Raosaheb Danve-Sanjana Jadhav News, Aurangabad
Raosaheb Danve-Sanjana Jadhav News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Bjp News : दानवेंच्या मुलीच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार विरोधातच मोर्चा..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : पक्षाने संधी दिली तर मी कन्नड-सोयगांवमधून विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. शेतकरी, गोरगरिबांच्या मागण्यासाठी पिशोरमध्ये मंगळवारी (ता.२१) त्यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असतांना आधी सिल्लोड आणि आता (Kannad)कन्नडमध्ये मोर्चा निघत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजना जाधव या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. (Bjp) कन्नड तालुक्यात त्यांच्या चांगला जनसंपर्क देखील आहे. त्या जोरावरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या आपल्या विरोधकांना आव्हान देणार आहेत.

हर्षवर्धन जाधव यांनी नुकतेच आपण विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर संजना जाधव यांनी थेट मोर्चा काढत विधानसभेसाठीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, 2021-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, आदी मागण्यासाठी हा मोर्चा असणार आहे.

ग्रामीण भागातील रस्ते, बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात यावा, कापूस, ऊस, मका, सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळावा या मागण्यांसाठी देखील हा मोर्चा पिशोर नाक्यापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. हा मोर्चा निमित्त असला तरी संजना जाधव यांनी कन्नडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुलीला आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड-सोयगांव मतदारसंघात जाधव विरुद्ध जाधव असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT