Vidhansabha Election 2024 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच भाजपला इशारा दिला. लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावून भाजपला संपवण्यासाठी विधानसभेला मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट अंतरवाली गाठत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सायंकाळी साडेपाच वाजता इम्तियाज आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली.
निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेच इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आपला मोर्चा अंतरवालीकडे वळवला. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लागू करू नका, अन्यथा तुमचे गणित बिघडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे पाटील वारंवार देत होते. अखेर आज निवडणूक आचारसंहिता आणि कार्यक्रम जाहीर झाला.
जरांगे पाटील यांनी त्यानंतर तात्काळ माध्यमांकडे नाराजी व्यक्त करत महायुती विशेषतः भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. त्यानंतर लगेच इम्तियाज जलील यांनी अंतरवालीकडे धाव घेतली आणि जरांगे पाटील यांच्याशी `गुफ्तगू` केली. याभेटीत एमआयएमला मदत करण्याची गळ इम्तियाज यांनी जरांगे पाटील यांना घातल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले अशा सगळ्याच नेत्यांना आम्हाला सोबत घ्या, असे आवाहन करत एमआयएने प्रस्ताव देखील पाठवला होता. मात्र महाविकास आघाडीने एमआयएमला लांब ठेवण्याचे धोरण अवलंबले. (Manoj Jarange Patil) आता एमआयएमला स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्यातील निवडक मतदारसंघात एमआयएम उमेदवार देण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पुर्व, पश्चिम आणि मध्य अशा तीनही मतदारसंघात एमआयएम उमेदवार देणार आहे.
पैकी एका मतदारसंघातून स्वतः इम्तियाज जलील निवडणुक रिंगणात असणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका भाजप आणि महायुतीला रोखण्याची असल्यामुळे एमआयएमने त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधातील मुस्लिम मते एमआयएमकडे वळण्याऐवजी महाविकास आघाडीकडे वळली. हक्काची वोट बॅंक दुरावत असल्यामुळे चिंतेत असलेल्या एमआयएमला मनोज जरांगे पाटील यांचा आधार वाटू लागला आहे.
इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवालीतील पहिल्या आंदोलनाला भेट देत मराठा आरक्षणाला पांठिबा जाहीर केला होता. `बेड भाई को कुछ मिल रहा है, तो छोटा भाई रुकने के लिए तैयार है` अशी भूमिका इम्तियाज यांनी जाहीर केली होती. तर जरांगे पाटील यांनीही मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका बोलून दाखवली आहे.
या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात झालेली भेट महत्वाची समजली जात आहे. या भेटीचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम, कुठे आणि कोणत्या मतदारसंघात होतो? हे लवकरच दिसून येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.