Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : आज 28 ऑक्टोबर 2025 रोजीच्या राज्यसह देशभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

आचोळे रुग्णालय प्रकरणावरून वसईत राजकारण पेटलं

वसई-विरार महापालिकेतील प्रस्तावित आचोळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या सर्वेक्षणावरून आज राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. भाजप आमदार राजन नाईक आणि बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव आमनेसामने आले असून, या वादामुळे रुग्णालयाच्या कामावर राजकीय सावट पसरले आहे. भाजपकडून आरोप करण्यात आला की, “रुग्णालयाच्या सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न माजी महापौर रुपेश जाधव यांच्याकडून होत आहे.” तर रुपेश जाधव यांनी पलटवार करत म्हटले की, “जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट न करता सर्वेक्षण सुरू केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.” दोन्ही गटांमधील वादविवादामुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत बिहार मित्र केंद्र स्थापन करणार;  तेजस्वी यादव यांनी जाहीरनामा  केला प्रसिद्ध

मुंबईत 'बिहार मित्र' केंद्र स्थापन केले जाणार आहे. बिहार निवडणूकीत महाआघाडीच्या जाहीरनाम्यात याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. तेजस्वी यादव यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

या केंद्राद्वारे बिहारी कामगारांना कायदेशीर मदत केली जाईल. कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार सहाय्य प्रदान केले जाणार आहे. बिहारी कामगारांना महिन्याला आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कामगारांची गणना केली जाणार आहे. एक केंद्रीकृत डिजिटल डेटाबेस तयार केला जाईल. यात स्थलांतरित कामगारांची नावे, पत्ते, व्यवसाय आणि आपत्कालीन संपर्क तपशील नोंदवले जाणार आहेत.

धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात संघर्ष

धाराशिव शहरातील 117 कोटीच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून धाराशिव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना स्थगितीच पत्र देण्यात आले असून तक्रारीचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीमुळे ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आता धाराशिवमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 117 कोटीच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्याच श्रेय घेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या असे भूमिपूजन होणार असल्याचं केलं होतं जाहीर केलं होतं. पण आता नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महायुतीत संघर्षाचा नवा अंक सुरू होणार आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीयावर आरोप करणं धंगेकरांना भोवणार? कोर्टाचे घेतली दखल

गेल्या काही दिवसापासून जैन होस्टेलच्या जागेवरून पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर निशाना साधताना दिसत आहेत. आता या जागेची खरेदी रद्द झाली आहे. पण आवाज उठवणारे धंगेकर वेगळ्या प्रकरणात अडचणीत आले आहेत.

वाघ मानव संघर्ष पेटला; दोन महिन्यात अकरा जणांचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या कमालीची वाढल्याने त्यांना जंगल कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघ आता गावाकडे वळू लागले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांना याचा मोठा धोका निर्माण झाला असून लोकांना शेतीसाठी जंगलात जाणे अवघड झाले आहे. तर गेल्या गेल्या दोन महिन्यात अकरा लोकांना वाघाने आपले लक्ष केल्याने त्यांचा जीव गेला आहे. तर सतत हल्ले वाढताना दिसत आहेत. यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट असून राजकीयदृष्ट्याही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्याचा संताप; म्हणाला, 'मला गोळ्या घाला...'

यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी घाईला आले असून आता संताप व्यक्त करत आहेत. अशातच या संतापाचा उद्रेक नांदेडमध्ये झाला. शेतकऱ्याने शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडली. ही घटना ताजी असतानाच आज परभणीतही एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर संतोष पैके असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने सरकार विरोधात संताप व्यक्त करताना, मला गोळ्या घाला मी घाबरणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातबारा कोरा करतो म्हणाले होते. तसेच 18 हजार 500 हेक्टरी देतो म्हणाले होते, काय मिळाल आम्हाला? असा सवाल ही त्या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी बनकरला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणात उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक झाली आहे. प्रशांत बनकर याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्याला उद्याही हवामान विभागाचा येल्लो अलर्ट

लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने दिलेल्या येल्लो अलर्ट प्रमाणे विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले असतानाच सायंकाळी जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अहमदपूर, औसा, लातूर, रेनापुर या सह इतर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाच नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.

Parbhani : परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहनावर दगडफेक

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली...याप्रकरणई पोलिसांनी एका शेतकऱ्याला ताब्यात घेतलं...मात्र त्याने दगडफेक नेमकी का केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही

Nashik News : 1 नोव्हेंबरला मनसे-ठाकरेसेनेचा एकत्र मोर्चा; नाशिकमध्ये जोरदार बॅनबाजी

नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेसेनेचा 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्च्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरभरात बॅनरबाजीने वातावरण तापलं असून, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारविरोधात आक्रमक होणार आहेत.

Pune Jain Boarding News : पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम

पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग संदर्भात "स्टे" कायम आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत धर्मदाय आयुक्त यांच्याकडून "स्टे" कायम करण्यात आला आहे. "स्टे" दरम्यान जागेवर कुठला ही व्यवहार करता येणार नाही. ३० ऑक्टोबर रोजी राज्य धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे.

Anil Parab : आदित्य ठाकरेंनी चुकीची मत आहेत ती दाखवली, यात कसला आलायं पप्पूपणा? 

आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देतेय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजप. आदित्य साहेबांनी काल चुकीची मत आहेत ती दाखवली. यात कसला आलाय पप्पूपणा? याचं उत्तर निवडून आयोगाने दिल पाहिजे. घरगडी असल्यासारखं काम हे भाजप करत आहे. भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे काहीतरी घोळ झालेला आहे. निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर दिल पाहिजे. आम्ही प्रश्न विचारला एकाला, मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारला नाही. ते कशाला उत्तर देतायत? अशा शब्दात आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला

Ashwini Vaishnav : आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्र सरकारकडून मंजुरी

केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.  आयोगाकडून 18 महिन्यात अहवाल सादर करण्यात येणार आहे. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जेव्हा होईल तेव्हा  50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि त्याशिवाय पेन्शनधारकांना देखील याचा लाभ होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

Nilesh Ghaywal : निलेश घायवळला ताब्यात घ्या, पुणे पोलिसांचे युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र

पुण्यातील कोथरूड परिसरातील गुंड निलेश घायवळच्या अटकेसाठी पुणे पोलीसांनी यूकेला पत्र लिहून निलेश घायवळला तात्काळ ताब्यात घ्या, असं म्हटलं आहे. पुणे पोलिसांनी युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र लिहून निलेश घायवळचा शोध घेऊन ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. घायवळने चुकीच्या प्रक्रियेतून पासपोर्ट मिळवल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. त्याच्यावर पुण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. घायवळ कुठे आहे हे शोधून तात्काळ माहिती द्यावी, अशी विनंती यूके हाय कमिशनकडे करण्यात आली आहे. 

Phaltan Case : मृत महिला डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नाही, पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट

साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे. आता आत्महत्या करणाऱ्या तरुणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. रुग्णालायाकडून संबंधित मृत तरुणीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. यामध्ये मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नसल्याचे समोर आले आहे. 

Nashik Crime : कुख्यात गुंड प्रकाश लोंढे उर्फ ‘बॉस’ आणि त्याच्या टोळीवर (MCOCA) अंतर्गत कारवाई

सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील ‘ऑरा’ बारमध्ये झालेल्या ‘प्रोटेक्शन मनी’साठीच्या गोळीबार, खंडणी व दहशत निर्माण प्रकरणात कुख्यात गुंड प्रकाश लोंढे उर्फ ‘बॉस’ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. 27) सायंकाळी लोंढे टोळीतील सतरा सदस्यांवर मकोका लागू करण्याच्या प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केली.

नियोजन विभाग- विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील 16 संकल्पना निश्चित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत 100 उपक्रम निश्चित

Cabinet Meeting : राखीव जांगावर निवडून येणाऱ्या उमेदवारास सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार

नगरविकास विभाग- महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी

Cabinet Meeting : परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मंत्रालयात नवीन सेलची मुख्यमंत्र्यांकडून स्थापना

परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मंत्रालयात नवीन सेलची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापना आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत मान्यता देखील मिळाली आहे. आएफएस राजेश गावंडे यांची नियुक्ती केल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आता मंत्रालयातील राजशिष्टाचार अधिकारी यांना मिळणार अधिकची जबाबदारी मिळणार आहे. राजशिष्टाचार सोबतच परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि संपर्क याची ही जबाबदारी असणार आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत 20 माजी नगरसेवक, 8 विद्यमान नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर,राष्ट्रवादी (शरद पवार पक्षाचे) माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार यांच्यासह 20 माजी नगरसेवक, 8 विद्यमान नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

हिना गावित यांची आता पुन्हा भाजपमध्ये घरवापसी

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांना भाजपकडून पुन्हा जवळीक साधत पक्षात प्रवेश दिला जात आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला राज्यभरात यश मिळताना दिसत असून मोठ्या प्रमाणात पक्षात इनकमिंग सुरु आहे. अशातच आता नंदुरबारमध्येही भाजपची ताकद वाढणार आहे, कारण माजी खासदार हिना गावित घर वापसी करणार आहेत.

Santosh Deshmukh Murder Case संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भात आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी झाली. आरोपी वाल्मी कराडची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलाकडून करण्यात येत आहे आणि आता पुढील सुनावणी ही 11 नोव्हेंबरला होणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या मागणीवर आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सरकारी वकिलांनी आरोपी वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्याची मागणी न्यायालयासमोर ठेवली आहे. या प्रकरणात गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि संपत्तीच्या तपासाची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाने आजची सुनावणी संपवून पुढील सुनावणीची तारीख 11 नोव्हेंबर निश्चित केली आहे. या सुनावणीत आरोपीच्या संपत्ती जप्तीबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे, त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेट्रो स्थानकाच्या नावावरून मुंबईत काँग्रेसचं आंदोलन 

मुंबईत नव्याने सुरू झालेल्या Aqua Line मेट्रो स्थानकांच्या नामांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. ‘भाजपच्या कॉर्पोरेट हिंदुत्वाचा आणि पोत्या वनवृत्तीचा विरोध’ करत असल्याचे काँग्रेसने सांगितले. पक्षाने भाजपवर देवस्थाने व राष्ट्रपुरुषांची नावे व्यावसायिक फायद्यासाठी विकल्याचा आरोप केला. नेहरू आणि संजय गांधी यांच्या नावांचा मेट्रो स्थानकांसाठी वापर न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनापूर्वी गायकवाड व सचिन सावंत यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले असून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

Thane MNS : मराठी-हिंदीवरून वाद; मनसेच्या दणक्यानंतर तरुणाचा माफीनामा

विमानातून प्रवास करताना एक तरुण व महिलेमध्ये झालेल्या हिंदी-मराठी वादावरून तरुणांनी सोशल मीडियावर महिले संदर्भात एक पोस्ट वायरल केली होती. याबाबत त्या महिलेने ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन तक्रार केली. अविनाश जाधव यांनी तरुणाचा व त्याने व्हायरल केलेल्या पोस्टचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत इशारा दिला. अशातच 24 तासांच्या आत सदरच्या तरुणाने सोशल मीडियावर एक माफीनामाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशमधील मुस्तफाबाद गावाचे नाव बदलून 'कबीरधाम' होणार

Yogi Adityanath

उत्तर प्रदेशमधील आणखी एका गावाचे नाव बदलण्यात येणार आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मुस्तफाबाद गावाचे नाव बदलून 'कबीरधाम' करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तशी घोषणा केली. 'स्मृती महोत्सव मेळा 2025' दरम्यान एका सभेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.

Agriculture updates : बियाणे विक्रेत्यांचा आज राज्यव्यापी बंद; साथी पोर्टलचा निषेध

केंद्र सरकारने साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री बंधनकारक केले. मात्र साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री करणे किचकट प्रक्रिया असल्याने त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाईडस व सिड्स असोसिएशनच्यावतीने आज नाशिक जिल्ह्यासह राज्यातील बियाणे विक्रेत्यांनी एक दिवसीय बियाणे विक्रीचे बंद ठेवून लक्ष वेधत आहे.

Beed Updat : डाॅक्टर महिला आत्महत्याप्रकरणात आंदोलकांचा रास्ता रोको

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे आंदोलनात रूपांतर झालं आहे. मोर्चाकरांनी रस्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांनी बंदोबस्तात आणखी वाढ केली. वडवणी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं असून, आरोपींना फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज सुनावणी; वाल्मिक कराडच्या संपती जप्तीच्या अर्जावर निर्णयाची शक्यता...

Santosh Deshmukh Murder Case

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व आरोपीचे दोष मुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मिक कराड वगळता इतर आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतात.

Bachchu Kadu Nagpur Morcha : बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात काँग्रेस, रविकांत तुपकर, कॉम्रेड अजित नवले सहभागी

Bachchu Kadu Nagpur Morcha

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात झाली आहे. मोर्चाचा दुसरा दिवस असून, बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे निघाले असून, मोर्चा नागपूरपासून 52 किलोमीटर अंतरावर आहे. मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर, कॉम्रेड अजित नवले देखील ट्रॅक्टर मोर्चा सहभागी झाले आहेत. या मोर्चाला शेतकऱ्यांसाठी असल्याने काँग्रेस देखील या मोर्चात सहभागी झाली आहे.

BJP Politics : माजी खासदार डॉ. हिना गावित यांची आज घरवापसी

माजी खासदार डॉ. हिना गावित यांची आज घरवापसी होणार असून, हिना गावित यांचा आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत हिना गावित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून अपक्ष उमेदवारी केली होती.

Shegaon Crime Update : शेगावच्या आझाद नगरमध्ये शस्त्रधारी चोरांचा दहशत!

शांत आणि सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव शहरात रात्रीच्या वेळी गुन्हेगारी वाढली आहे. आझादनगर परिसरात रात्रीच्या अंधारात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या चोरांचा वावराचा सीसीटीव्ही समोर आल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. चोरांच्या अशा बिनधास्त संचारामुळे शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला धाक आणि वचक संपला तर नाही ना? असा प्रश्न करत आहेत.

Beed News : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी बंदची हाक

फलटण येखील रूग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील वडवणी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी व्हावी आणि हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं अशी प्रमुख मागणी करत वडवणीतील नागरिकांनी हा बंद पुकारला आहे.

जैन बोर्डिंग ट्रस्टला बिल्डरकडून मिळालेले 230 कोटींची रक्कम गोठवा - रवींद्र धंगेकर

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्ट ला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी, अशी मागणी एक्सवर पोस्ट करत शिंदेंच्या शिवसेनेचे नेत तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं - बावनकुळे

इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात. आदरणीय अमितभाई शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदी जी आणि अमित भाईंवर टीका करण्याचा उद्योग करतात, अशी टीका भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Pune News : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत.

माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन

अमरावती जिल्ह्यातील जेष्ठ नेत्या माजी मंत्री वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. 1999 ते 2004 या काळात वसुधाताई देशमुख जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होत्या.

Bachchu Kadu : बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज नागपुरात धडकणार

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या मागणीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चा काढला असून आज हा मोर्जा अमरावतीतून नागपुरात दाखल होणार आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं आहे. मात्र, कडूंनी हे आमंत्रण नाकारलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT