Amarsinha Pandit : Ncp News : Sharad Pawar
Amarsinha Pandit : Ncp News : Sharad Pawar sarkarnama
मराठवाडा

Amarsinha Pandit News: अमरसिंह पंडितांची वाटचाल लोकसभेच्या दिशेने!

Dattatrya Deshmukh

Beed News : राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित (Amarsinha Pandit) गेवराई मतदार संघात सर्वाधिक वेळ देत असले तरी निमित्त साधून कधी अंबाजोगाई, कधी आष्टी, पाटोदा असा त्यांचा जिल्हाभरातील वावर वाढल्याने त्यांची वाटचाल लोकसभा निवडणुक मैदानाच्या दिशेने असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.

मागच्या २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीच्या स्पर्धेत सर्वात पुढे नाव असलेल्या अमरसिंह पंडित यांची उमेदवारी ऐनवेळी डावलली गेली. तत्कालिन जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना पक्षाने भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. ‘शेतकरी पुत्र’ म्हणून सोनवणे वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले. मात्र, मतांच्या विशिष्ट पल्ल्याच्या पुढे त्यांना मजल मारता आली नाही. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु व्हायला साधारण वर्षभराचा कालावधी आहे. मात्र, प्रमुख पक्षांकडून आतापासूनच त्या दृष्टीने तयारींना वेग आला आहे.

जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने नंतर लोकसभेच्या सहा निवडणुका झाल्या. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. उर्वरित पाच निवडणुकांपैकी केवळ एकदा पक्षाला विजय मिळविता आला.

दरम्यान, मागच्या निवडणुकीतील पराभवानंतर बजरंग सोनवणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. परंतु, या माध्यमातून जिल्हाभर संपर्कात राहण्याऐवजी सोनवणे पुन्हा केजच्या आखाड्यात परतले. दरम्यान, अलिकडच्या काळातील अमरसिंह पंडित यांची वाटचाल पाहता त्यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरु असल्याचे, जाणकरांचे मत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकारणाबरोबरच शेतीबाबतचा अभ्यास आणि शेतकऱ्यांबाबतचा कळवळा सर्वश्रुत आहे. आमदार अमरसिंह पंडित देखील नेहमीच मराठवाड्यातील शेती व सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही असतात. बीडला आल्यानंतर शरद पवारांचा राबता पंडितांच्या ‘शिवछत्र’वरच असतो. पंडित घराण्याला ५० वर्षांचा राजकीय इतिहास आहे. त्यांचे वडिल शिवाजीराव पंडित गेवराईचे आमदार व राज्याचे मंत्री होते. तर, खुद्द पंडित देखील गेवराईचे आमदार व दोनवेळा विधान परिषद सदस्य राहीलेले आहेत. त्यांचे धाकटे बंधू विजयसिंह पंडित जिल्हा परिषद अध्यक्ष राहीलेले आहेत.

जयभवानी सहकारी साखर कारखाना, गेवराई बाजार समिती, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या त्यांच्या अखत्यारितील संख्या त्यांच्या राजकीय जमेच्या बाजू आहेत. सध्या अमरसिंह पंडित मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. या संस्थेचे जिल्हाभरातील जाळे व त्यांच्या संस्थांचे जाळे यामुळे निवडणुकीत यंत्रणा राबविणे पंडित यांना सोपे जाईल, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. फर्डे वक्ते असलेले अमरसिंह पंडित अभ्यासू नेते देखील मानले जातात. त्यांच्या समर्थकांकडून सध्या सोशल मिडीयावर ‘बीड लोकसभा’ असे पेज देखील तयार करण्यात आले आहेत.

मागच्या वेळी ऐनवेळी उमेदवारीतून अमरसिंह पंडित यांचे नाव कटले असले तरी यावेळी उमेदवारीसाठी पक्षात तेच सरस असल्याचा दावाही समर्थक करत आहेत. घोडा मैदान लांब असले तरी त्यांच्या समर्थकांच्या पोस्ट आणि श्री. पंडित यांच्याकडून जिल्हाभरात निमित्त साधून कार्यक्रमांची हजेरी पाहता त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानाकडे वाटचाल असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT