जळगाव : ''मी अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो, अनेक वर्ष मी विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं. आताही विरोधी पक्षाचं काम केले. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील चुका, उणीवांवर प्रहार करण्याची संधी मला मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करण्याची मी प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केला आहे. खडसे हे आमदार झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण त्यांची आमदार म्हणून निवड झाली आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली. राष्ट्रवादीला आता विरोधी पक्ष म्हणून काम पाहावे लागणार आहे. त्यात खडसे हे आता विधान परिषदेत बाजू मांडताना त्यांच्यासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील. या दोघांतील सामना आता येणाऱ्या अधिवेशनात कसा रंगतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी आज (८ जुलै) विधान परिषदेच्या सदस्य म्हणून शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. अडीच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांना आता विधीमंडळात जाता येणार असल्याने खडसे समर्थकांमध्ये आज उत्साहाचे वातावरण होते. एकनाथ खडसे शपथ घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला.
'राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मला विधान परिषदेचे तिकीट मिळाले, यात मी बहुमताने निवडून आलो, त्यासाठी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानतो. मी यापूर्वी विधानसभेत काम केलं आहे. मधला काळ सोडला तर आता पुन्हा मला विधान परिषदेत सहा वर्षांसाठी आमदारकीची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता मी सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न करेल,' असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, अशा चर्चा होत्या, यावर बोलताना खडसे म्हणाले की, अन्याय झाला ते सोडा पण आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचा पाठपुरावा केला तर त्यावर नक्कीच न्याय मिळू शकतो. त्यामुळे सभागृहात पक्षाची भूमिका मांडणारच, पण त्यासोबत सर्वसामान्यांच्या प्रश्नानांही प्राधान्य देणार आहे. याचंवेळी त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून काम करायला आवडेल का, असं विचारलं असता, ते पक्ष ठरवेल, असं यांनी सांगितले.
फडणवीसांवर नाराज असल्याच्या होत्या चर्चा...
खडसे पाच वेळा भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभेवर मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून गेले आहेत. मात्र २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी त्यांचे नाव दिले होते. मात्र राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली नाही. खडसे यांनी १९९८ मध्ये युती सरकारच्या काळात जलसंपदा, अर्थमंत्री पद भूषविले होते. २०१४ मध्ये राज्यात खात्याचे मंत्री त्यांना केले होते. मात्र त्यांची नाराजी कायम होती. तेथूनच पुढे तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे बिनसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.