Marathi vs Hindi Controversy Sarkarnama
महाराष्ट्र

Hindi Row: मराठी की हिंदी उडतसे धुरळा, सोयीचा हा सोहळा साऱ्या दांभिकांचा!

Marathi vs Hindi Controversy : मराठी की हिंदी असा वाद रंगत आहे. संतांना जसे मायमराठीविषयी प्रेम होते, तसे या मंडळींना खरोखर मराठीविषयी प्रेम आहे का? हा खरा प्रश्न आहे...

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

सध्या महाराष्ट्रदेशी आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीची वाट चालत आहे. पालखी, वारी, दिंडी सोहळा आता पंढरीत पोहचला आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळाच वाद रंगलाय. मराठी की हिंदी असा वाद रंगत आहे. संतांना जसे मायमराठीविषयी प्रेम होते, तसे या मंडळींना खरोखर मराठीविषयी प्रेम आहे का? हा खरा प्रश्न आहे...

पंढरीची वाट चाले

ज्ञानोबा-तुकोबा ।

अनुपम्य सोहळा

अवघा वैष्णवांचा ।।१।।

विठ्ठलाओढीने

सान-थोर चाले ।

करितसे रिंगण

अवघे वैराग्याचे ।।२।।

नेते नि कारभारी

फुका वादात दंग ।

अवघा सोस त्यांना

पडे कुरघोडीचा ।।३।।

मराठी की हिंदी

उडतसे धुरळा ।

सोयीचा हा सोहळा

साऱ्या दांभिकांचा ।।४।।

मुद्द्यांचे पोकळ

घालितसे रिंगण ।

मराठीचा पुळका

यांना नाही नाही ।।५।।

भाषेशी कुणालाच

नसे हो देणेघेणे।

पालिका निवडणूक

यांच्या डोळ्यांपुढे ।।६।।

मत कमाईसाठी

हिशेबी भूमिका।

संत संदेशाची

पर्वा कुणा नाही ।।७।।

मराठी ही आपुली

कशी येईल धोक्यात।

अमृताशी पैजा जिंके

विश्वास माऊलीचा ।।८।।

पांगाऱ्याचा बीचा

जेवढा हो चटका।

तेवढाच झटका

यांना मराठीचा ।।९।।

पहिलीपासून हिंदीने

आणले हो वादळ ।

मुलांशी कुणालाही

देणेघेणेच नाही ।।१०।।

मुलांसह पालक

झाले कावरेबावरे।

अंगावर आली की

ही विद्यार्थीदशा ।।११।।

चालतसे फुगडी

फुकाच्या मुद्द्यांची ।

भाषाभगिनी साऱ्या

नाहक दमतसे ।।१२।।

एरवी दोन ध्रुवी

असणारे ते बंधू ।

मराठीचा बाणा

तयां आठवतसे ।।१३।।

मराठी सक्तीला

हिंदीची टिट काळी ।

परस्परांना टाळी

देई दोन्ही बंधू ।।१४।।

मोर्चाची झाली होती

मोठीच हो तयारी ।

डाव टाकला

परंतु कारभारी पंतांनी ।।१५।।

अध्यादेशास दिली

केराची टोपली ।

पेटत्या वणव्यावर

पाणीच ते अवघे ।।१६।।

मोर्चाचे आंदोलन

अवघे आंदोळले ।

मोठाच की पेच

दोन्ही बंधूंपुढे ।।१७।।

बंधुप्रेम हे तरी

वाही ओसंडून ।

मोर्चाचा होणार

विजयी मेळावा ।।१८।।

यांच्याच काळात

मराठी दुय्यम ।

मुंबईत टक्का

अवघा घटतसे ।।१९।।

मराठीला जरी

मान भाषेचा प्रथम ।

मुंबापुरी तिचे स्थान

निव्वळ दुय्यम ।।२०।।

उदंड जाहले आता

दांभिकांचे सोहळे।

यात महाराष्ट्राचे

काही भले नाही ।।२१।।

माऊलीने मराठीचा

दिला अमृतानुभव।

ऋण आपल्यावर

त्यांचे अपरंपार ।।२२।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT