Ambadas Danve-Haribhau Bagde Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Leader Ambadas Danve : बागडे नाना साधा, सरळ माणूस ; राज्यपाल पदाला निपक्षपणे न्याय देतील..

Jagdish Pansare

Shivsena UBT News : देशात राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जनसामान्यांच्या मनात फारशी चांगली नाही. पण हरिभाऊ बागडे नाना याला अपवाद ठरतील. नाना खुप सरळ साधा माणूस आहे, आम्ही सगळेच त्यांचा आदर करतो. ते निश्चितच राज्यपाल पदाला न्याय देतील आणि निपक्षपणे कारभार करतील, अशा शब्दात शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सत्ताधारी-विरोधक अशा सगळ्यांनीच हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी बागडेंना शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजपचे जेष्ठ नेते, आमदार हरीभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. नाना खुप सरळ - साधा माणूस, संभाजीनगर नव्हे महाराष्ट्रात आम्ही सर्वजण त्यांच्याकडे खूप आदराने बघतो. राज्यपाल पद म्हंटले की अलिकडे या पदाची गरीमा खूप ढासळली आहे, अशी जनमानसात भावना आहे.

पण नाना या सर्व गोष्टीला अपवाद ठरणार आणि या पदाला निपक्षपणे न्याय देतील, असा मला विश्वास आहे. पुनश्यच या पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल नानांना शुभेच्छा, अशा शब्दात दानवे यांनी बागडे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. शिवसेनेत येण्यापुर्वी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बरीच वर्ष भाजपमध्ये हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते.

तरुण, धडाडीचा कार्यकर्ता म्हणून बागडे यांनी भाजपमध्ये नेहमीच अंबादास दानवे यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले होते. पण काही कारणामुळे अंबादास दानवे यांना पक्षातून काढण्यात आले. तेव्हा बागडे यांनी या कारवाईला विरोधही केला होता, पण एका तत्कालीन बीड जिल्ह्यातील नेत्यामुळे अंबादास दानवे यांना भाजपमधून बाहेर जावे लागले होते.

हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली होती. अंबादास दानवे याला भाजपमधून काढू नका, अशी मागणी आपण नेत्यांकडे केली होती, पण त्यांनी ऐकले नाही, असे बागडे यांनी संबंधित नेत्याचे नाव न घेता सांगितले होते. आज आपल्या जुन्या पक्षातील ज्येष्ठ नेता, मार्गदर्शक एका राज्याच्या मोठ्या पदावर गेल्यानंतर अंबादास दानवे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत हरिभाऊ बागडे यांना शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT