नगरपरिषदा आणि नगरपालिकेंच्या निवडणुकीच्या बिगूल वाजला असून महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. अशातच रायगडमध्ये पक्ष फोडणीला देखील वेग आला असून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना होम ग्राऊंडवर (कोलाड) झटका दिला आहे. तटकरे यांचे खंदे समर्थक माजी सरपंच सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे या प्रमुख राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. कोलाडच्या नाक्यावर जाहिर सभा घेत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी लावण्यात आलेल्या 'कोलाड बदलतोय' या बॅनरची जोरदार चर्चा झाली. तर खासदार तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर घराणेशाही, विकासाच्या मुद्द्यांवर गोगावलेंनी कडाडून टिका केली.
नुकताच राज ठाकरे यांच्यासह विरोधकांची मुंबईत मतदार याद्यातील बोगसगिरीचा पर्दाफार्श करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी काही नावे घेतली होती. ज्यानंतर भाजपने यावर पलटवार करत तुम्हाला फक्त हिंदू मतदार दिसतात का असा सवाल केला होता. आता मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून मोहम्मद अली रोड, बहराम पाडा किंवा आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये घुसून दाखवा. आता ते मी दाखवतो. हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका हिम्मत असेल तर मोहल्लामध्ये जा, असे आव्हान दिले आहे. तर बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला असतात का? असा सवाल करत मोहल्लामध्ये जाऊन बडवण्याची भाषा करा असेही फटकारले आहे.
जिल्ह्यात सुरू असणार्या राणें बंधुंच्या वादावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपमधील वाद हा मीडियाच्या दृष्टिकोनातून असल्याचे म्हटलं आहे. तसेच भाजप कार्यकर्त्याला सन्मान जनक वागणूक मिळते का नाही? हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. तो त्यांना मिळावा म्हणून मी बोलतो. तर पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू असाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र येणाऱ्या या चर्चांवर बोलताना काही दिवस थांबा काळजी करू नका, तुमचे चॅनेल व्यवस्थित पद्धतीने चालतील याची काळजी आम्ही घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे. तर रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी आहेत. नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा स्वबळाची भाषा त्यांनी केली आहे.
पुण्यातील जुन्नर क्षेत्रात बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथे शासनाने केलेल्या ठोस उपाययोजनाही आता फेल गेल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणूक लढलेले शरद पवारांच्या गटाचे नेते सत्यशिल शेरकर यांच्या निवासस्थानी बिबट्याने त्यांच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून आत प्रवेश केल्याने अत्याधुनिक यंत्रणा ही कुचकामी ठरल्या आहेत. तर हा एका तरसाच्या मागे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसविण्यात आले असून त्यातील विद्युतप्रवाहाची तीव्रता सुमारे 9 हजार डीसी व्होल्ट इतकी आहे. इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असतानाही बिबट्याला धक्का बसला नसल्याचे आढळून आले आहे.
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे", असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्षांसह शेतकऱ्यांकडून टीका होत आहे. तर विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. तर 'जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल, त्याला एक लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल' अशी घोषणा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता विखे पाटलांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या वादानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच शेतकरी वर्गातही नाराजी पसरली होती. आपल्या चुकीच्या वक्तव्याची जाणीव झाल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्यांवर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. आपला डीएनए शेतकऱ्याचा आहे. पण आता भाषण करायची पंचाईत झालीय, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे बहुमतांनी विजयी झाले आहेत. जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे 29 पैकी 29 म्हणजे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रविण दरेकरांनी बाजी मारली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित 'इनोव्हेशन महाकुंभ 2025' चे उदघाटन पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे खरे 'स्टार्टअप कॅपिटल' आहे. महाराष्ट्र शासनाने स्टार्ट-अप धोरणात महिला-नेतृत्व असलेल्या स्टार्ट-अप्सना विशेष प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील एकूण स्टार्ट-अप्सपैकी 45% स्टार्ट-अप्स हे महिला नेतृत्वाखाली आहेत, त्यामुळे लवकरच महिला या क्षेत्रात आघाडीवर असतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याचे समजते. भालेराव हे २००९ ते १९ असे सलग दहा वर्षे भाजपाचे आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता.
नंदूरबारमध्ये स्कूल बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये २० ते ३० विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
आगामी निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक वायबी सेंटरवर झाला. त्या बैठकीत आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती भाजपसोबत जायचं नाही, अशी सूचना पक्ष नेत्यांना दिली आहे. निवडणुकीत उमेदवारी देताना मूळ ओबीसींना पहिले प्राधान्य दिले पाहिजे. जर उमेदवार मिळाला नाही तरच कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांना संधी देण्यात यावी, अशा सूचनाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
महायुती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार निर्णय होतील. राज्यातील सर्वच नगरपालिका, जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल, असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात वादग्रस्त विधान करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माजी मंत्री बच्चू कडू यांनी खणखणीत इशारा दिला आहे. विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस देण्यात यईल. मला भेटले तर मी त्यांची गाडी फोडणारच आहे, असे कडू यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर जालना पोलिसांनी आता तपासाला गती दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचा जबाब नोंदविण्याचा निर्णय जालना पोलिसांनी घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांंच्या नावाची चर्चा बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी सुरू आहे. त्याबाबत खुद्द अजित पवार यांनी भाष्य केले आहे. जय पवार हे बारामती नरगपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार नसतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते.
आंबेडकरी जनता आणि कार्यकर्ता हा आजपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत राहिला; पण तो कधीच सत्तेवर दिसला नाही. मात्र, या कार्यकर्त्यांना सत्तेत जाता यावा, यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. शिंदेंना मिळणाऱ्या दहा टक्के जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
ज्या लोकांना जनतेने चार वेळा डांबर फासलं आहे, त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. ज्यांच्यासाठी दोन दोन तास शेकडो लोकं थांबतात, त्यांचं ऐकायचं की चार वेळा ज्यांना जनतेने घरी पाठविले आहे, त्यांचं ऐकायचं, हे एकदा ठरविण्याची आवश्यकता आहे. पण राज्यात सुरू झालेली वैयक्तिक पातळीवर टीका करण्याची पद्धत आता रत्नागिरीतही आलेली आहे. मी संयमी आहे, त्यामुळे समोरच्यावर जास्त टीका करत नाही. जे राजकीयदृष्ट्या संपलेले आहेत, त्यांचा नामोल्लेखही करत नाही, असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.
'अजित पवारांकडे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे-मोठे घपले आणि त्यांनी लाटलेल्या जमिनीचा किस्सा आहे. पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना विजय माल्या पॅटर्नप्रमाणे देशातून या सरकारने पळवून लावलेलं आहे', असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
अहिल्यानगरमधील डाॅ. अनिल आठरे यांची 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांच्या फसवणूक झाली आहे. डाॅ. आठरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे, अमोल जाधव, बाबूसाहेब नांदे, सचिन शिंदे यांच्यासह 30 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगरमधील मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरत असले तरी गाळसाठ्यामुळे प्रत्यक्षात कमी पाणीसाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मुळा धरणाची उंची वाढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. धरणाच्या सांडव्यावरील अकरा दरवाजांना 0.50 मीटरचे फ्लॅप लावले जाणार आहेत. त्यामुळे 995 दशलक्ष घनफूट पाणीसाठा; तसेच 4479 हेक्टर सिंचन क्षेत्र पुन:र्स्थापित होणार आहे. धरणाच्या उंचीचा प्रस्ताव जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार तयार करून सरकारकडे पाठविला असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी अमरावतीत बैठक घेतलेल्या बैठकीस जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षशिस्त, संघटन बांधणी आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांवर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही मोडून काढण्यासाठी अमरावती जिंकण्याची तयारी करा, अशा सूचना खासदार सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
राज्यातील सर्वच नगरपालिकेंवर भाजपचा विजय होणार असल्याचा विश्वास मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. विरोधक जेव्हा हारतात तेव्हा मतदार यादीत घोळ वाटतो आणि जेव्हा जिंकतात तेव्हा मतदार यादीत घोळ का वाटत नाही, असा टोला मंत्री खडसे यांनी म्हटलं आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर इथल्या उड्डाणपुलाच्या खालचा काही भाग कोसळला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील मस्तान नाका इथल्या महामार्गावरील पुलाच्या खालील भाग कोसळल्याचे समोर आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरावस्था झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. सुदैवाने उड्डाणपुलाखाली वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल तयार केल्यापासून सोळा वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केलं नसल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, संघटनेत नवीन नेतृत्व कोणाच्या हाती देण्यात येणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून तात्यासाहेब माने यांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांनी केली आहे. ॲड. रोहिदास मुंडे यांचे नाव कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुखपदासाठी सर्वाधिक चर्चेत आले आहे. मुंडे हे पक्षनिष्ठ, संघटन कौशल्य असलेले आणि स्थानिक स्तरावर मजबूत पकड असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
बुलढाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे युतीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र शिंदे शिवसेना अन् भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे निरीक्षक आमदार आकाश फुंडकर यांच्याकडे युतीबाबत लेखी प्रस्ताव पाठविला आहे. आम्ही शेवटपर्यंत आशावादी आहोत, असे आमदार गायकवाड यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष म्हणून आघाडीवर राहील, असा विश्वास काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांची बैठक पार पडली. काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले.
नुकतेच्या पुणे दौऱ्यावर येऊन गेलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुण्यातील मनसे नेते भेटणार आहेत. पुणे शहरातील मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल घेऊन मनसे राज यांची भेट घेणार आहे. या भेटीत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत.
माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. तसेच “राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही” , असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी संतोष लहामगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार, काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे संतोष लहामगे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
'आरएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बंगळुरु येथील संघाच्या कार्यक्रमात बोलताना, 'हिंदू असण्याचा अर्थ आहे भारतासाठी जबाबदार असणं. हिंदू समाजाला सत्तेसाठी नाही तर राष्ट्र गौरवासाठी संघटित करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं लक्ष्य आहे', असं वक्तव्य केलं आहे.
केंद्रात सत्ता, राज्यातल्या सत्तेत पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे जिल्ह्यातही पक्षाचे संघटन मजबूत करायचे तर आता होणारी नगर पालिका निवडणुक सर्वच ठिकाणी स्वबळावर लढवावी, असा भाजपमधील काही नेते आणि पदाधिकार्यांचा मतप्रवाह आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्यामुळे भाजपलाही स्वबळाशिवाय पर्याय नाही. तर, परळीतही पक्षाने स्वबळ पॅटर्न राबवावा, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, यावर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
पार्थ पवार यांच्या मालकीच्या 'अमेडिया कंपनी'मार्फत करण्यात आलेल्या 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल किसनचंद तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण पुणे पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून तेजवानीची माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता तेजवणीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात मित्रपक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक देखील पार पडली आहे. त्यानंतर सावंता यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील अटल सेतूवरMMRDA कडून डागडुजीचे काम सुरू करण्यात आलं आहे. यावरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'जगात कुठल्याच देशामध्ये असा भ्रष्टाचार सहन केला जात नसेल, फेकनाथ मिंधे, भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखलंय. मागच्या वर्षी उद्घाटन झालेल्या या पुलाचा काही भाग खराब झाल्याने एमएमआरडीएने डागडुजीचे काम हाती घेतलं आहे.'
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'स्वस्तात जमिनी खरेदी करून महागात विकण्यासाठी रचलेली कारस्थानं समोर आली आहेत. पार्थ पवार यांच्याशी संबंधित गैरव्यवहार समोर आलाय. ज्यामध्ये शासकीय दस्तावेजांमध्ये मोडतोड केलीय आयटी पार्क उभारण्यासाठी जमिनी खरेदी करत असल्याचे सांगून अवघ्या 24 तासांत परवानग्या मिळवल्या. इतर शासकीय परवानग्या मिळवणं हे एकट्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काम नव्हे. हा संघटित गुन्ह्याचा प्रकार आहे. विविध मंत्रालयातील लोक यामध्ये सहभागी आहेत. हा घोटाळ्यात अनेक लोकांचे हात गुंतलेत.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.