Central Minister Raosaheb Danve-Mahadik- Harshvardhn Patil
Central Minister Raosaheb Danve-Mahadik- Harshvardhn Patil Sarkarnama
मराठवाडा

दानवेंच्या दिल्लीतील बंगल्यावर भुईमुगाच्या शेंगा खात रंगली गप्पांची मैफल

जगदीश पानसरे

नवी दिल्ली ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहचलेले अस्सल ग्रामीण आणि शेतकरी असलेले नेते. ग्रामीण भाषाशैली त्यांच्या देहबोली आणि भाषणातून नेहमीच पहायला मिळते. अगदी हातावर भाकरी ठेचा घेऊन खाणे, शेतात नांगर हाकणे, ट्रॅक्टर चालवणे एवढेच नाही तर गायी-म्हशीचे दूध काढतांनाची अनेक रुप दानवेंची पहायला मिळालेली आहेत.

दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर देखील त्यांच्या राहणीमान, खानपाण आणि भाषा शैलीत अजिबात बदल झालेला नाही, ते होऊ देत नाही. त्यामुळे जे कुठेच मिळणार नाही, ते दानवे यांच्या बंगल्यावर हमखास मिळतेच. असाच काहीसा अनुभव मराठवाड्यातून दिल्लीत गेलेल्या भाजपच्या नेत्यांना आला.

भुईमुगाच्या शेंगा तस पाहिलं तर टाईमपासचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. पण रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर या भुईमुगांच्या शेंगाचा अस्वाद घेत भाजपच्या नेत्यांनी मोठी कामे देखील केली हे लक्षात घेतले पाहिजे. सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अतिरिक्त दर दिल्यानंतर त्यांना प्राप्तीकर खात्याकडून नोटीस पाठवल्या जायच्या.

हा कर रद्द करून नोटीस पाठवण्यात येऊ नये या मागणीसाठी काही दिवसांपुर्वी भाजपचे एक शिष्टमंडळ नव्यानेच केंद्रात निर्माण झालेले सहकार खाते आणि त्याचे मंत्री अमित शहा यांना भेटले होते. त्यानंतर तीन महिन्यातच अमित शहा यांनी सहकारी साखर कारखान्यांचा तीस वर्ष रखडलेला हा प्रश्न निकाली काढला. याबद्दल अमित शहा यांचा सत्कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांनी केला.

तत्पुर्वी दिल्लीची थंडी आणि कोवळ्या उन्हाचा आनंद केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यात माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व रमेश आडसकर यांनी घेतला. गप्पांची मैफल रंगली असतांनाच दानवे यांनी खास भुईमुगाच्या शेंगा मागवल्या आणि काही क्षणातच शेंगानी भरलेले ताट या नेत्यांच्या समोरील टेबलवर आले.

मग शेंगा खात खात या नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाली. अगदी गल्ली ते दिल्लीचे विषय या मैफलीत चर्चीले गेले. भुईमुगाच्या शेंगा आणि दिलखुलास गप्पा हे मराठी माणसाचं आवडतं कॉम्बिनेशन. परंतु असा योग क्वचितच जुळून येतो तो दानवे यांच्या बंगल्यावर आला. दिलखुलास व्यक्तिमत्त्वांसोबत विविधविषयांवर गप्पा मारताना वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. या अश्या छोट्याशा क्षणांमुळे कामाच्या व्यापात मनाला मिळणारी प्रसन्नता विलक्षण असते, अशा भावना या नेत्यांनी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT