Deglur-Biloli by-election Sarkarnama
मराठवाडा

देगलूर पोटनिवडणुकीत ६५ टक्के मतदान : चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस-भाजपत ‘कॉँटे की टक्कर’

बारा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

सरकारनामा ब्यूरो

देगलूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. ३० ऑक्टोबर) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. यात १२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत या मतदारसंघात झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही या मतदारसंघात होता, याकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. मतविभाजन वा मतवाढीचा फटका कुणाला बसेल किंवा फायदा कुणाला होईल, हे सध्या स्पष्ट नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागेल्या या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर पहायला मिळाली. (65% turnout in Deglur-Biloli by-election)

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राजकीय शक्ती लावत महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना प्रचारात उतरविले होते. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने दिवंगत आमदार अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली होती.

या मतदारसंघामध्ये बिलोली व देगलूर हे दोन तालुके प्रामुख्याने येतात. सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहावयास मिळाली. सायंकाळी पाचपर्यंत ६०.९२ टक्के एवढा मतदानाचा टक्का गाठला होता. सायंकाळी सातपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना, भाजप व इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतदान अधिक होण्यासाठी प्रयत्न केले. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे दुपारी तीननंतर सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी पाहण्यास मिळाली. निवडणूक विभाग आणि जिल्हा पोलिस प्रशासन तसेच महसूल प्रशासन यांनी या निवडणुकीसाठी बंदोबस्त ठेवला होता.

कौल सांगणे अवघड

आमदार अमरनाथ राजूरकर यांनी प्रचाराची धुरा व नियोजन सक्षम पद्धतीने केले. तसेच, नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी निवडणुकीत स्वतःच्या मतदारसंघात अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. याचा परिणाम या मतदारसंघात जाणवणार आहे. चव्हाणांचे प्रतिस्पर्धी असलेले नांदेड लोकसभेचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी पराकाष्ठा केली आहे. माजी आमदार तथा भाजपचे उमेदवार सुभाष साबणे हे या मतदारसंघाला परिचित असल्याने मतदारांचा कौल काय असेल हे सांगणे अवघड आहे. तर वंचित बहुजन आघाडी व इतर उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता.

मतदारांची एकूण संख्या

मतदारसंघातील पुरुष मतदारांची एकूण संख्या एक लाख ५४ हजार ९२ तर स्त्री मतदारांची एकूण संख्या एक लाख ४४ हजार २४६ आहे. इतर ५ (तृतीयपंथी) असे एकूण २ लाख ९८ हजार ३५३ एकूण मतदारसंख्या होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT