फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत. एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून आता डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
मराठीच्या मुद्द्यांवर एकत्र आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा मतदारयाद्यांतील घोळाकडे वळवला आहे. येत्या 1 नोव्हेंबरला मनसे आणि विरोधी पक्षांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे ठाकरे बंधू निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत त्यासंबंधी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. जळगाव महापालिकेच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 13 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांच्यासह 13 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरे सेनेची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. पुण्यातील महिला शिवसैनिक चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे. रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात देत असून कुंभमेळ्यासाठीची सर्व विकास कामे विहीत वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदींनी आज सकाळी पंचमुखी हनुमान मंदिर, दिगंबर आखाडा, लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवन परिसराला भेट देत साधू - महंत यांच्याशी संवाद साधला.
पुण्यात आज शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलं. चाकणकरांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, एक महिला असूनही रूपाली चाकणकर यांनी आत्महत्याग्रस्त महिलेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी “रूपाली चाकणकर राजीनामा द्या” असा नारा दिला.
प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेलं आंदोलन स्थगित केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्जमाफीसाठी एक समिति गठित करण्याचा आणि 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला. या आश्वासनानंतर कडू यांनी नागपूरमधील आंदोलन मागे घेतलं. कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी म्हटलं की, “आमच्या मागे असलेले कार्यकर्ते मोठं कर्तृत्व दाखवत आहेत, त्यांचं नाव नसलं तरी त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे.” या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
30 जून पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या शेतकरी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे.
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्येतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती आहे. अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांनी काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन संपले नाही, शेवटचा हप्ता मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असे माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. नागपूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होत.
खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. सत्तेची नाही तर सत्याची लढाई असे म्हणात फॅशन स्ट्रीट, चर्चगेट येथे मोर्चा निघेल. उद्या दुपारी १ वाजता मोर्चा निघणार असून मतदारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशानंतर चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत पक्ष वाढीसंदर्भात सखोल चर्चा सुरू आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीवर विशेष भर देण्यात आला आहे.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ महिला म्हणून पंकजा मुंडेंना गृहमंत्री पद द्यावं. तसेच डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारे आवाज उठवत आहेत. त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी आपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी पीडित कुटुंबाच्या भेटीनंतर केली.
जळगाव महापालिकेच्या अजब-गजब कारभाराचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जन्म मृत्यूचे दाखल्यांसाठीचे टोकन घेण्यासाठी नागरिकांना पहाटे पाच वाजेपासून महापालिकेत यावं लागत असून त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेत जन्म-मृत्यूचे दाखले घेण्यासाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली, असून दिवसभरात केवळ 50 दाखले दिले जात आहे.
भाजपने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचे महापाप केल. त्यात गद्दार एकनाथ शिंदेने ते पाप स्वतःवर झेलले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाची गरज आता संपलेली आहे. आता प्रत्येक निवडणुकीत भाजप शिंदे गटाला त्याची जागा दाखवणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे भाऊबंदकीचे वाद सुरू आहेत. त्यात शिंदे गटाचे विसर्जन होईल, असा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. तसंच महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढावं, असे आमचे प्रयत्न असतील, असेही राऊत यांनी म्हटले.
नव्याने निवडून आलेल्या 20 आमदारांना मतदारसंघातील नागरी कामांसाठी महायुती सरकारने प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेल्या आठवड्यात 55 आमदारांसाठी अशा प्रकारे निधी मंजूर झाला होता.
मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे कुटुंबियांवर मंत्रिपदावरून बोचरी टीका केली. कुणी असं समजू नये की, आमच्याच घरात मंत्री आहेत. मंत्री आम्ही पण आहोत. पण आम्ही मंत्रिपदाचा तोरा मिरवत नाही, असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे कुटुंबियांना लगावला. रायगडच्या रोहा इथल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात ही टोलेबाजी केली.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालेला नाही, असे नेताजींचा सहकारी स्वातंत्र्यसैनिक पसुंपोन मुथुरामलिंग थेवर यांचे म्हणणे होते, आणि त्यावर आपला विश्वास आहे, असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटले आहे. थेवर यांच्या 118 व्या जयंतीनिमित्ताने पसुंपोन इथल्या स्मृतीस्थळी त्यांना आदरांजली वाहिल्यानंगर ते बोलत होते.
दहशतवाद्यांशी कथित संबंधाच्या संशयावरून जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरूवारी दोन सरकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. लष्कर-ए-तैयबा या संघटनेच्या कारवायांना पाठिंबा देण्यात सक्रिय सहभागी असलेल्या शिक्षक गुलाम हुसेन आणि मासिज इक्बाल दार यांच्या सेवा बडतर्फ करण्यात आल्या आहेत.
नाशिक-त्र्यंबेकश्वर इथं 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी राज्य व केंद्र सरकारने मिळून तब्बल 25 हजार 55 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारने विकास कामांसाठी त्यापैकी आतापर्यंत सात हजार 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
नव्याने निवडून आलेल्या 20 आमदारांना मतदारसंघातील नागरी कामांसाठी महायुती सरकारने प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेल्या आठवड्यात 55 आमदारांसाठी अशा प्रकारे निधी मंजूर झाला होता.
कुपोषणासह बालमृत्यूची मागील सहा महिन्यातील पालघरमधील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील सहा महिन्यात जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील तब्बल 138 बालकांचा मृत्यू झाला असून, 294 बालक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. जिल्ह्यात आजही 63 अत्यंत तीव्र कुपोषित , 282 मध्यम कुपोषित बालकं आहेत. जिल्हा विभाजनाच्या 11 वर्षानंतर देखील पालघरच्या ग्रामीण भागातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश येताना दिसत आहे.
‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सुधीर दळवी मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचाराचा खर्च दळवी परिवाराच्या आवाक्याबाहेरचा आहे, हे लक्षात आल्यानंतर आज शिर्डीकर त्यांच्या मदतीला धावले. श्रीरामनवमी उत्सवाच्या शिल्लक वर्गणीत एक लाख रुपयांची भर घालून 05 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या मदतीसाठी पाठवविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर भाजपचे स्थानिक पदाधिकारी नरेश सुराणा यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत सामना कार्यालयात आज बैठक होणार आहे. ही बैठक उद्याच्या मोर्चाशी संबंधी असून या बैठकीनंतर सपकाळ हे उद्याच्या मोर्चात सामील होणार की नाही याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कुंभमेळा विकास विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्यासाठीच्या विविध विकासकामांना सुरवात होणार आहे.
2018 च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ठाकरेंनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याबाबत दाखल केलेले अर्जावर प्रतिसाद न दिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे.
भाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले, दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 आरोपींना 12 वर्षांपूर्वीच्या (2012) चोंढी इथल्या मारहाणप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आली. तर 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे शिवसेनेला रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी धक्का मानला जात आहे.
गोरगरिबांच्या जमिनी कमी दरात लाटून बच्चू कडूंनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर आपला हवामहाल बांधला आहे. या हवामहलाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण तायडे येंनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.