Yuvasena Chief Aditya Thackeray In Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

भुमरे, शिरसाटांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे देणार धडक ; शिवसंवादातून शक्तीप्रदर्शन..

ज्या ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेला सुरुंग लावला गेला. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच पहिली धडक ठाकरे देणार आहेत. (Aditya Thackeray)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) धडक देणार आहेत. (Shivsena) शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे पिता-पुत्र आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांच्या विरोधात आघाडी उघडली असून त्यांच्या मतदारसंघात जाऊन शिवसंवाद मोहिमेच्या माध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

(Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील सात पैकी संदीपान भुमरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार या पाच आमदारांनी शिंदेच्या बंडाला पाठिंबा दिला. शिरसाट, भुमरे यांनी मतदारसंघात आल्यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. आता याच दोघांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. ज्या ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेला सुरुंग लावला गेला. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच पहिली धडक ठाकरे देणार आहेत.

भिवंडी, शहापूर, इगतपुरी, नाशिक मार्गे औरंगाबाद, पैठण, नेवासा आणि नगर, शिर्डी या ठिकाणी आदित्य ठाकरे शिवसंवाद मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी दुपारी आदित्य ठाकरे औरंगाबादेत येणार असून संत एकनाथ रंग मंदिरात ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मेळावा घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक दानवे यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेच्या २९ माजी नगरसेवकांपैकी २५ हजर होते. या शिवाय महिला पदाधिकारी, शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थीत होते. एकंदरित बंडखोरांच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT