Abhimanyu Pawar on Amit Deshmukh : टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी आणि तिथे जाऊन केलेल्या भाषणामुळे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत. कव्वालीच्या कार्यक्रमात करण्यात आलेली नोटांची उधळण यावरूनही देशमुख विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत.
टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या देशमुख यांच्या विधानाने सगळीकडे गदारोळ सुरू आहे. अशातच भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अमित देशमुख यांनी टिपू सुलतानला मुजरे घालण्याचे काम केल्याचा हल्लाबोल केला.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या काँग्रेसच्या (Congress) सहकार पॅनलमधून बिनविरोध संचालक झाल्या आहेत. यावरून अभिमन्यू पवार यांच्यावर त्यांनी काँग्रेस व धीरज देशमुख, अमित देशमुख यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी केलेल्या टिपू सुलतानच्या उदात्तीकरण करणाऱ्या विधानावर अभिमन्यू पवार नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अमित देशमुख यांच्या विधानानंतर दोन दिवसांनी अभिमन्यू पवार हे सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत.
हिंदू (Hindu) समाजावर जुलमी अत्याचार करणाऱ्या, हजारो हिंदू धर्मियांचे बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या आणि हिंदू देवस्थानांची नासधूस करणाऱ्या टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्याला मुजरे घालण्याचे काम लातूर शहर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केले असून त्या कृतीचा तीव्र निषेध, अशा शब्दात पवारांनी त्यांच्यावर टीका केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीत हा प्रकार होणं अत्यंत निंदनीय आणि अस्वीकार्य आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते मतपेटीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात हेच पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशा तिखट शब्दात अभिमन्यू पवार यांनी अमित देशमुख आणि काँग्रेसवर टीका केली. यातून अभिमन्यू पवार यांनी आपण अमित देशमुख आणि काँग्रेस पक्षाचे विरोधकच आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.
टिपू सुलतान यांचे विचार आणि त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लातूरमधील तरुणांमध्ये हे विचार रुजवण्यासाठी आवश्यक ती पुस्तके आणि साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी लातूर महानगरपालिका आणि मी स्वतः सर्वतोपरी सहकार्य करू, असे विधान देशमुख यांनी केले होते. तसेच त्यांनी टिपू सुलतान यांचा उल्लेख 'शेर-ए-हिंद' आणि 'शहीद हजरत टिपू सुलतान' असा केला.
यावरून भाजपने देशमुख यांच्यासह काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी अमित देशमुख यांची पाठराखण केली. विरोधक राजकीय स्वार्थ आणि प्रसिद्धीसाठी या विषयाचा विनाकारण वाद निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले. कला, संगीत आणि सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाकडे पाहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.