांकडून सांगली महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या छुप्या युतीवर शिक्कामोर्तब?

सांगली महापालिका निवडणुकाचे रणधुमाळी सुरू आहे. विश्वजीत कदम म्हणाले, 'आमचे सर्व 78 ठिकाणी उमेदवार उभे आहेत. समजने वालों कों बस इशारा काफी है?' असे बोलून कदम यांनी दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची छुपी असल्याचे मान्य केले आहे.

Raigad Politics : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रायगडमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेची मोर्चे बांधणी

राज्यात महापालिका निवडणुकांच वार सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याआधीच विभागनिहाय मेळावा घेत एकनाथ शिंदे शिवसेने अलिबागमध्ये मोर्चे बांधणी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी, आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसैनिकांना निवडणुकीला सज्ज होण्याचे अवाहन केल.

शिवसेना UBT पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्टार प्रचारकांची उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अनिल परब यांच्या सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे,अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई यांच्या नावाचा समावेश आहे.

मराठी माणूस ठाकरे बंधूंना मत देणार नाही - CM फडणवीस

ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी खूप उशीर केला आहे. ते 2009 मध्ये एकत्रित आले असते तर वेगळे चित्र दिसले असते. मात्र, आता त्यांना मराठी माणूस मत देणार नाही, अमराठी माणूस देखील मत देत नाही. त्यामुळे त्यांचा एकत्रित येण्याचा फायदा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

भाजपला सत्तेबाहेर फेका - सुजात आंबेडकर

"गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका न घेता भाजपने आपल्या मर्जीतले प्रशासक बसवून महापालिकेचा कारभार चालवला आहे. जनतेचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेणे आणि निवडणूक प्रक्रिया डावळणे हा संविधानाचा उघड अपमान आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला आणि भ्रष्ट राष्ट्रवादीला सत्तेबाहेर फेकून देण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली.

ओवेसींच्या सभेत गोंधळ

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या अकोल्यातील सभेदरम्यान रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गंभीर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भाषणादरम्यान ओवेसी यांनी उपस्थितांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली. शेकडो लोक एकाच वेळी पुढे सरकल्याने सभास्थळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आयोजकांवर पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT