शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवत जोरदार टीका केली आहे. 'जागे रहा, नाहीतर अॅनाकोंडा येईल,' असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. पक्ष आणि चिन्ह चोरल्यानंतरही त्यांची भूक शमत नाही, असे म्हणत त्यांनी मुंबई गिळायला 'अॅनाकोंडा' आल्याची टीका केली. जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक यंत्रणेच्या सर्व्हरबद्दल आणि मतदार याद्यांमधील गोंधळाबद्दल केलेल्या आरोपांचा संदर्भही त्यांनी दिला. सदोष आणि चोरी करून जर निकाल आधीच ठरवून निवडणुका घेतल्या जाणार असतील, तर त्या होऊ द्यायच्या की नाही, हे जनतेने ठरवावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.
लोकशीत संविधानेन जो अधिकार दिला आहे त्याच रक्षण करण्याची आज वेळ आली आहे. त्यामुळे येत्या काळात सगळं विसरून आम्हाला एक व्हावे लागेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोर्चावेळी आवाहन केले.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी टीका करताना त्यांनी अॅनाकोंडाला आता कोंडवेच लागणार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव न घेता केली.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात मार्गदर्शन करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राग आणि ताकद दाखवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दुबार मतदारांची लोकसभानिहाय यादीच राज ठाकरेंनी जाहीर केली. त्यासोबतच मतदार याद्यामध्ये अनेक दुबार मतदार असल्याचे राज ठाकरे यांनी पुराव्यासह दाखवून दिले.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार सहभागी झाले आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राग आणि ताकद दाखवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार सहभागी झाले आहेत. या मोर्चात चले जाव भाजप अशी घोषणा असणारे फलक दिसत आहेत. सोबतच या मोर्चात भाजाप, मतचोरीविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या सत्याचा मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. त्यांच्यासॊबतच मोर्चात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विद्या चव्हाण, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, अनिल देसाई, नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, विनायक राऊत, अंबादास दानवे, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, राजू पाटील, नितिन सरदेसाई, सुनिल प्रभू हे नेते सहभागी झाले आहेत.
भाजपच्या मूक आंदोलनात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार योगेश सागर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय, मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्यासह मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या सत्याचा मोर्चा सुरू झाला आहे. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. या मोर्चात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पाटोले व भाई जगताप सहभागी झाले आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येत असलेल्या सत्याचा मोर्चात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे मेट्रो सिनेमाच्या बाहेर येऊन थांबले आहेत. त्या ठिकाणावरून पवार हे मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटीलही आहेत.
सत्याचा मोर्चात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे ‘सिल्व्हर ओक’वरून रवाना झाले आहेत. ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू हॉटेलच्या बाहेर पडले आहेत. ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी दोन्ही बंधू चालत फॅशन स्ट्रीटकडे निघाले आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या सत्याचा मोर्चा अवघ्या दहा मिनिटांत सुरू होणार आहे. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहे. हे सर्व नेते चालत जाऊन मुंबई महापालिकाच्या आवारात होणाऱ्या सभास्थळी जाणार आहेत. त्या ठिकाणी हे नेतेमंडळी मोर्चाकरी, आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहेत.
विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. त्या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सहभागी झाले आहेत. विरोधकांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे कारण काय आहे. तर विरोधकांकडून फेक नेरटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशाबाहेरील एनजीओंनी हा देश अखंड राहू नये, म्हणून येथील कायदा सुव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केला हेाता. लोकसभा निवडणुकीत संविधनाच्या संदर्भात फेक नेरटिव्ह पसरविण्यात आला होता. या फेक नेटिव्हमुळे समाजात लेाकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने अनेकदा केली आहेत, त्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोबत निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार की नाही, अशी चर्चा सकाळपासून रंगली होती. मात्र, काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे नेते मोर्चात सहभागी झाले आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाची निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही तर राज्यात लोकशाहीच्या मार्गाने उद्रेक होईल, अशी भीती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.
पराभवाच्या कारणांची कारणमिमांसा न करता विरोधकांच्या रडीचा डाव खेळला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव निश्चित आहे, त्यामुळे त्या पराभावाची कारणे शोधण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई प्रदेशाध्यक्ष या मोर्चात कुठे आहेत, असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे.
महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. फॅशन स्ट्रीटपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात विरोधकांच्या मोर्चाला सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करून उत्तर देण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. या मोर्चाच आयोजक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना मोर्चाला परवानगी द्या, अशी विनंती केली आहे. मात्र अजूनही मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरी मोर्चा निघणारच आहे, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या ‘वेस्ट एंड’ हॉटेलमध्ये थांबले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही मातोश्रीवरून निघाले आहेत. ते थेट राज ठाकरे थांबलेल्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये येणार आहेत. त्या ठिकाणाहून दोन्ही ठाकरे बंधू हे मोर्चासाठी रवाना होणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघाले आहेत. ते मोर्चात सहभागी होणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मुंबईतत मोर्चा काढण्यात येत आहेत. या मोर्चासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सुमारे ८० पोलिस अधिकारी आणि चारशेहून अधिकारी पोलिस कर्मचारी या मोर्चासाठी बंदोबस्तावर आहेत. राज्य राखीव दलाच्या चार ते पाच तुकड्याही तैनात असणार आहेत. सुमारे पाचशे पोलिस कर्मचारी हे मोर्चाच्या बंदोबस्तासाठी फॅशन स्ट्रीट आणि सीएमटी परिसरात असणार आहेत.
मनसे-महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून भाजपने मूक आंदोलन न करता स्वतःच्या "थोबाडीत मारा आंदोलन" केले पाहिजे,असा टोला मनसेचे गजानन काळे यांनी लगावला आहे. मतदार यादीतील दोष दूर करून निवडणुकांना सामोरं जायची तयारी आहे, हे बोलण्याची हिम्मत भाजपने अगोदर दाखवावी. बाकी, सदोष यादीबद्दल मूक असणाऱ्यांना मूक आंदोलनच सुचणार! असेही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत 'सत्याच्या मोर्चा'ला थोड्याच वेळात सुरूवात होत असून, तशी वातावरण निर्मिती झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या मोर्चाला राज ठाकरे यांनी लोकल रेल्वेने प्रवास करून चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, सोलापूर,सांगली, कोल्हापूर, विदर्भ आणि मराठवाड्यातील ठाकरे बंधू यांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.
शरद पवार उद्या (रविवारी) अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्ताने ते येत आहेत. दरम्यान, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस' सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या 43 जागांवर आम्ही लढणार हे फिक्स आहे. पक्षात नव्याने आलेल्या आणि घटकपक्षातील उमेदवारांना हाच न्याय असेल. तेथे उमेदवार कोण द्यायचे, हा निर्णय सर्व्हेनंतर मेरिटवर होईल. उर्वरित जागांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली.
निवडणूक आयोगाकडे दुबार-तिबार नाव कमी केली पाहिजे, अशी आमची देखील मागणी आहे, असे भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. लोकसभेत खोटारडेपणा केला. तेव्हा महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. तेव्हा ईव्हीएम मशीनमध्ये दोष नव्हता का? असा प्रश्न देखील बावनकुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी माजी आमदार वैभव पिचड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे, रायगड आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या मतदारसंघातून पिचड यांच्यासह नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. इतर आठ जणांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
'सत्याचा मोर्चा'साठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे दादर ते चर्चगेट असा लोकल रेल्वेने प्रवास करणार आहेत. राज ठाकरे रेल्वे स्थानकावर पोचले असून, तिथं मनसे सैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा बोगस याद्या सापडल्या तर संबंधित बूथवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हात पाय तोडणार, अशी धमकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा निवडणूक आयोगाचे कार्यालयात देखील फोडण्याचा इशाराही दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंबे गावाजवळील स्मशानभूमीत एक रहस्यमय आणि भयावह दृश्य समोर आले आहे. अज्ञात व्यक्तींनी इथं अघोरी पूजेचा अनोखा प्रकार केला आहे. सकाळी स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना धक्का बसला. चार व्यक्तींचे फोटो, लिंबू-मिरच्या, काळी बाहुली, कवाळ आणि गुलाल लावलेली पूजेची मांडणी स्मशानभूमीत दिसून आली.
महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा निघणार आहे. मुंबईच्या फॅशन स्ट्रीट येथून सुरू होऊन हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत जाईल. या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मातोश्री परिसरात उद्धव-राज ठाकरे यांचे एकत्र बॅनर्स झळकले आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये उतरणार आहेत त्यामुळे मोर्चेकरी लोकलने प्रवास करत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे. कोणत्याही प्रकारे लोकलचं नुकसान होऊ नये या दृष्टीने परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाविरोधात विरोधातील सत्याचा मोर्चा आज निघणार आहे. पण या मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. परवानगी दिली नसली तरी विरोधक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मुंबईतील विद्यमान कबुतरखाने माननीय बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कबुतरखान्यांबाबत, नागरिकांच्या हरकती, सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही माननीय न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मुंबईत (१) जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर), (२) के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम, (३) टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली – मुलुंड जकात नाका, ऐरोली – मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व), आणि (४) आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
मतदान यादीतील फेरफार, दुबार नावे आणि निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरुद्ध विरोधक एकत्र आले आहे. त्यांनी 'सत्याचा मोर्चा' काढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेकापसह सर्व डावे पक्ष या मोर्चात सहभागी होत आहेत. आज शनिवारी (1 नोव्हेंबर) रोजी दुपारी एक वाजता मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.