अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर आरोप केला की शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज हे केवळ दिखावा आहे.
त्यांनी म्हटले की “तीन जादूगर” महायुतीतील नेते हातचलाखी करून शेतकऱ्यांना फसवत आहेत.
दानवे यांच्या मते, या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या पदरात एक कवडीही पडणार नाही.
Shivsena Protest For Affected Farmers : हेक्टरी पन्नास हजार रुपये, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व इतर मागण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी,तहसिल कार्यालयांसमोर निदर्शने केली. महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठे मदत पॅकेज दिल्याचा दावा महायुतीचे सरकार करत आहे. मात्र हे महायुती सरकारने केलेले जादूचे प्रयोग आहेत, सत्तेतील तीन जादूगारांनी केलेल्या हातचालाखीमुळे शेतकऱ्यांच्या पदरात कवडीची मदत मिळणार नाही, अशी टीका शिवसेना नेते अंबादास दानेव यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुती सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे पोस्टमार्टमच केले. विम्याचे पाच हजार रुपये जाहीर केले, हे कंपन्यांनी ठरवायचे पैसे सरकारने कसे ठरवले? मदत सरसकट करण्याचे आश्वासन होते, मग ही मदत देताना 'निवडक'पणा का? मदत पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरची व्हावी, अशी मागणी असताना, या वाटण्याचा अक्षदा देऊन शेतकऱ्याला का फसवत आहात? आचारसंहितेत ही मदत अडकणार नाही, याची शाश्वती काय? असे अनेक प्रश्न दानवे यांनी उपस्थितीत केले.
महायुती (Mahayuti) सरकारने सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांची संपूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. या मदतीमध्ये प्रामुख्याने यापूर्वी दिलेले 2 हजार 200 कोटी रुपये, पिक विम्याचे 5 हजार कोटी रुपये, पिक नुकसानीचे एनडीआरएफ निकषाप्रमाणे 6 हजार 175 कोटी रुपये, पिक नुकसान राज्य सरकारची मदत 6 हजार 500 कोटी रुपये, पायाभूत सुविधा 10 हजार कोटी रुपये आणि जीवित व वित्तहानी 1753 कोटी रुपये असे एकूण 31 हजार 628 कोटी रुपये होतात.
यापूर्वी जाहीर केलेली मदत सदरील पॅकेज मध्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता नव्हती. विमा विषयी राज्य सरकारने हमी दिली असली तरीही विमा कधी मिळेल याची शाश्वता नाही. विमा कंपन्यांच्या कारभाराची पार्श्वभूमी बघता सदरील विमा मिळणे अशक्यच असल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी म्हणाले. पिक विम्याची रक्कम फक्त 45 लाख शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा धारकांनाच मिळणार आहे. राज्य सरकारकडे किती शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे याची माहिती राज्य सरकारकडे नाही.
एनडीआरएफ निकषाप्रमाणे 6 हजार 175 कोटी रुपये राज्य सरकार देत असले तरीही यामध्ये सरकारचे मोठे कर्तृत्व नाही. पायाभूत सुविधांसाठी घोषित केलेल्या 10 हजार कोटीचा कसलाही थेट फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचा दावाही अंबादास दानवे यांनी केला. जीवित व वित्तहानीसाठी 1753 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. रब्बी हंगामासाठी 6 हजार 500 कोटी रुपये घोषित केली हीच एकवेम महत्वपूर्ण घोषणा असल्याचे दानवे म्हणाले.
एकूण राज्यातील 68 लाख पेक्षा अधिक हेक्टर जमीनीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी फक्त 6 हजार 500 कोटी रुपयांची मदत खूप अल्प आहे. या सर्व पॅकेजचे गुणोत्तर केले तर अत्यंत कमी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक राज्य सरकारने केली असल्याचा आरोप अंबादास यांनी केला. पिक विम्याची मदत कधी मिळेल याची माहिती नाही. जनावरांसाठी 37 हजार रुपये घोषित केले असले तरीही एवढ्या कमी रकमेमध्ये कोणतीही गाय व म्हैस येणार नाही. वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे करता येणार नसल्याने शेतकऱ्याकडील किंवा इतर शासकीय कार्यालयात जनावरांची नोंद ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.
31 हजार कोटीच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांमध्ये खोटा नरेटीव्ह पसरवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शेतकऱ्यांची मूळ मागणी हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे. पुरात वाहून गेलेल्या घरांची, जनावरांची व दुकानांची आर्थिक भरपाई मुबलक प्रमाणात मिळावी ही आहे. सदरील मागण्या मान्य केल्या तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे दानवे म्हणाले.
1.अंबादास दानवे यांनी महायुतीवर काय आरोप केला आहे?
दानवे यांनी आरोप केला की महायुती सरकारचे शेतकरी पॅकेज हे फसवे असून शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होणार नाही.
2. “तीन जादूगर” हा उल्लेख कोणासाठी केला आहे?
हा उल्लेख महायुतीतील तीन प्रमुख नेत्यांसाठी (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री) केला गेला आहे, असे दानवे यांनी सूचित केले.
3. या पॅकेजवर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे?
शेतकरी वर्ग या पॅकेजबाबत नाराज असून त्यांना प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याची भावना व्यक्त करत आहेत.
4. महायुती सरकारकडून यावर काय उत्तर आले आहे?
अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण सरकारचे म्हणणे आहे की पॅकेज शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे.
5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या टीकेमुळे उद्धव ठाकरे गट आणि महायुती सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.