Aditya Thackeray News, Aurangabad
Aditya Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray : ईडा-पिडा टळू दे.. आदित्य ठाकरेंचे शनिदेवाला साकडे..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्यातील सत्तांतरानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थीती, पक्षात पडलेले मोठी फूट, बंडखोरांनी थेट पक्ष आणि प्रमुख पदावर केलेला दावा या सगळ्या पार्श्वभूमीवर (Yuvasena) युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे घातले.

महाविकास आघाडीमध्ये मंत्री राहिलेले आणि सत्तांतरानंतरही एकनिष्ठ असलेले शंकरराव गडाख आणि घुले परिवारांच्या विवाह सोहळ्याला उपस्थितीत राहण्यासाठी (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे नगरमध्ये आले होते. दरम्यान, त्यांनी शनीशिंगणापूर येथे जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. (Shivsena)

शिवसेना आणि राज्यावर आलेले संकट दूर कर, ईडापिडा टळू दे, असे साकडे तर त्यांनी घातले नसेल ना? अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले बंड, उद्धव ठाकरे यांचे मंत्रीपद आणि सत्ता गमावल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गद्दार आमदारांचा जोरदार समाचार घेतला.

शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडून सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि पक्षातून फुटून गेलेल्या आमदार, मंत्र्यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. राज्यभरात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोरांविरुद्ध रान पेटवत आदित्य यांनी आपले आक्रमक रुप पहिल्यांदाच दाखवले होते. एकीकडे बंडखोर तर दुसरीकडे भाजप अशा दुहेरी संकटांना आदित्य यांनी समर्थपणे तोंड दिले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये केलेल्या कामांचा हवाल देत शिंदे-फडणवीस सरकावर कडाडून हल्ला करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती. विशेषतः राज्यातील मोठे उद्योग गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरली होती. पक्षात मोठ्या प्रमाणात फाटाफूट झालेली असतांना प्रामाणिक आणि एकनिष्ठ शिवसैनिकांना धीर आणि दिलासा देण्याची महत्वची भूमिका आदित्य ठाकरे यांनी पार पाडली.

सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसह शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा या वादावर सुनावणी सुरू आहे. अशावेळी आदित्य ठाकरे यांनी शनीशिंगणापूरला जावून घेतलेले दर्शनाची चर्चा झाली नाही तर नवलच. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर आदी उपस्थीत होते.

शनीशिंगणापूरला दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हातात बॅट घेत चेंडू टोलावत विरोधकांना इशारा देखील दिला. आधी शनिदेवाला साकडे आणि मग विरोधकांचा समाचार घेण्यासाठी हाती घेतलेली बॅट या आदित्य ठाकरे यांच्या दोन रुपांची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT