Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : देश-विदेशात राजकीय क्षेत्रात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi latest Politics live news updates 7th october 2025:राजकीय आणि प्रशासकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

Mangesh Mahale

मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळं बालकांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ल नागपूरमध्ये दाखल

मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळं आतापर्यंत २० बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ल नागपूरमध्ये दाखल झालेल्या मुलांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात शुक्ल यांनी मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच रुग्णालयातील डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.

तुकडाबंदी कायद्यात सुधारणा!  ज्या नोंदणी थांबल्या त्या पुन्हा सुरु होणार

राज्य मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत तुकडा बंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियमावली मंजूर करण्यात आली. रहिवासी विभागात तुकडे बंदी कायदा निरस्त करणार आहोत. आतापर्यंत झालेले तुकडे कायदेशीर स्वरुप देतो आहे. ज्या नोंदणी थांबल्या आहेत, त्या आता सुरु होतील. याबाबत एक नियमावली महसूल विभाग जाहीर करणार आहे.

Dhule Court : मुख्याध्यापकाचे दीड कोटी वेतन थकले, शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त..

धुळ्यातील न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. एका शाळेतील माजी मुख्याध्यापकांचे दहा वर्षांचे 1 कोटी 36 लाख रुपयांचे वेतन थकीत असल्याने न्यायालयाने हा आदेश दिला. गुरुदत्त विद्या प्रसारक संचालित आदर्श माध्यमिक विद्यालयात तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांना संस्थेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे निलंबन केलं. दहा वर्षे मुख्याध्यापक असतानाही त्यांचा थकीत पगार दिला नव्हता. त्यामुळे विश्वास पाटील यांनी नाशिकमधील शाळा प्राधिकरण न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

IAS Transfer : राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, नाशिक, जळगाव आणि पुणे  जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय कोलटे यांची पुणे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने ही बदली यादी मंगळवारी जारी केली आहे.

Pimpchi Chinchwad : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाली आहे. पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर होऊन चोवीस तास ही उलटले नाहीत, तोवर शेखर सिंह यांची बदली झाली आहे. प्रभाग रचनेत संभाव्य बदल न घडल्यानं ही बदली झाल्याची चर्चा सुरु आहे. शहरातील 32 प्रभागांची जाहीर झालेली रचना ही भाजपसाठी अनुकूल असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल ठरणार असल्याचे बोलले जाते. 

Reservation Case : आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या चिठ्ठ्या प्लांट, लातूरमधील तीन प्रकरणात गुन्हा दाखल

आरक्षणाच्या लढाईत काहींनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले. मात्र, काही ठिकाणी आत्महत्येचं कारण वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरक्षण लढ्यात ज्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न झाले आहे. लातूर जिल्ह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून, त्या नंतर ‘प्लांट’ करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Manorama Khedkar : चालकाच्या अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकर पोलीसांच्या ताब्यात

वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील ऐरोली येथून एका ट्रक क्लिनरचे अपहरण झाले होते. हा चालक पूजा खेडकर यांच्या पुण्यातील चतुश्रृंगी भागातील घरी आढळला होता. याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Ajit Nawale : पॅकेज नव्हे,  नुकसानग्रस्तांच्या हाती भोपळा..

अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये शेतकरी कर्जमाफी करण्याचे टाळण्यात आले आहे. हे पॅकेज नाही, तर सरकारने नुकसानग्रस्तांच्या हाती दिलेला भोपळा असल्याची टीका किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले यांनी केली. शेतकऱ्यांनी कर्ज काढून  बियाणे, खते व निविष्ठा विकत घेतल्या होत्या. अतिवृष्टीमध्ये त्या पाण्यात गेल्या आहेत. शेतीतून उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडणे अशक्य आहे. अशावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. शेतमजूर व महिलांचे बचत गट व मायक्रोफायनान्सचे कर्ज सुद्धा माफ करावे अशी मागणी करण्यात येत होती.

Shivsena UBT : लातूरमध्ये बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहाचा हाॅल न दिल्याने शिवसैनिकांचा राडा

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये तोडफोड करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमुक्ती, ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी ११ आॅक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी बैठक शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी घेतली. बैठकीसाठी शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहातल्या हॉलची मागणी केली होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी अचानकपणे हॉल उपलब्ध करून देता येणार नसल्याचे सांगीतले. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी हॉलच्या दरवाजाची काच फोडत संताप व्यक्त केला.

Sujay Vikhe : साई दर्शनाला येणाऱ्या भाविकांच रिस्ट्रेशन बंधनकारक करा..

साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करा, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. तिरुपती बालाजीला जो नियम आहे, तोच नियम शिर्डीला लागू झाला पाहिजे, असंही ते म्हणाले. सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करावं. नाहीतर यापुढे कोणी बॉम्ब ठेवून जाईल, आपण शोधत बसू. सीसीटीव्हीवर दिसला तरी तो कोण, हे देखील सापडणार नाही, असंही विशे यांनी नमूद केले.

Guatami Patil : फक्त गाडी माझी, अपघाताशी संबंध नसताना मानसिक छळ का?

ही गाडी फक्त माझी होती. माझा या सगळ्या अपघाताची काहीही संबंध नसल्याचे गौतमीने स्पष्ट केलं आहे.  मी माझ्या खासगी कामासाठी दुसरीकडे होते, विनाकारण या सगळ्या प्रकरणात मला ट्रोल केलं गेलं आहे.  पाच दिवस माझा मानसिक काही प्रमाणात छळ केला गेल्याचही गौतमी पाटीलने सांगितले. ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही, मात्र अशा प्रकारे एखाद्याची प्रतिमा मलीन करणं हे चुकीचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असे गौतमी पाटील म्हणाली.  

या माणसाला एकतर काही येत नाही, टीव्ही चालू झाला की बोलायला सुरुवात करतात. तिकडचे त्यांचे लोक मॅनेज आहेत, कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास देखील आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. आमच्या सगळ्या रीट याचिका अजूनही जिवंत आहेत, काहीच फेटाळलेले नाही, असा दावा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते एक मराठा लाख म्हणतात, पण आम्ही ३७४ जाती आहोत. मात्र आपल्याला ओबीसी म्हणून एकत्रित लढाई लढावी लागेल, असेही भुजबळ म्हणाले. 

Marathwada Flood Relief: पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकी

जखमी व्यक्तींना : 74,000 रुपये ते 2.5 लाख

घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान: 5000 प्रतिकुटुंब

कपडे, वस्तूंचे नुकसान: 5000 प्रतिकुटुंब

दुकानदार, टपरीधारक: 50,000 रुपये

डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना : 1,20,000 रुपये

डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : 1,30,000 रुपये

अंशतः पडझड: 6500 रुपये

झोपड्या: 8000 रुपये

जनावरांचे गोठे: 3000 रुपये

दुधाळ जनावरे: 37,500 रुपये

ओढकाम करणारी जनावरे: 32,000 रुपये

कुक्कुटपालन: 100 रुपये

सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त पुण्यात NCPचे आंदोलन

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यात आंदोलन सुरु आहे. न्यायपालिकेवर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला म्हणत पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरातील चौकात पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी आधी मोठे पॅकेज

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले. विद्यार्थ्यांच्या शालेय-कॉलेज फीची माफी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे मदत केली जाणार, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं! एकनाथ शिंदेचा दावा

राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता राज्यातील महायुती सरकारने पॅकेजची घोषणा केली आहे. खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख देण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. त्यानुसार आमच्या सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तामिळनाडू आणि पंजाबपेक्षा मोठे पॅकेज दिल्याचा दावा केला आहे.

Ambadas Danve : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठवाड्यात 11 तारखेला मोठं आंदोलन, अंबादास दानवे यांची सरकारवर टिका

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठवाड्यात 11 तारखेला मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप महायुती सरकारवर टिका केली. शेतकऱ्यांच्या स्थितीवर सरकार मदत करणार नसल्याचं दिसत नाही, राज्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री येतात, अहवाल पाठवा म्हणतात. मात्र राज्य सरकार हालायला तयार नाही, अशी टिका अंबादास दानवे यांनी केली.

Yavatmal ShivsenaUBT Politics : शिवसेना ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक, वणी इथं शिवसैनिकांचा मोठा मोर्चा

यवतमाळमधील वणी इथं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जिल्हाप्रमुखांसह 13 पदाधिकाऱ्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करत अटक केली. या कारवाईच्या निषेधार्थ खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणीत मोर्चा काढण्यात आला आहे.

खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख, अतिवृष्टीग्रस्तांसाठीही पॅकेज जाहीर

राज्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट झाले, तर कुठे शेत जमीनच खरडून गेली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या मागणी दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी घोषणा केली. त्यांनी, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीच्या पॅकेजचेही घोषणा केली आहे.

सावंतवाडीत नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा ठाम दावा 

आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकताच जाहीर झाले आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची देखील घोषणा झाली आहे. यावरून आता रस्सीखेच पाहायला मिळत असून माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काय म्हणाले केसरकर पाहा...

गौतमी पाटीलचा इंदापुरातला शो बंद पडणार : गनिमी कावा संघटनेचा इशारा

काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलाजवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारच्या घटकेनं एका रिक्षा चालकाला जबर मार बसला होता. या अपघातात गौतमीच्या कारचेही नुकसान झाले होते. ज्यानंतर तिच्यावर गुन्हा देखील नोंद झाला होता. पण जखमी झालेल्या रिक्षाचलक सामाजी मरगळेंना मदक करण्यात आलेली नाही. यावरून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मंगळवारी इंदापूरमध्ये होणारा कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा गनिनी कावा संघटनेने दिला आहे.

गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार : पुणेकरांचा संताप

गेल्या आठवड्यात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता. ज्यात तिच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती, ज्यामध्ये रिक्षाचालक जबर जखमी झाला होता. मात्र त्याची काहीही मदत करण्याऐवजी कालचालकाने तेथून पळ काढला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्याने थेट भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर गौतमीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. एवढे होवूनही तिच्याकडून रिक्षाचलक सामाजी मरगळे कोणतीच मदत न झाल्याने पुणेकरांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. गनिमी कावा संघटनेतर्फे पुण्यातील बालगंधर्व चौकात गौतमी पाटीलच्या विरोधात आंदोलन करण्यात आले असून तिच्या पोस्टरला जोडेही मारण्यात आले. तसेच गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार आहे अशा शब्दांत तिच्यावर टीकाही करण्यात आलीय.

सरकार फक्त शक्तीपीठासाठी 86 हजार कोटी रुपये देण्यात आणि त्याची टक्केवारी घेण्यात मशगुल : अंबादास दानवे

राज्याच मोठ्या प्रमाणावर झालेल्या अजितवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठवाड्यात भव्य आंदोलन येत्या 11 तारखेला होणार असून शेतकऱ्यांच्या स्थितीवर सरकार मदत करणार नसल्याचं दिसत असल्याचा दावा केला आहे. तसेच सरकार फक्त शक्तीपीठासाठी 86 हजार कोटी रुपये देण्यात आणि त्याची टक्केवारी घेण्यात मशगुल असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Maratha-Kunbi GR : मराठा समाजाला मोठा दिलासा; हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागून आहे.

Latur news : लातूरमध्ये ठाकरेसेनेने विश्रामगृहाच्या काचा फोडल्या

लातूरमध्ये ठाकरे सेनेने विश्राम गृहाच्या काचा फोडल्या आहेत. तोडफोडीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे लातूर दौऱ्यावर आहेत. वेळेवर हॉल उपलब्ध करुन न दिल्याने काचा फोडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Maharashtra Environment : पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या अहवालात म्हटले आहे. 2022च्या तुलनेत 2023 मध्ये पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यात 30 टक्क्यांनी वाढ झाली. अहवालानुसार 2023मध्ये पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यांची चार हजार 854 प्रकरणे नोंदवण्यात आली.

Ahilyanagar Crime Update : गोरक्षकराचा खुनाचा प्रयत्न, चौघांविरोधात गु्न्हा दाखल

अवैधरित्या चावलेल्या गाईची सुटका करण्यास आलेल्या गोरक्षकांच्या अंगावर मालमोटार घालून त्यांना जखमी करण्याचा प्रकार अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात (ता. नगर) घडली. सतीश मोरे (वय 32, रा. सौरभनगर, नागरदेवळे) असे जखमी झाल्याचे नाव आहे. सतीश मोरे यांच्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Manikrao Kokate Vs Rohit Pawar : माणिक कोकाटे यांचा जबाब नोंद; आमदार रोहित पवार विरोधी खटला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या फौजदारी खटल्यात क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांनी सोमवारी न्यायालयात जबाब नोंदविला आहे. विधिमंडळातील कथित रमी प्रकरणात क्रीडामंत्री कोकाटे यांनी आमदार पवार यांना नोटिस बजावत बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली होती.

Ahilyanagar Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील 15 पालिकांचे नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यातल 15 पालिकांचे नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर असून, त्यात 11 नगर परिषद, चार नगरपंचायतींचा समावेश आहे. देवळीप्रवरा, श्रीगोंदे, श्रीरामपूर, नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. शिर्डी अनुसूचित जाती महिला, राहुली अनुसूचित जमाती. कोपरगाव, पाथर्डी व राहाता नागरिकांचा प्रवर्ग. जामखेड, संगमनेर व शेवगाव खुल्या प्रवर्ग महिला. नेवासा, देवळी प्रवरा, श्रीगोंदे, श्रीरामपूर खुला प्रवर्ग. पारनेर व अकोले नागरिकांचा मागास प्रवर्ग. कर्जत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

Pimpri Chinchwad Police : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तब्बल 43 लाख 95 हजार रुपयाची मदत

Pimpri Chinchwad Police 1

राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड पोलिस सरसावले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल 43 लाख 95 हजार रुपयाच्या धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनयकुमार चौबे यांनी हा धनादेश सुपुर्द केला आहे.

Deepak Kesarkar : सावंतवाडी नगरपालिकेवर नगराध्यक्ष शिवसेनेचाच बसणार; दीपक केसरकर यांचा ठाम दावा

नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत महायुतीत रंगत वाढली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर ठाम दावा केला असून, आमचा नगराध्यक्ष असावा, अशी भूमिका माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Shivsena Politics : खासदार श्रीकांत शिंदेंकडून अंबरनाथ नगरपालिकेसाठी इच्छुकांशी साधला संवाद

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील सर्व 29 पॅनेलमधील इच्छुकांशी संवाद साधला. अंबरनाथ शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अंबरनाथमध्ये आले होते. प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागात आजवर झालेली कामं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं मतदान आणि पक्षांतर्गत वातावरण याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

BEED Update : बीडच्या कपिलधार वाडीत डोंगर खचला; रस्त्याचा चार फुटापर्यंत भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

बीडच्या कपिलधारवाडी गावाला मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने मोठा धोका निर्माण झाला आहे. गावातील घरं, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने ग्रामस्थं भयभीत झाले आहेत. दरम्यान ही गंभीर परिस्थिती पाहता तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनी गावात पाहणी केली. ग्रामस्थांनी स्थलांतर करून पुनर्वसनाची मागणी केली. गावातील रस्त्यांना जवळपास एक ते चार फूट अंतराच्या भेगा पडल्या आहेत. चार दिवसांपासून या गावातील ग्रामस्थं जीव मुठीत धरून राहत आहेत. प्रशासनाने कपिलधारकडे जाण्याचा रस्ता तूर्तास बंद केला आहे.

Chief Justice B R Gavai : मनुवादी लोकं सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर कंट्रोल आणू पाहत आहे; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

'मनुवादी लोकं सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर कंट्रोल आणू पाहत आहे. मनुवादी प्रवृत्ती देशात आणू पाहात आहे. मनुवादी लोकांने सरन्यायाधीशांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध आम्ही करतो,' असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन केलं जात आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत उद्या मोठा फेरबदल

उद्या (बुधवार) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. हे वाहतूक बदल 8 ऑक्टोबरला सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लागू असतील.

विषारी कफ सिरपमुळे चिमुकलीचा मृत्यू

नागपूरमध्ये विषारी कफ सिरपमुळे आणखी एका बाळाचा मृत्यू झाल्याची दूर्दैवी माहिती मिळत आहे. धानी डेहरिया या 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान धानीचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धानीला नागपुरात उपचारासाठी गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते.

वीज कर्मचारी संपावर जाणार

महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांचे सुरू असलेले खाजगीकरण, इतर धोरणात्मक विषय व निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने 9 ऑक्टोबर 2025 रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे

उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन यांनी आज बैठक बोलावली

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज दुपारी 4 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल आणि राज्यसभेतील इतर अनेक पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहतील. पदभार स्वीकारल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी पहिल्यांदाच ही बैठक बोलावली आहे.

Shivsena Live:न्यायमूर्ती सूर्यकांत निकाल देणार

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या (बुधवार) अंतिम सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे ८ ऑक्टोबरला सुनावणी घेतील, अशी अपेक्षा आहे.

पुरंदर विमानतळासाठी तीन गावातील मोजणी पूर्ण

पुरंदर विमानतळासाठी तीन गावातील मोजणी पूर्ण झाली आहे. मुंजवडी, उदाची वाडी आणि एकतपुर अशी ही गावे आहेत. 807 एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासन ताब्यात येणार आहे. येत्या शनिवारपासून कुंभारवळ, खानावळ या दोन गावातील मोजणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT