Abdul Sattar Statement : नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा ३-२ अशी पिछेहाट झाली. यामुळं महायुती अंतर्गत तुतू-मैमै सुरु झाली आहे. याचपार्श्वभूमीवर औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरोधात सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतलेले शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महायुतीला आरसा दाखवला आहे. मराठवाड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयात आपला खारीचा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलं असून ७० टक्के महाराष्ट्रानं महायुतीला नाकारलं असं सांगत हा धोक्याचा इशारा असल्याचंही म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या टीकेला उत्तर दिलं तसंच महायुतीला भविष्यात कुठल्या परिणामांना समोरं जावं लागू शकतं हे देखील त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर महायुतीतल्या प्रत्येक पक्षानं या निवडणुकीनंतर आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसनं तर सखोल परीक्षण करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.
सत्तार म्हणाले, "मराठवाड्यात जे झालंय त्या विजयात माझा खारीचा वाटा आहे, प्रत्येकाला त्यावेळी मी जागृत करण्याचं काम केलं की महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हा माणूस प्रत्येकासाठी कसा घातक आहे, का आहे. गेली १८ वर्षे आम्ही त्यांच्यासाठी मतं मागितली पण त्यानंतरही त्याचं रुप पाहिल्यानंतर अनेक लोकांमध्ये नाराजी होती, पण तरीही त्यांच्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. पण आम्ही त्यांच्याविरोधत थेटपणए उतरलो, कुठेही लपून-छपून प्रचार केला नाही. त्यामुळं आज आपण पाहिलं की, १८ वर्षांचा त्यांचं साम्राज्य संपलं. आमचा प्रत्येक मतदारानं ईश्वर, अल्लाह, भगवानला साक्षी ठेवून मतदान केलं. यासाठी केलं की सतीश चव्हाणांनी १८ वर्षांत कोणतंही काम केलं नव्हतं त्याचं त्यांना फळ मिळालं आहे.
बन आणि त्यांची भणभण माहिती नाही
माझ्यावर टीका करणारे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि त्यांची भणभण मला माहिती नाही मी त्यांना जवळून पाहिलेलं नाही. टीव्हीवरच मी पाहिलंय. पहिल्या विधानपरिषदेला मी युतीचा धर्म पाळला, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिरसाटांना निवडून आणण्यासाठी मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी त्यांच्या आदेशाचं पालन केलं, त्यामुळं भाजपचा उमेदवार निवडून आला. त्यामुळं कादाचित बन यांना याची माहिती नसेल, त्यामुळं माझ्याविरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मी स्वतः निवडून आणला आहे.
त्यामुळं बन यांनी मला बोलण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे की, त्यांचा उमेदवार का पाडला? नागपूरमध्ये शिवसेनेनं सहकार्य केलं पण आता पराभवानंतर कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायचं असतं त्यामुळं ही कारणं शोधण्यात भाजपचा गोड गैरसमज झाला. संपूर्ण महाराष्ट्रात आणि संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेनं आणि आमदार-खासदारांनी बऱ्यापैकी सतीश चव्हाणांचं काम केलं. पण मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी काम नाही केलं याचं कारण आम्ही आमच्या पक्षाला देऊ, असा टोलाही यावेळी सत्तारांनी भाजपला लगावला आहे.
राष्ट्रवादीनं सखोल आत्मपरिक्षण करावं
तसंच महायुतीतील लोक जेव्हा अधिकृतपणे विरोध करु लागतात तेव्हा त्यामागची कारण शोधणं गरजेचं आहे. त्यामुळं आत्मपरीक्षण करणंही गरजेचं आहे. मी पाच वेळेचा आमदार आहे, ४० वर्षापासून राजकारण करतो आहे. अनेकवेळी मी राज्याच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ का येते याचा आत्मपरीक्षण व्हावं असं वाटतं त्यांनी भाजपच्या लोकांनी त्यांच्या पक्षाला, आमच्या पक्षानं आम्हाला विचारावं आणि राष्ट्रवादीनं तर याची पूर्ण चौकशी करुन असं का घडतंय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
७० टक्के महाराष्ट्रानं महायुतीला नाकारलं -सत्तार
आज जी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि पुणे विभाग असेल यामध्ये अनेक जिल्हे आहेत, त्यामुळं ७० टक्के महाराष्ट्रानं या शिक्षक आणि पदवीधरच्या माध्यमातून निवडणुकीत मतदान केलं होतं. याचाही विचार करायला पाहिजे. जर राष्ट्रवादीनं उमेदवार बदलला असता तर कदाचिक वेगळं चित्र दिसलं असतं. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगला संवाद आहे, ट्युनिंग आहे. ते चांगल्या प्रकारे एकमेकांना विश्वासात घेऊन काम करतात. पण तरीही हे जे सुरु आहे ते दोन्हीही पक्षांच्या हिताचं नाही, त्यामुळं भविष्यात याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. पदवीधरांनी महायुतीला का नाकारलं हे सांगताना सरकारकडून त्याचं अपेक्षा भंग झाला असेल किंवा त्यांना न्याय देण्यात आम्ही कमी पडलो असू, अशी कबुलीही यावेळी सत्तार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.