Aurangabad Municipal Corporation News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : राजकारण्यांच्या होर्डिंगवर आक्षेप घेताच, पदाधिकाऱ्यांनी प्रशासकांना दाखवला आरसा..

दररोज दीड ते दोन हजार होर्डिंग, बॅनर जप्त केले जात आहेत. त्यानंतर शहर विद्रूप होणार नाही, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे. (Municipal Corporation)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : अनाधिकृत होर्डिंग, फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करू नये, यासाठी महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बोलाविलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत रस्त्यावरच्या अतिक्रमणांचा विषयच अधिक गाजला. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. हातगाडीचालकांनी अर्धा रस्ता गिळंकृत केला आहे. व्यावसायिक दुकाने, मंगल कार्यालयांचे पार्किंग गायब आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ही बाब स्मार्ट सिटीला शोभणारी नाही, अशा शब्दात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनाच आरसा दाखवला.

महापालिकेने खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, फलक काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे फलक काढल्यानंतर पुन्हा शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी प्रशासक डॉ. चौधरी यांनी बुधवारी (Municipal Corporation) महापालिका मुख्यालयात दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. (Aurangabad) यावेळी उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी, भाजपचे राजेश मेहता, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन, एमआयएमचे शहारेख नक्षबंदी, मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे प्रभारी शहराध्यक्ष कैलास गायकवाड, प्रहार संघटनेचे कुणाल राऊत, राजू मिसाळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. चौधरी बैठकीमागची भूमिका विषद करताना म्हणाले, १४ नोव्हेंबरपासून शहरात अनधिकृत पोस्टर्स, झेंडे, बॅनर काढण्याचे काम सुरू आहे. दररोज दीड ते दोन हजार होर्डिंग, बॅनर जप्त केले जात आहेत. त्यानंतर शहर विद्रूप होणार नाही, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासकांच्या भूमिकेनंतर किशनचंद तनवाणी म्हणाले, रस्ते रुंद व्हावेत म्हणून अनेक मालमत्ताधारकांनी महापालिकेला जागा दिल्या आहेत. मात्र आजही शहराची वाहतूक कोंडी कायम आहे.

रस्त्यावर मोठ्या संख्येने अतिक्रमणे आहेत. त्यात मुख्य बाजारपेठेत हातगाडीचालक थांबतात. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. स्मार्ट सिटीत अतिक्रमणे हा मुद्दा नाही का? प्रशासनाने नो हॉकर्स झोन घोषित करावेत. हातगाड्यांवर साहित्य विकणाऱ्यांची अन्यत्र व्यवस्था करावी, असे मुद्दे मांडले. व्यापारी संकुलातील पार्किंग कुठे आहे? अनेकांनी पार्किंगच्या जागेवर दुकाने बांधली आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? पार्किंगच गायब असल्याने वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. परिणामी वाहतूक विस्कळित होते, असे कैलास गायकवाड म्हणाले.

शहरात पोस्टर, बॅनर, फलक, झेंडे लावण्यासाठी महापालिकेकडून दर निश्चित केले जाणार आहेत. लवकरच जागाही निश्‍चित केल्या जातील. जानेवारी २०२३ ला देशात होत असलेल्या जी-२० परिषदेला विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. या अनुषंगाने महापालिकेकडून तयारी केली जात असून, शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. चौधरी यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT