ईव्हीएम मशिनवरून राज ठाकरे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी त्यांनी नमो टुरिझम सेंटरवरून राज्याचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज एका वर्तमान पत्रात बातमी आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो टुरिझम सेंटर काढणार म्हणून पण मी आताच सांगतो सत्ता असो नसो वर खाली कुठेही बांधलं की फोडून टाकणार. हे खात एकनाथ शिंदेंचं आहे. मुख्यमंत्री पदासाठी एवढी चाटूगिरी सुरु आहे की शिवाजी महाराजांच्या गडावर मोदींच्या नावाने टुरिझम सेंटर? बांधलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांना देखील हे माहीत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात वादळ उठले आहे. या प्रकरणा गोपाल बदने व प्रशांत बनकर यांना पोलिसांनी अटक केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी गंभीर आरोप केले होते. याचदरम्यान जयश्री आगवणे यांनी तर त्यांचे पती दिगंबर आगवणे यांना रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनीच खोट्या केसमध्ये अडकवले असा आरोप केला होता. यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या नेते माजी नगरसेवक अनुप शहा व जयश्री आगवणे यांचे पती संतोष आगवणे यांची बहीण सुनीता आगवणे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी, सुषमा अंधारे व मेहबूब शेख यांना फलटण येथून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केला आहे.
मुंबईतील पवईमध्ये रोहित आर्या या व्यक्तीने सुमारे 20 लहान मुलांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलांची सुटका केली. दरम्यान ओलीस ठेवलेल्या मुलांना वाचविताना पोलीस आणि आरोपी रोहित आर्यामध्ये चकमक उडाली होती. त्यामध्ये त्याला गोळी लागली तर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यांनी, घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. रोहित आर्या हे सामाजिक कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी अस पाऊल उचलणं हे चुकीचं आहे. त्यामुळे पुढील सर्व प्रकार उद्भवला. एकंदरीत झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे.
परभणीच्या पालकमंत्री आज गंगाखेड दौऱ्यावर होत्या त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यासोबतच जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि अनुदानावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर शाही फेकण्याचा प्रयत्न गंगाखेडमध्ये करण्यात आला. पण पोलिसांनी या प्रयत्न घाणून पाडत दोघा जणांना ताब्यात घेतले. यावर बोर्डीकर यांनी ते लोक विरोधातील असतील असं असे म्हटलं आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे समुद्रात लाटांचा जोर वाढला असून मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुजरात राज्यातील जाफराबाद येथून निघालेल्या अनेक मासेमारीच्या बोटीने सध्या मीरा-भाईंदरचा उत्तन किनाऱ्यावर आश्रय घेतलेला आहे. वादळाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यातून मतदार यादी घोळासंदर्भात प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे. शिवसेना UBT च्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन दिलं होतं. आता राज ठाकरेही या मेळाव्यात मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यावर सादरीकरण करणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सोबतच 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या तयारीबाबतही आढावा घेतला जाणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कंत्राटदार रोहित आर्य यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ‘दोन कोटी रुपये थकल्याचा आरोप रोहित आर्य याचा होता.’ या आरोपासह आर्य यांनी केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केल्याने खळबळ उडाली आहे. 'माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानांतर्गत 'स्वच्छता मॉनिटर' म्हणून काही कामे देण्यात आली होती, मात्र त्याचे पैसे थकवल्याचा आरोप आर्य यांनी केला आहे. तर, संबंधित कंत्राटदाराने थेट लोकांकडून पैसे घेतल्याचे खात्याचे मत असून, हा वाद विभागाशी बोलून सोडवावा, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात येत आहे. कोणालाही ओलीस धरणे चुकीचे असल्याचे मतही या प्रकरणी व्यक्त केले जात आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्य याचा एन्काऊंटर केल्याचे समजते. मुलांची सुटका करत असताना रोहितकडून मुलांना धोका निर्माण झाल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ओलीस ठेवलेल्या मुलांना वाचविताना पोलीस आणि आरोपी रोहित आर्यामध्ये चकमक उडाली होती. त्यामुळे रोहितला गोळी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पवई ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्या याला कारवाईदरम्यान गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलांना वाचविताना त्याच्यावर फायरिंग केल्याचे समजते. आत्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहितने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर प्रत्युतर देताना पोलिसांची गोळी रोहितला लागल्याचे समजते.
पवई पोलिसांना दुपारी पावणे दोन वाजता घटनेबाबत माहिती मिळाली होती. सर्व मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलाविण्यात आले होते. एकूण १७ मुले होती. सर्व मुले आल्यानंतर त्यांना एका खोलीत बंद करण्यात आली होती. त्यांच्यासोबत एक स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही होता. पोलिसांनी त्या सर्वांची सुटका केली आहे. रोहित आर्या या आरोपीकडे एक एअर गन सापडली आहे.
मुंबईतील पवईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रोहित आर्या या व्यक्तीने सुमारे २० लहान मुलांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलांची सुटका केली आहे. हा व्यक्ती माथेफिरू असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा एक धमकीचा व्हिडीओही समोर आला आहे.
जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम असल्याचे आजच्या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीनंतर अनिल परब, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, नितीन सरदेसाई, प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मंत्रालयासमोर मोर्चा पुकारला आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी शरद पवार गटानं आंदोलन छेडलंय.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता या महिला डॉक्टरच्या कुटुंबाशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कुटुंबाकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
निवडणूक आयोगाच्या गैरकारभारा विरोधात व बोगस मतदार उघडकीस आणल्यानंतर आता मत चोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी, मनसेचे नेते एकवटले आहेत. निवडणूक आयोगाचा गैरकारभार चव्हाटयावर आणण्यासाठी १ नोव्हेंबरला मुंबईत ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या रणनीतीसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर माविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते सचिन सावंत उपस्तिथ होते.
जैन बोर्डिंग आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमीन व्यवहार रद्द. धर्मदाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. गोखले बिल्डरला २३० कोटी सिव्हिल कोर्टोच्या आदेशाने परत मिळणार.
राज्यातील शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी, राज्यात 100% ई- पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात एसटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. मात्र, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी कवडगाव येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन पुकारले आहे. तात्काळ एस आय टी स्थापना करण्यात यावी नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पण यावेळी आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत.
कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या महाऐल्गार आंदोलनाला आता मनोज जरांगे पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. मराठा आणि शेतकरी प्रश्नांवर लढा देणारे दोन्ही नेते आता एकाच मंचावर आले आहेत. जरांगेंच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचे सुरु असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी मरायलाही तयार आहोत अशी तयारी दाखवत इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
फलटण इथं डॉक्टर महिलेच्या मूळ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव इथं हे आंदोलन सुरु आहे. ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असून या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहेत.
नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत वाढली आहे. कराड बंधूंच्या चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडाने हल्ला केला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, मात्र दुकानाचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा नाशिक पोलीस कसून तपास करत आहेत.
एमडी ड्रग्स विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद अझर हैदरसाहब कुरेशी असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला देखील लागले असून लवकरच निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पाच ते सात वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकीला आता मुहूर्त मिळाला आहे. अशामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत निघणार आहे.
बीडमध्ये अजित पवार यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र आढळले आहे, बीड पोलिस याचा तपास करीत आहे.
नवी मुंबईत माथाडी कामगारांचा आज मेळावा आहे. नवी मुंबई शहरामध्ये माथाडी कामगारांचा मेळावा व पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईकरांच्या रहिवाशांचा संवादाचा आयोजन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी आज धर्मादायुक्तांकडे सुनावणी पार पडणार आहे. ट्रस्टच्या नावावर जागा झाली नाही तर, एक तारखेपासून जैन मुनींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. धर्मादाय आयुक्तांनी मागील सुनावणीत ट्रस्ट आणि बिल्डर गोखले यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या.
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलं असून अखेर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत येण्यास तयार झाले आहेत. आंदोलन सुरू ठेवूनच ते मुंबईत चर्चेसाठी आज जाणार आहेत. शिवाय कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद करणार असा इशारा कडूंनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.