Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Update : काहीजण सुपारी घेऊन काम करतात, लक्ष्मण हाकेंवर विखे पाटलांची टीका

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापुजा केली, आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची राजकीय पक्षांकडून तयारी, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची शक्यता यासह देश आणि राज्यातील 02 नोव्हेंबर 2025 रोजीच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

काहीजण सुपारी घेऊन काम करतात, लक्ष्मण हाकेंवर विखे पाटलांची टीका

श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झालं. यावेळी विखे पाटलांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार टीका केली. त्यांनी, काही लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, तर काही सुपारी घेऊन काम करतात. माझ्यावर कोण टीका करतं याकडे मी लक्ष देत नाही, असे म्हटलं आहे.

Ajit Pawar : "आपल्या देशात सुद्धा ऑलिंपिक आलं पाहिजे" : अजित पवारांचं वक्तव्य

आपल्या देशात सुद्धा ऑलिंपिक आलं पाहिजे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. नुकताच त्यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांनी आपल्या देशात सुद्धा ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याची वेळ आली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच भारताची युवा पिढी क्रीडा क्षेत्रात झेप घेत आहे आणि आता भारताने जगातील सर्वात मोठ्या क्रीडा सोहळ्याचं आयोजन करावं, अशी मागणी त्यांनी केली.

Raigad Politics : राष्ट्रवादीचा शिवसेनेला पुन्हा धक्का, जिल्हा परिषदेचा संभाव्य उमेदवारच तटकरेंनी फोडला

आगामी निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या दासगाव खाडी पट्टा जिल्हा परिषद मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुशांत जाबरे यांनी शेकडे कार्यकर्त्यांसोबत खासदार सुनील तटकरे,स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे दासगाव खाडी पट्ट्यात आता राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे

Pune : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ; 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय आणि वाहन दिलं पेटवून

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील बिबट आणि मानव संघर्ष वाढत असून आज येथील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. घराजवळ खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला केला. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात हा तिसरा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संतप्त ग्रामस्थांनी चिमुकल्याचा मृतदेह घरासमोर ठेवून आंदोलन करत बिबटे जेरबंद करावेत अशी मागणी केली आहे. तसेच संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे कार्यालय आणि वनविभागाची गाडी पेटवून दिली. यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

Olympic Association Election : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग चौथ्यांदा बाजी मारली आहे. त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. 31 सदस्य संघटनांपैकी 22 पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला

Bjp News : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

“परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन विजयासाठी संकल्प करणे योग्य आहे, मात्र निवडून आल्यानंतर देवाला आणि जनतेलाही विसरणे ही उद्धव ठाकरे यांची जुनी सवय आहे,” असा जोरदार टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली.

Shivsena News : आमदार संजय गायकवाड  बोगस मतदारांच्या मुद्यावरुन आक्रमक

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे बोगस मतदारांच्या मुद्यावरुन निवडणूक आयोगावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट निवडणूक आयोगाची लाजच काढली. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे 20 आणि 22 टक्के मतदान होतं, असे म्हणत आमदार संजय गायकवाड हे निवडणूक आयोगावर संतापल्याचं पाहायला मिळालं.

Sushma Andhare : तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर घेतला आक्षेप

ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे उद्या सकाळी 10:30 वाजता फलटण पोलीस स्थानकाला भेट देणार आहेत. फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी त्या पोलिसांशी चर्चा करतील. या प्रकरणाच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे.

Eknath Khadse : महायुतीत सारं काही आलबेल नाही : एकनाथ खडसे

सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार सरकारवर टीका करत आहे. याचा अर्थ असा आहे की, महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल चाललेले आहे, असं काही नाही. किशोर आप्पा पाटील यांनी आताच म्हटलं आहे की, शिवसेना भाजपची युती आमच्या मतदारसंघात शक्य नाही. भाजप शेवटपर्यंत झुलवत राहतात आणि फसवतात, असं विधान किशोर पाटील यांनी केलेले आहे, त्यामुळे महायुती सारंच काही आलबेल आहे, असं समजण्याचं काही कारण नाही, असा टोला आमदार एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार; ‘ज्यांची नोटीचोरी बंद झाली, त्यांनाच वोटचोरी आठवतेय’

ज्यांची नोटी चोरी बंद झाली, त्यांनाच आता वोटचोरी आठवत आहे. विरोधकांना आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते जिंकू शकत नाहीत, हे जाणून आहेत. त्यामुळे ते निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करून निवडणूक पुढे ढकलण्याचे षडयंत्र करत आहेत. मतदारयादीत घोळ नाहीत, असा दावा आम्ही कधीच केलेला नाही. पण, डुप्लिकेट नावाने दोन ठिकाणी मतदान केले आहे, हे विरोधकांना दाखवून द्यावे लागेल, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मोर्चावर केला.

Kishor Patil : माझ्या मतदारसंघात एक वर्षात महायुती सरकारने एक फुटकी कवडीसुद्धा दिलेली नाही : किशोर पाटील

एक फुटकी कवडीसुद्धा एक वर्षाच्या काळात माझ्या मतदारसंघाला मिळालेली नाही. आम्हाला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे एकमेव सहारा आहेत, असे आमदार किशोर पाटील सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, किशोर आप्पा पाटलांचा राग बरोबर आहे. कारण भाजपने माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं, पण किशोर आप्पांच्या मतदारसंघात केलेले नाही, हेही मान्य करतो.

Malegaon News : मालेगावमध्ये दोन मुलांच्या भांडणातून तुफान राडा; गोळीबार

मालेगावमध्ये दोन मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये मोठा राडा झालेला आहे. तो वाद हाणामारी आणि गोळीबारपर्यंत पोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा इतर साथीदारांचा शोध सुरू आहे

Narendra Bhondekar :  परिणय फुकेंवर आमदार नरेंद्र भोंडेकरांचा पलटवार; त्याचा भंडारा जिल्ह्याशी काय संबंध

एका नेत्याचा नातेवाईकाच्या नावाने कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावावरच सगळी कामे घेतली जातात. त्यात त्या नेत्याचे दहा टक्के आणि कंपनीचे दहा टक्के असे वीस टक्के कमिशन घेतलं जाते. अनेक लोकांना अमिष दाखवून स्वतःकडे ओढण्याचे कामही काही लोक करत आहेत. मागच्या चार वर्षांत सुमारे दोनशे कोटींचा भ्रष्टाचार भंडारा नगरपालिकेत झालेला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असा दावा परिणय फुके यांनी केला होता. त्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पलटवार केला आहे. फुकेंचा भंडारा जिल्ह्याशी काय संबंध आहे. ते कोणत्या भंडारा जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. मुळात संबंधित टेंडर त्यांना करू द्यायचे नव्हते. त्यावर पालकमंत्री गप्प बसत असतील ते सरकारचे अपयश आहे, अशी टीका आमदार नेंरद्र भोंडेकर यांनी केली.

Bhimrao Dhonde : आम्ही सुरेश धस यांच्या धमक्यांना भीत नाही; आम्हीपण याच तालुक्यातील : भीमराव धोंडे

आमदार सुरेश धस यांनी आम्हाला धमक्या देऊ नयेत. त्यांच्या धमक्यांना आम्ही भीत नाही. आम्हीपण याच तालुक्यातील आहोत. त्यांनी आमदारासारखं वागावं. त्यांचा काही गैरसमज झालेला असेल तर तो त्यांनी दूर करावा. आम्ही त्यांच्याबद्दल एकही शब्द वाईट बोललो नाही आणि बोलणारही नाही. पण आम्हालासुद्धा त्यांनी कमी समजू नये, असा इशारा भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आमदार सुरेश धस यांना दिला आहे.

Uddhav Thackeray : मुंबई महापौरपदासाठी ठाकरेंचं देवाला गाऱ्हाणं, २०१२ च्या विजयाचा दिला दाखला

मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट देवालाच गाऱ्हाणं घातलं आहे. 'मुंबई महापालिकेत आमचाच महापौर होऊ देत', असं साकडं उद्धव ठाकरेंनी मागाठाणे येथील मालवणी महोत्सवात बोलताना घातलं. यावेळी त्यांनी २०१२ सालच्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. २०१२ मध्येही असंच गाऱ्हाणं घातल्यावर सुनील प्रभू महापौर झाले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, येत्या ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षणाची सोडत निघणार आहे, त्यामुळे ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Laxman Hake : विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही

विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही सामाजिक न्याय म्हणजे हेच त्यांना कधी समजलं नाही. माहित असतं तर त्यांनी बेफिकीर बिनडोक पद्धतीने बोलले नसते. अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

अहिल्या नगर मधील बोधेगाव मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते

डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पावसाचा लपंडाव, वर्ल्ड कप फायनलची नाणेफेक लांबणीवर |

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट फायनलवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे सामन्याची नाणेफेक लांबणीवर पडली आहे. सामना आज होणार की नाही याबाबत संभ्रम असला तरी, पाऊस थांबून खेळ सुरू होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

Trupti Desai : चौथाऱ्यावर जाऊन दिला जाणारं शनी दर्शन नि:शुल्क करा; तृप्ती देसाई यांची मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर इथं चौथाऱ्यावर जाऊन शनी दर्शन घेण्यासाठी आकरण्यात येणारे शुल्क बंद करून सर्वसामान्यांना दर्शनाची संधी द्यावी. चौथाऱ्यावरील दर्शन शुल्क करा अन्यथा शनी शिंगणापूर इथं येत आवाज उठवू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. भाविकांनी शुल्क चौथाऱ्यावर दर्शन देण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी प्रशासक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Akola Politics Update : ''विदर्भाच राजकारण आणि देवाभाऊ पेज'वर आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्टवर कारवाईची मागणी'

Sujay Ambedkar Prakash Ambedkar

'विदर्भाच राजकारण आणि देवाभाऊ पेज' या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांवरील आक्षेपार्ह सिरीज चालवल्या जात असल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले गेले. अटक न झाल्यास अन्यथा अकोला जिल्ह्यासह राज्यात याचे तीव्र पडसाद उमटतील,' असा इशारा अकोल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दिला.

Rohit Pawar : याआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठलीही समिती गठीत नव्हती : रोहित पवार

'याआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठलीही समिती गठीत करण्यात आली नव्हती. यावेळी समिती घटीत करण्यात याच कारण काय? 2029 च्या विधानसभा निवडणुकीआधी कर्जमाफी करतील की काय, असं लोकांना वाटू लागल आहे. आज शेतकरी अडचणीत असताना त्याला मदत होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे सरकारशी झालेल्या तहामध्ये आपण कुठेतरी हरलो, असा आपल्याला म्हणावं लागेल,' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनावर दिली आहे.

Rohit Pawar On Election Commission : बाहेरून भाड्याने लोक आणून मतदान करून घेतलं जातं; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

'निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यावर कुठलाही दबाव असणं योग्य नसतं. आज निवडणूक आयोगावर मोठा दबाव आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये घोळ होतात. खोट्या आधारकार्डचा वापर करून दुसऱ्याच्या नावाने मतदान केलं जातं. बाहेरून भाड्याने लोक आणून त्यांचं आधारकार्ड तयार करून मतदान करून घेतलं जातं. यामुळे तुमचं लोकशाही आणि संविधान धोक्यामध्ये येत आहे,' असे घणाघात रोहित पवार यांनी जळगाव दौऱ्यात केला.

Nashik Crime Update : लहान मुलांच्या किरकोळ वादातून गोळीबार

नाशिकच्या मालेगावमध्ये काल रात्रीच्या सुमारास लहान मुलांच्या झालेल्या भांडणातून गोळीबार झाल्याची घटना घडली. मेहताब अली या संशयिताने हातात पिस्तूल आणि जमाव जमावून, लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. या प्रकरणी आयेशानगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Rohit Pawar : पिक विमावर बोलत असताना, पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांनी गोल-गोल उत्तर दिलं; रोहित पवार यांचा टोला

'अधिवेशनात मी एक रुपयाच्या पिक विमा संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळेस पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांनी गोल-गोल उत्तर दिली. चार ट्रिगर काढल्यामुळे आज या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, 17 हजार मिळतील आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना पाच रुपये आणि 25 रुपये मिळतात. शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. सरकारमध्येच असलेले आमदार या सरकारच्या विरोधात बोलायला लागले आहे,' असा टोला जळगाव दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी लगावला.

Sharad Pawar NCP : बिहारमध्ये भाजप 30 टक्के मते घेऊन सत्तेत येईल; आमदार उत्तम जानकर यांचा दावा

Uttam Jankar

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप मतचोरी करून सत्तेत येईल, अशी शंका देखील व्यक्त केली आहे. कालच मत चोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा झाला. त्यानंतर आमदार जानकर यांनी हा दावा केला आहे.

Ajit Pawar NCP : अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शेतकरी संतप्त झाले असून, कोल्हार-घोटी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. अकोले तालुक्यातील कळस इथं दीड तास रास्ता रोको करण्यात आला. सारखं सारखं फुकट, सारखं सारखं माफ, कशाला हवं, या अजित पवारांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

JOB Update : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकरभरतीमधून 'MKCL'ला वगळण्याची मागणी

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती आता IBPS, TCS किंवा MKCL यांसारख्या संस्थांमार्फत होणार आहे. यातून 'MKCL'ला वगळण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा समन्वय समितीने केली आहे. मूळ जिल्ह्यातील उमेदवारांना 70% जागा राखीव, तर इतर जिल्ह्यातील उमेदवारांना उर्वरित 30% जागांमध्ये संधी मिळणार असल्याच्या निर्णयाचे कौतुक केलं आहे.

Sharad Pawar Ahilyanagar : शरद पवार यांचा श्रीरामपूर दौरा रद्द

श्रीरामपूर तालुक्यातील बाभळेश्वर इथल्या नाथाजी म्हस्के पुतळा अनावरण सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहू शकले नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रावसाहेब नाथाजी म्हस्के यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि नाथाजी म्हस्के पुतळा अनावरण झाले. खासदार नीलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, शरद पवार यांच्या भगिनी मीनाताई जगधने, माजी आमदार सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज दुपारी घोषणा होणार

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची घोषणा आज दुपारी होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गटाची बैठक पार पडली. या बैठकीत अजितदादांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्षपद मोहोळ यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. तर आज अजित पवार आपल्या कार्यकारणीच्या सदस्यांची दुपारी घोषणा करणार आहेत.

DCC bank jobs Maharashtra : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत शासनाचा मोठा निर्णय

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक व्हाव्या आणि या भरतीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी राज्य सरकारने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती IBPS, TCS किंवा MKCL यांसारख्या विश्वासार्ह संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर या निर्णयामुळे पात्र उमेदवारांना न्याय्य संधी मिळणार असून भ्रष्टाचारावर आळा बसेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने काढलेला मूक मोर्चाला परवानगी होती का? संदीप देशपांडेंचा सवाल

भाजपने काढलेल्या सो कॉल्ड मूक मोर्चाला परवानगी होती का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तर केवळ मनसे आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आम्हांला या केसेसचा फरक पडत नाही. आमच्या अंगावर अशा अनेक केसेस आहेत आणि आम्ही असल्या केसेसला भिक घालत नाही असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव - आमदार किशोर पाटील

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचे मानधन एकनाथ शिंदेंनी सुरू केले. दीड हजार रुपयांची किंमत ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं मी जर का पुन्हा मुख्यमंत्री झालो तर 1500 रुपयांचे मानधन 2100 रुपये करणार आहे. पण एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव आहे, असं शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? - रोहित पवार

निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ‘सत्याचा मोर्चा’ला परवानगी नव्हती म्हणून गुन्हा, तर मग भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? परवानगी नसेल तर रवींद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका,उदय सांगळे भाजपवासी होणार!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील उमेदवारउदय सांगळे यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे.ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढली होती.

जिल्हा परिषदेसाठी 15 डिसेंबरला मतदान - दिलीप वळसे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पक्षाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पाच नोव्हेंबरला निवडणुकीची तारीख जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली. तसेच आपल्या माहिती प्रमाणे 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान होईल, असे सांगितले.

सिकंदर शेखला अडकवण्याचा प्रयत्न - रोहित पवार

पै. सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो. याबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात खा. सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास आहे, असे रोहित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली. नांदेडचे रामराव वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई वालेगावकर या वारकरी दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले तर पहिल्यांदा दोन शाळकरी मुलांना पुजेत सहभाग घेता आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT