Delhi Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनासाठी निघालेल्या सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीसांनी दिल्ली विमानतळावर जाऊन विमानातच ताब्यात घेतले. शिवाय आंदोलक दिल्लीत येऊच नये, यासाठी मेट्रो, बस, रेल्वेसेवा व इंटरनेट बंद करण्यात आल्या आहेत. याचे पडसाद आता दिल्लीसह देशभरात उमटू लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या वडीलांनी मुलाला विमानातच ताब्यात घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत विद्यार्थ्यांच आंदोलन आहे, ते काही चंबलचे डाकू नाहीत, मग एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी? असा सवाल केला. तर खरे डाकू संसदेतच बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
अभिजीत दिपके हे आज दिल्लीत पुन्हा आंदोलनासाठी दाखल झाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासह सहकाऱ्यांना दिल्ली विमानतळावर येताच ताब्यात घेतले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वाखाली सीजेपीकडून जंतर मंतर येथे आजपासून आंदोलनाला सुरुवात होणार होती.
मात्र, अभिजीत दिपके यांच्या यापूर्वीच्या आंदोलनाचा धसका घेतलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यांना दिल्ली विमानतळावरुनच बाहेर पडण्याआधी ताब्यात घेतले. यावर अभिजीत दिपकेंची आई अनिता दिपके आणि वडील भगवान दिपके यांनी संताप व्यक्त करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
ते म्हणाले, दिल्लीमध्ये पोलीस आणलेत कशाला मला हेच कळत नाही? विद्यार्थ्यांच साधं प्रदर्शन आहे. इथे काय चंबलच्या खोऱ्यामध्ये डाकू जमा झालेत का? डाकू तर पूर्ण संसदेमध्ये बसलेले आहेत. पोलीस फोर्स का लावायची गरज आहे? पूर्ण जे काही पोलीस कॅटेगरीचे लोक आहेत, ते सर्व तिथे गोळा केलेत. प्रत्येक भारतीयाला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे.
कायद्याने त्यांना अधिकार दिलेला आहे, मग तुम्ही लोकशाहीला मानत नाही का? याचा अर्थ तुम्ही लोकशाहीला मानत नाही. परवानगी कोण देणार आहे, मोदी परवानगी देतील की पोलीस परवानगी देतील, असं वाटतं का तुम्हाला? ते त्यांच्या विरोधात परवानगी कशी काय देतील? यांच्या चुका उघड पाडणाऱ्यांना प्रोटेस्ट करण्यासाठी हे परवानगी देतील कशी? असा सवाल करतानाच वडील म्हणून मी तर त्याच्यासोबत आहे, आता तो माझ्यासाठी चंद्रशेखर आझाद आहे, माझ्यासाठी भगत सिंग आहे तो, तो जे काय करेल, त्याला माझा पाठिंबा असेल, असे भगवान दिपके यांनी म्हटले आहे.
पाच सहा दिवसापासून मुलाशी बोलणे झालेले नाही. मला सरकारला काही सांगायचं नाही. हे ऐकणाऱ्याच्या लेव्हलचे माणसंच नाहीत, यांना लोकशाही नकोय, सरकारला लोकशाही नकोय. अमित शाह आणि मोदी पर्टिक्युलरली या दोन गुंडांना भारतामध्ये लोकशाही नकोय, यांना काही सांगायचं नाहीये, जे काही मला सांगायचंय ते भारतातील मी जनतेला सांगतोय की तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल, तर तुम्ही अभिजीतला सपोर्ट करा किंवा त्यांचे जे काही मित्र आहेत, मुव्हमेंट आहे, त्यांना सपोर्ट करा, असे आवाहन भगवान दिपके यांनी केले आहे.
अभिजीत आणि त्याचे मित्र हे सर्व लोकशाही वाचवायला रस्त्यावर उतरलेले आहेत. ते काय त्यांच्या कुठल्या नोकरीसाठी रस्त्यावर नाहीत, तर जनतेने त्यांना पाठिंबा द्यावा. लोकशाही वाचवायची असेल तर, तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असेही ते म्हणाले.
दिल्ली पोलीसांनी अभिजीत व त्याच्या मित्रांना ताब्यात घ्यायची काही गरज नव्हती. ते शांततेच्या मार्गाने त्यांच्या मार्गाने चालले होते, ते जंतर मंतरला ते कुठं तिकडं चालले होते, त्यांच्या हातात काय काठ्या होत्या, का? तलवारी होत्या, की मग एके 47 होत्या? काय होतं त्यांच्याकडे असा संतप्त सवालही भगवान दिपके यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.