Vijay Tapdiya-Eknath Shinde
Vijay Tapdiya-Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेकडूनही काॅंग्रेसला धक्का; गंगाखेडच्या नगराध्यक्षाने बांधले शिवबंधन

जगदीश पानसरे

परभणी ः राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीनही पक्षांनी स्थानिक पातळीवर मात्र आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फोडाफोडीचे धोरण अवलंबले आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडीवर असतांना शिवसेनेने देखील आपला मोर्चा काॅँग्रेसमधील नाराजांकडे वळवल्याचे दिसून आले आहे.

अंबाजोगाई, सोनपेठमध्ये राष्ट्रवादीने काॅंग्रेसला खिंडार पाडल्यानंतर आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे काॅंग्रेस नगराध्यक्ष आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत दाखल झाले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गंगाखेडमध्येच हा प्रवेश झाला. त्यामुळे राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनेही काॅंग्रेसला धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सोमवारी एकनाथ शिंदे हे परभणी दौऱ्यावर होते, याच वेळी गंगाखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा भगवा हाती घेतला. काॅंग्रेस कार्यकर्त्यांसोबतच पुर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी देसाई जे भाजपमध्ये गेले होते, त्यांनी देखील परत शिवसेनेते प्रवेश केला. काॅंग्रेसला व भाजपला शिवसेनेने धक्का दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमातच गंगाखेडचे नगराध्यक्ष तापडीया आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे यांच्या हाताने शिवबंधन बांधून घेतले.

शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात सातत्याने प्रयत्न केले, पण स्थानिक गटबाजी आणि त्याकडे वरिष्ठांकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे आपण काॅंग्रेस पक्ष सोडत असल्याचे तापडिया यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT