Mla Lonikar-Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

`विमा कंपन्यांकडून दलाली खाल्याचे मान्य करा, प्रायश्चित म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्या`

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद ः पिक विमा कंपनी राज्य सरकारशी जो करार केलेला आहे, तो करताना सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. चुकीच्या पद्धतीने करार केले गेले, या करारानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या यंत्रणेने केलेले पंचनामे पीक विमा कंपन्यांनी नाकारले, असा आरोप माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. पीक विमा कंपन्यांकडून दलाली खाल्यामुळे या कंपन्या मालक तर राज्य सरकार त्यांचे गुलाम बनले आहेत, अशी टीका देखील लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पिक विमा कंपनीशी करण्यात आलेल्या चुकीच्या कराराबाबत केंद्र सरकार जबाबदार नसून राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, असेही लोणीकर यांनी पत्रकार म्हटले आहे. पीक विमा न मिळण्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला होता.

लोणीकर यांनी अशोक चव्हाण यांचे आरोप खोडून काढत राज्य सरकारवरच हल्ला चढवला. लोणीकर म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पिक विमा कंपन्यांशी केलेला करार शेतकऱ्यांच्या हिताचा होता. म्हणून सातत्याने तीन वर्षे दुष्काळ पडून देखील पिक विमा कंपन्यांनी भरघोस पीक विमा दिला. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा करार बदलण्यात आला.

बदललेल्या करारानुसार पिक विमा कंपन्या प्रशासनाने केलेले पंचनामे मान्य करत नाहीत आणि पीक विमा कंपनीकडे पंचनामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. ऑनलाईन माहिती शेतकऱ्यांना भरता आली नाही, परिणामी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. राज्य सरकारला पिक विमा कंपन्यांकडून दलाली मिळाली आहे की काय? म्हणून राज्यसरकार गप्प आणि कंपन्याची बाजू घेत आहे, असा सवाल देखील लोणीकर यांनी उपस्थित केला.

निवडणुकीच्या अनुषंगाने अशोक चव्हाण शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत. चव्हाण यांनी राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करावी आणि प्रायश्चित्त म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील लोणीकर यांनी केली.

जर असं नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पिक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा, मी स्वतः नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशोक चव्हाणांचा जाहीर सत्कार करेल, असे आव्हान लोणीकरांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT