Marathwada Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील स्वागत आणि त्यांनी केलेल्या खुमासदार भाषणाची चर्चा अजूनही होत आहे. अगदी बारामतीच्या तोडीस तोड असे जंगी स्वागत, बीडकरांनी देखील अजित पवारांचे केले. (Beed Sabha News) पण अजित पवारांच्या भाषणाने मात्र उपस्थितांचा हिरमोड झाला. ज्या मिश्किल आणि सडेतोड भूमिकेसाठी अजित पवार ओळखले जातात, ते भाषण आज रंगलेच नाही. त्यामुळे दुपारपासून प्रतिक्षेत असलेल्या बीडकरांचा मात्र भ्रमनिरास झाला.
सरकारी योजनांची माहिती, राज्य सरकारमध्ये का सामील झालो याची उजळणी आणि आश्वासानांच्या वर्षावावरच बीडकरांची बोळवण केल्याच्या प्रतिक्रिया या `उत्तरदायित्व` सभेनंतर उमटत आहेत. बीडमधील या सभेचे मुख्य आकर्षण अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण होते, पण कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेच भाव खाऊन गेले. भुजबळाचे भाषण रंगले, पण वेळ खूप झाल्यामुळे शेवटी त्यांना आवरते घ्यावे लागले.
धनंजय मुंडे यांनी आपला इतिहास सांगतांना राजकीय प्रवास, संघर्ष या गोष्टींना उजाळा दिला. पण दुपारी चार वाजता सुरू होणारी सभा साडेसहा वाजता सुरू झाल्यामुळे दोन वाजेपासून जमलेल्या गर्दीच्या सहनशिलतेचा अंत धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असतांनाच झाल्याचे पहायला मिळाले. (Beed News) मागचे लोक उठून जावू लागल्याने मुंडेंना हात जोडून शेवटपर्यंत थांबाणार ना? असा शब्द उपस्थितांकडून घ्यावा लागला.
भुजबळांनी आक्रमक भाषण करत शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. येवल्यातील सभेचा संदर्भ देत त्यांनी शिवसेना, काॅंग्रेस आणि मग राष्ट्रवादीत केलेला प्रवास हा सगळा इतिहास उलगडून सांगितला. आपल्यावरही पवारांकडून कसा अन्याय केला गेला हे सांगतांना भुजबळांच्या शब्दाला वेगळीच धार आली होती.
अजित पवारांनी भाषणाच्या शेवटच्या दहा मिनिटात धनंजय मुंडे यांचे गुणगाण करत त्यांच्या समर्थकांना खूष करण्याचा प्रयत्न केला. पण भाषण ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या लोकांनी त्यावर टाळ्याही वाजवल्या नाही. बीडकरांनो काळजी करू नका, तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन देत अजित पवारांनी आपलेले लाबंलेले भाषण संपवले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.