Balasaheb Thorat Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : 'निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू...'; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2025, आज राज्यातील राजकीय, प्रशासकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

'निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू...'; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदारयादीत साडेनऊ हजारांहून अधिक नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी तक्रार करूनही काहीच दाद मिळत नसल्यानं "निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू आहे" असल्याचा हल्लाबोलही केला आहे.

रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, तो फुस्स फटाका...

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवाळीत सणानिमित्त राजकीय टोलेबाजी केली. त्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याची तुलना फटाक्याशी करण्यास असहमती दर्शवली. पण याचवेळी त्यांनी अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी सत्तारांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत फुस्स फटाका असा चिमटा काढला.

'दीपोत्सवा'नंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्था'वर, कारणही आलं समोर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नुकत्याच पार पडलेल्या मनसेच्या 'दीपोत्सवा'नंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. ‘शिवतीर्थ’वर उद्धव ठाकरे हे चौथ्यांदा दाखल झाले आहेत. राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे वेगळं लढू,' असे स्पष्ट केले आहे. तसेच पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी खासगी गप्पांमध्ये दिले आहेत. तर मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्र लढतील, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

जैन मुनी आझाद मैदानात उपोषणाला बसणार, तारीखही ठरली

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी कबुतरखान्याच्या बंदीविरोधात या आधी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती. आता ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. महापालिकेने कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्हे आहेत.

Raj thackeray :ठाकरे बंधूंची तीन महिन्यातील आठवी भेट

ऐन दिवाळीत राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. बुधवारी सायंकाळी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. ठाकरे बंधूंची ही तीन महिन्यातील आठवी भेट आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांचा बुधवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आले असल्याचे समजते.

फडणवीसांसह शिंदे, अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; महायुतीच्या मंत्र्यांची धडधड वाढली; 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच मोठा निर्णय होणार!

राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन लवकरच एकवर्ष पूर्ण होणार आहे. या वर्षभराच्या कालावधीत राज्य मंत्रीमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार 5 डिसेंबरला सत्तेत आले होते. त्यानंतर दहा दिवसातच भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी 15 डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी शपथ घेतली होती.

Election Commission : बाळासाहेब थोरात यांची टीका

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्राबाहेरील सुमारे ९,४६० मतदारांबाबत हरकती नोंदवल्या गेल्या. त्या हरकतींवर तहसीलदारांनी सांगितले की, मूळ विधानसभा मतदार यादीतील नावे वगळणे किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्याने नेमलेल्या अधिकाऱ्यांना नाही. मतदार यादीत हजारो नावांबाबत संभ्रम असेल, तेव्हा "विहित नमुन्यात अर्ज करा" असे सांगून निवडणूक आयोग नेमके काय साध्य करू पाहत आहे... निवडणूक आयोग खरेच हा घोळ तपासणार आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

Eknath Shinde News : महायुतीचाच भगवा फडकेल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मुंबईत काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे संकेत दिले आहेत.

Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांचा वेगळा सूर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कुणासोबतही आघाडी करणार नसल्याचे संकेत आमदार भाई जगताप यांनी दिले होते. त्यांचा हा दावा काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी खोडून काढला. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. याबाबतचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका मुंबई मेट्रो -2 च्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 30 किंवा 31 ऑक्टोबरला

मुहूर्त ठरला! 'मुंबई मेट्रो -२ ब' या दिवशी धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते ३० किंवा ३१ ऑक्टोबर रोजी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आता सरकारकडून लोकार्पणाच्या तारखेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

हेलिकॉप्टरला लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यात मोठा अपघात टळला. शबरीमला मंदिर भेटीपूर्वी त्यांचे एमआय-17 हेलिकॉप्टर प्रमादम स्टेडियमवरील हेलिपॅडवर उतरल्यावर त्याचा एक भाग खचला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षा दलांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळी सुट्टी करिता पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाच्या दिशेने निघाल्याने कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील माणगाव, खरवली फाटा अणि मुगवलीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

भारत-अमेरिका डील फायनल? टॅरिफ 50% वरून थेट 15% — ट्रंपकडून मोठं गिफ्ट

भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार अंतिम टप्प्यात असून या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेला 50% टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी केला जाईल, अशी माहिती मिंटच्या अहवालात देण्यात आली आहे.

Droupadi Murmu : लँडिंगवेळी हेलिपॅड ढांचा अचानक कोसळला; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोडक्यात बचावल्या

केरळमधील पथनमथिट्टा इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर उतरणार आज बुधवारी सकाळी गोंधळ उडाला. अचानक हेलिपॅडचा एक भाग कोसळला अन् काही वेळातच सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट पसरली. राष्ट्रपती शबरीमला इथल्या भगवान अय्यप्पा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जात होत्या. सुदैवानं, एक मोठी दुर्घटना टळली आणि सर्वजण सुरक्षित आहेत.

National Education Policy : 'एनईपी'मुळे प्राध्यापक अतिरीक्त ठरण्याची भीती; विद्यार्थी संख्या तीन वर्षात घटली

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांच्या कार्याबाबत सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच नव्या अभ्यासक्रम रचनेमुळे काही विषयांमधील विद्यार्थ्यांची संख्या मागील तीन वर्षात कमी झाली आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील विविध महाविद्यालयांमधील अनेक प्राध्यापक अतिरीक्त ठरण्याची शक्यता वर्तवली आहे.

Chhath Puja : छठपूजेनिमित्तानं मुंबई, पुण्यावरून मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या

छठपूजेनिमित्ताने मुंबई, पुण्यावरून उत्तर आणि पूर्व भारतात जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी निघाले आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 1,998 गाड्यांचे नियोजन केलं आहे. दिवाळी-छठ पुजेनिमित्ताने भारतीय रेल्वेने 12,011 विशेष रेल्वेगाड्या चालवत आहेत.

Mumbai BMC : मुंबई महापालिकेत बदली-बढती घोटाळ्याची चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा

मुंबई महापालिकेतील 156 अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने आरोप केला आहे. या प्रकरणी विशेष पथक स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत 677अभियंत्यांची पदे रिक्त आहेत.

JOB Update : वैद्यकीय महाविद्यालयांत 1100 प्राध्यापकांची भरती

JOB Update

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1100 प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर किंवा डेमाॅन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी पदांची सुधारित संख्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निश्चित केली आहे.

School Student : शाळेत असूनही राज्यातील 10 लाख 77 हजार विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आधारकार्डच्या आधारे नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने राज्यातील 4 लाख 98 हजार 759 विद्यार्थी शाळाबाह्य ठरली. तर आधारकार्ड वैधतेविना 5 लाख 78 हजार 433 विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील 10 लाख 77 हजार 192 विद्यार्थी शाळेत असूनही पटसंख्येवरून गायब होणार असून, त्यांच्यावर शाळाबाह्य ठरण्याचा ठपका बसणार आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन

जळगांवजामोद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, तसंच संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे वचन भाजप महायुती सरकारने पाळलं नसल्याच्या निषेधार्थ चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन केलं.

Congress Politics : ठाकरे बंधूच काय, आघाडीत देखील काँग्रेस लढणार नाही; भाई जगताप यांचं मोठं विधान

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूच काय, आघाडीत देखील लढणार नाही, असे विधान काँग्रेसचे मुंबईमधील नेते भई जगताप यांनी केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला धक्का लागला आहे. राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे या दोघांबरोबरही लढणार नाही. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

Weather Update : पुढचे चार दिवस वादळी अन् मेघगर्जनेसह पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं, त्याचा परिणाम 25 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. आठवड्याभरात दोन वेळा कोकणात परतीच्या पावसाचा दणका बसला आहे. अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याचा प्रभाव जाणवत आहे. समुद्र खवळलेला असून, मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा दिला गेला आहे.

पुण्याच्या सारसबागेत राडा, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी

पुण्यातील सारसबागेत यंदा दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे दिवाळी पाडवा पहाटेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला तरुण-तरुणी मोठ्या संख्येने आले. मात्र धक्का लागल्याचे कारणाने राडा झाल्याचे समोर आले आहे. आधी दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी तैनात असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवला. 

रायगडमध्ये भात कापणी सुरु झाल्यानंतर महिन्याभरात पडला तिसऱ्यांदा पाऊस, शेतकऱ्यांना फटका

परतीच्या पावसाचा रायगडमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भिती निर्माण झाली आहे. एका महिन्यात तीन वेळा परतीचा पाऊस कोसळला यामुळे कापणीसाठी तयार भाताचे पिक भिजून नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. भाताचे पिक कापणीसाठी तयार झाले आहे, पाऊस देखील थांबला होता. यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली मात्र 8 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर आणि काल 21 ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. गरजेपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे दाणा न भरलेला पोकळ भात म्हणजे पळंज आणि तयार भात खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरवला जाणार असून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

'रासप महायुतीपासून दूर झाल्यास, आपण भाजप-महायुतीसोबतच राहणार', जानकरांच्या निकटवर्तीयाने दिले वेगळी चूल मांडण्याचे संकेत 

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपले पक्षप्रमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षापासून राजकीयदृष्ट्या वेगळे होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी काळात रासप महायुतीपासून दूर झाल्यास, आपण मात्र भाजप-महायुतीसोबतच राहणार असल्याची ठाम भूमिका गुट्टे यांनी जाहीर केली. तसेच त्यांनी, मी हे अनेकदा म्हणतो की माझ्या आई-वडिलांनी जन्म दिला असला तरी, राजकारणात जन्म देणारे देवेंद्र फडणवीस हे माझे बाप आहेत. त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल आणि तो मी मान्य करेन,” असेही म्हटंल आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

'राज्यातील डबल इंजिनचं सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्यांचं सरकार', काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

राज्यात ओला दुष्काळ असतानाही नियम सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्याला उध्वस्त केलं. त्यामुळे राज्यातील डबल इंजिन असणारं महायुतीचं सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्यांचं आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. तसेच त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारनं महाराष्ट्राची अवदसा निर्माण करून ठेवली असून आता माझगाव क्रिकेट क्लब नियमानुसारचं आमचं नाव काढत आहे. पण हे सरकार असं करू शकत नाही. जर, सरकारनं सत्तेचा दुरुपयोग करून आमचं नाव रद्द केल्यास आम्ही कोर्टात जाऊ, न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेना मोठा धक्का, नेत्यानं सोडली साथ

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला असून, याचा फटका आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही बसताना दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील शिवसेनेला मोठा धक्का दिला असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

दोन हेक्टरचा निधी आला, एका हेक्टर साठी प्रतीक्षा

यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली यात शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया गेले यासाठी राज्य शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून दिवाळीपूर्वी सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होईल असे आश्वासन दिले होते. त्याकरिता 318 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात पूरबाधित शेतकऱ्यांसाठी 262 कोटी रुपयांचा निधी वळता झाला 56 कोटी रुपयांचा निधी अद्यापही बाकी आहे. पुढील तीन दिवसात हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होण्याची शक्यता आहे.

'मी जरी अजितदादांना सोडून गेले तरी त्यांना काही फरक पडणार नाही'; दत्तात्रय भरणे यांचा अप्रत्यक्ष इशारा

सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गळती लागली असून आता माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत. यामुळे दादांनी थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनाच सोलापुरला धाडलं आहे. त्यांनी टेंभुर्णी येथे एक बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंदापूरमधून मी (दत्तात्रय भरणे) जरी अजितदादांना सोडून गेले तरी त्यांना काही फरक पडणार नाही, असे म्हणत जाणाऱ्यांना थेट इशारा दिलाय. तसेच त्यांनी जाणाऱ्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार असल्याचेही म्हटलं आहे. तर जे नाराज आहेत त्याची कारणे ही छोटीशी किंवा गैरसमजातून पुढे आलेली असतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

धाराशिवमध्ये ऊस दराचा मुद्दा चिघळण्याची शक्यता

धाराशिवमध्ये ऊस दराचा मुद्दा चिघळण्याची शक्यता असून ढोकी परिसरात विविध गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत ऊस दरासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. कारखानदार संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांची लूट करत आहेत, अरोप शेतकऱ्यांनी केला असून एफआरपी प्रमाणे भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बैठक घेतली. भाव न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तर लातूरमध्ये उसाला भाव जाहीर होतो, मग धाराशिवमधील कारखानेच का करत नाहीत? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT