मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली आहे. सर्व संघटनांचे, पक्षाचे शेतकरी नेते अंतरवालीत बोलावणार असून पहिला टप्पा एकत्र बसून चर्चा करु. नंतर सर्वांची बैठक आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत,असंही जरांगे यांनी सांगितलं.
मंत्री आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, गेले आठ दिवस फटाके फूटत होते, परंतु आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. जशी जशी उमेदवार डिक्लेअर होतील, त्यावर पुढच्या काही लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, उमेदवार आणि राजकीय पक्षांचं भवितव्य देखील त्यावरच अवलंबून आहे, असंही गोगावलेंनी म्हटलं आहे.
भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यानंतर आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यातील नाना पेशव्यांची समाधीची साफ सफाई करण्यात आली. नानासाहेब पेशवे यांनी शनिवार वाड्याचे बांधकाम केले होते. नदी पात्राजवळ असणाऱ्या नाना पेशव्यांची समाधीची शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं साफ सफाई करण्यात आली. नानासाहेब पेशवे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. तसेच भाजपच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा असल्याचे ठाकरे गटानं म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात राष्ट्रभावना निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते. त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो, तो खरं तर राष्ट्रद्रोही आहे, या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आहेतअसं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी गावात फटाके वाजवण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटाच्या 20 जणांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त फटाके वाजवत असताना छोट्या मुलांमध्ये झालेले भांडण मोठ्या माणसात गेले. यातूनच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. यात एकूण 9 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वाद शमला. या प्रकरणी दोन्ही गटातील 20 जणांवर बोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही भाजपमध्ये शरद पवार गट आणि शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे. पण, मित्रपक्षातील कुणालाही घेतलेलं नाही. पाचोरा भडगाव येथे राज्यात महायुतीतच लढायचे हे आमचे धोरण आहे, परंतु जिथे शक्य नाही, टोकाचे वाद आहेत, अशा काही ठिकाणी अपवादत्मक स्थितीत स्वबळावर लढावे लागेल.”, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही कोणाच्याही पाठीमागं लागणार नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व ५९ जागा स्वबळावर लढविण्याची गणिते आम्ही केलेली आहेत. तसेच, नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये बसलं तर गणित जुळू शकतात. महायुतीचा धर्म निभावयचा असेल तर एकमेकांनी दोन पावलं मागे सरकायला पाहिजे. ते होणार असेल तर महायुती होईल; अन्यथा आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीसह इतरांना क्लिनचिट देण्यात आली आहे. मात्र, या क्लोजर रिपोर्टवर सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीय समाधानी नाहीत, त्यांनी आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या एक नोव्हेंबरपासून बॅंकिंग क्षेत्रात नवे बदल होणार आहेत. खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खातेधारकांना आता नॉमिनी म्हणून चौघांची नावे देता येणार आहेत. या चौघांचा वाटा किंवा टक्केवारी खातेधारकांना ठरवता येणार आहे.
कांद्याचे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत नवी दिल्लीत आंदोलन केले आहे. कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. कांद्याच्या बाजारभावाबाबत सरकारने धोरण ठरवावे, अशा मागणीचे निवेदन या शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयास दिले आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली असून पासपोर्ट कार्यालयाने गुंड घायवळ याचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. घायवळ याचा पासपोर्टबाबत प्रदेश कार्यालयात अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांनी वडिलांचे राजकीय करिअर अखेरच्या टप्प्यात असल्याचे विधान केले होते. तसेच मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाबाबत सूचक विधान केले होते. त्यावर कर्नाटकातील राजकारण तापलेले असतानाच जारकीहोळी यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. यतिंद्र हे एका संस्थेच्या नेतृत्वाबाबत बोलत होते. मुख्यमंत्रिपदाशी त्याचा संबंध नसल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचे विधान केले आहे. आज काँग्रेसकडून बिहारसाठी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. त्यावर काँग्रेसने महाराष्ट्रात केलेली चूक बिहारमध्ये टाळल्याचे पाहून आनंद झाल्याचे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘वोटचोरी’चा हा भंडाफोड फक्त एका विधानसभा मतदारसंघापुरता उघडकीस आली आहे. भाजपने अशा प्रकारे अनेक ठिकाणी संघटित आणि योजनाबद्ध पद्धतीने ‘वोट चोरी’ केली असून याचा खुलासा होणं अजून बाकी आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्यात आले आहे. तर मुकेश सहानी हे उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी आणखी उपमुख्यमंत्री करणार असल्याचे जाहीर केले आहे.
बिहारमध्ये गदारोळानंतर महागठबंधनाने मुख्यमंत्री पदी चेहरा निश्चित केला आहे. पटण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व सहकारी पक्षांच्या संमतीने तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रीपदी उमेदवारी जाहीर झाली. तसेच, विकासशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.
संगमनेर मतदारसंघात मतदार याद्यांतील घोळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी १५ हजारांपर्यंत बोगस मतदार असल्याचा दावा करत भाजपवर निवडणुकीतील घोटाळ्यांचा आरोप केला. यावर विखे पाटलांनी थोरात यांच्या आरोपांना “चोराच्या उलट्या बोंबा” असे प्रत्युत्तर दिले.
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. मुंबई कस्टम्सच्या झोन-३ विभागाने २० आणि २१ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवाया करत तब्बल १९.७८ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य असलेले 'हायड्रोपोनिक वीड' जप्त केले आहे. याप्रकरणी तीन आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते, मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीची ही सदिच्छा भेट होती. दरवर्षी दिवाळीत मी पवार साहेबांना भेटत असतो, असे सरनाईक यांनी माध्यमांना सांगितले.
मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काशिमीरा परिसरात ही घटना घडली आहे. घर बंद असताना गॅस लिकेज झाला होता. तरुणीने दरवाजा उघडून लाईट लावल्यावर झाला स्फोट झाला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे.
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. अग्निशमक दलाचे जवान आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. वरच्या मजल्यावर काही जण अडकले असल्याचे समजते.
भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्कडून अतिवृष्टी भागातील नागरिकांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. म्हात्रे यांच्या सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात सात लाख रुपयाच्या दिवाळी किटचे वाटप करण्यात आले.
महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी मनसेला सोबत घेणार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, काँग्रेस पदाधिकारी स्वबळाचा नारा देत असून आघाडी करायची की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
कृषी यांत्रिकीकरण ही केवळ योजना नसून शेतीतील प्रगतीचा पाया आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीचा लाभ देऊन शेती उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे, कृषी मजुरांची टंचाई दूर करणे व वेळेची बचत करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा आधुनिक कृषी उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करून शेतात परिवर्तन घडवावे, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे मावळत्या जिल्हा परिषद सभागृहातील सदस्य सुशांत बोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील 15 किलोमीटर परिसरात एनएमआरडीए चा बुलडोझर दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरावर चालला. याबाबत जिल्ह्याचे नेतृत्व करणारे मंत्री गिरीश महाजन यांनी हात झटकले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व कुठे आहे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या साधू-महंत आणि आखाड्यांसाठी कुंभमेळा होतो. तेच साधू आणि महंत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. त्र्यंबकेश्वरचे साधू महंत शेतकऱ्यांच्या मदतीला धावले. श्री पंचायती आनंद आखाड्याचे प्रमुख महंत शंकरानंद महाराज यांनी साधू आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रशासन शेतकऱ्यांना उध्वस्त करीत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा 'एनएमआरडीए'ला दिला.
महायुती सरकारने50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील आर्थिक स्थिती हालाखीची असताना ही सत्ताधारी आमदारांवर केलेली निधीची उधळण आहे. शिवया अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदारांसाठी सरकारने तिजोरी खुली केल्याचा आरोप,वडेट्टीवार यांनी केला आहे.
महायुती सरकारने सत्ताधारी पक्षातील पहिल्यांदाच आमदार झालेल्या जवळपास 50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासगार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, 'लोकप्रतिनिधी हा लोकांचा आवाज असतो, पक्षाचा नाही, अशी प्रतिमा आता बदलली आहे. स्वत:च्या पक्षाचे जे आमदार निवडून आले आहेत, त्यांना पक्षातील वाटा पाहता निधी देणे आणि विरोधी पक्षातील मतदारसंघ कोरडे ठेवणे हे बेकायदेशीर कृत्य आहे.'
Washim News : वाशिमच्या पाटणी चौक येथील एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यावर ऐन दिवाळीत मोठं संकट ओढावलं आहे.
चारकोप सेक्टर-2 फटाक्यांमुळे एका इमारतीला आग लागली आहे. घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथं वेगळं लढणार. परंतू मुंबईत मात्र महायुती म्हणून लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.