MLA Amarnath Rajurkar-Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavhan: अशोक चव्हाणांसोबत आले... अवघ्या 2 वर्षांत झाले पक्के भाजपवासी : अमरनाथ राजूरकर यांचा शपथविधीवेळी हिंदुत्ववादी अवतार

Amarnath Rajurkar, Ashok Chavan, BJP: अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमरनाथ राजूरकर यांनी तिसऱ्यांदा विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथविधीवेळी दिलेल्या घोषणांमुळे त्यांच्या भाजपमधील वाढत्या प्रभावाची चर्चा रंगली.

Jagdish Pansare

Amarnath Rajurkar: माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची सावली म्हणून ओळखले जाणारे नवनिर्वाचित आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आज विधान परिषद सदस्य म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून हॅट्रीक साधणारे राजूरकर हे अशोक चव्हाण यांचा उजवा हात म्हणून परिचित आहेत. अशोक चव्हाण आणि राजूरकर यांची राजकीय मैत्री ही गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून कायम आहे. जिथे चव्हाण तिथे राजूरकर हे चित्र जिल्ह्याच्या राजकारणात कायम पहायला मिळाले.

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना कधीही त्यांनी धार्मिक बाबींना फारसे स्थान दिले नाही. उलट भाजपाकडून जेव्हा अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हा नांदेडमध्ये काँग्रेसने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलेले पोस्टर वाॅर अजूनही चर्चेत आहे. 'राम देव्हाऱ्यात असावा', प्रभू श्रीरामाचा फोटो असलेल्या बॅनरवर 'रघुपति राघव राजाराम, पतित पावन सिताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान' या महात्मा गांधींच्या भजनाच्या ओळींची तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती.

भाजप राम मंदिराचे राजकारण करत आहे, पण राम खरा देव्हाऱ्यात,आचरणात असावा. आम्ही कालही राम राम करत होतो, आजही करतो. राम आचरणात असावा, असा अप्रत्यक्ष टोला या बॅनरबाजीतून अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला होता. आज योगायोग असा की तेच अशोक चव्हाण भाजपामध्ये आहेत आणि राम मंदिरासह भाजपाच्या प्रत्येक ध्येय, धोरण आणि विचारसरणीचे कौतुक करताना थकत नाहीयेत. या सगळ्याची उजळणी करण्याचे कारण म्हणजे विधान परिषदेचा सदस्य म्हणून अमर राजूरकर यांनी आज शपथ घेताना चक्क 'जय श्रीराम आणि जय भाजपा' अशा घोषणा दिल्या.

अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपामध्ये दोन वर्षापुर्वी दाखल झालेल्या अमरनाथ राजूरकर यांचा हा हिंदूत्ववादी अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ अमर राजूरकर हे देखील भाजपामध्ये आले होते. नांदेडमधील अशोक चव्हाण यांची सगळी यंत्रणा अमर राजूरकर हे हलवतात. श्रीजया चव्हाण यांच्या भोकर विधानसभा निवडणुकीतील विजयातही राजूरकर यांची महत्वाची भूमिका होती. अमर राजूरकर यांच्याशिवाय अशोक चव्हाण यांचे पानही हलत नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

कशी जमली जोडी?

अशोक चव्हाण-अमर राजूरकर यांची राजकीय मैत्री गेल्या ३० ते ३५ वर्षांपासूनची आहे. १९९० ते २००० च्या दशकात अमरनाथ राजूरकर हे नांदेड काँग्रेसमधील जुने कार्यकर्ते होते. अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आणि नांदेडचे सर्वात मोठे काँग्रेस नेते म्हणून उदयास आले तेव्हापासून राजुरकर त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये होते. राजूरकर हे चव्हाणांचे खंदे समर्थक आणि मतदारसंघ सांभाळणारे प्रमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. २०२२ पर्यंत राजूरकर काँग्रेसतर्फे विधान परिषदेवर आमदार होते. अशोक चव्हाणांच्या छत्राखालीच त्यांची राजकीय वाढ झाली.

नांदेडच्या राजकारणात चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व होते. राजूरकर हे त्या वर्चस्वाचे कणा होते. मतदारसंघ सांभाळणे, कार्यकर्ते जोडणे, निवडणुका लढवणे, या कामात ते चव्हाणांचे 'सावली' म्हणून वावरायचे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपात गेले, त्यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली. त्यानंतर काही दिवसातच अमर राजूरकर यांनी काँग्रेसमधील आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. राजूरकर भाजपमध्ये आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसप्रमाणेच त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नांदेड महानगर प्रमुख केले. एवढेच नाही तर विधान परिषदेची उमेदवारी मिळवून देत त्यांना पुन्हा आमदार करत सभागृहात आणले. चव्हाणांसाठी राजूरकर हे नांदेडमध्ये भाजपचा पाया रचणारे विश्वासू सहकारी ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT