Ambadas Danve addressing media while alleging a ₹1150 crore Hibanama land scam linked to Samruddhi Mahamarg compensation in Chhatrapati Sambhajinagar. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : अंबादास दानवेंनी बाहेर काढला आणखी एक घोटाळा; 'हिबानामा'च्या आधारे 1150 कोटींची जमीन घशात घालण्याचा डाव!

Hibanama Land Scam : अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गाशी संबंधित हिबानाम्यावरून सुमारे 1150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली असून महसूल विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या कारचा चालक जावेद शेख याच्या नावे हैद्राबादमधील 'सलारजंग नवाब' यांची साडेआठ एकर जमीन हिबानाम्याद्वारे बक्षीस देण्यात आल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. भुमरे-पिता पुत्रांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले होते.

त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आणखी एक 'हिबानामा' आणि त्याआधारे साडे अकराशे कोटी रुपयांची जमीन घशात घालण्याचा नवा डाव आणि घोटाळा समोर आणला आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर पत्र लिहित या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधत हा नवा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. समृद्धी महामार्गाच्या नावाखाली हा 'लुटालुटीचा' महामार्ग आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. ​सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. मी पुराव्यासह या 'अद्भूत' घोटाळ्याचे वाभाडे काढले आहेत.

घोटाळ्याचा 'चमत्कार' बघा : 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे 1971 मध्येच 23 एकर जमीन 'बक्षीस' म्हणून मिळते? हा निव्वळ भ्रष्टाचार नाही, तर जादूचा प्रकार वाटतोय! 3 एकर जमिनीच्या बदल्यात 23 एकरचा मोबदला लाटण्याचे कारस्थान रचले गेले आहे. ​मृतांच्या आत्म्यालाही न सोडता त्यांच्या नावावर कागदपत्रांची फेरफार सुरू असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

सर्वात धक्कादायक म्हणजे या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. ​आमचा सवाल हा चालक केवळ प्यादा आहे की यामागे एखादा मोठा 'वजीर' दडलाय? या प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी झालीच पाहिजे आणि दरोडेखोरांना तुरुंगात धाडले पाहिजे, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गातील बाधित जमिनीचा मोबदला चुकीच्या पद्धतीने देण्याचा होत असलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर पत्र लिहित या घोटाळ्याची माहिती दिली आहे. या पत्रानुसार लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पंजोबा पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात मौजे जटवाडा- जोगवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची जमीन तीन एकर तीन गुंठे शेतजमीन हैदराबाद संस्थान छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 1957 पासून प्रमाणपत्र देऊन बहाल केली आहे.

पावण्या भिका वाघमारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने सदरहू जमीन कित्येक वर्ष नापीक, पडीत राहिली आणि ती संभाजीनगर तहसील मंडळ यांनी 1917 मध्ये महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करून दिली. ही जमीन त्यांच्या मूळ मालकाच्या कुळ वारसदारांना हैदराबाद कुळ कायद्याच्या 1950 च्या कलम 38 अन्वये नूसार रुपये 1150 फक्त इतके अनुज्ञ आहे. यासंबंधी सहाय्यक आयुक्त महसूल छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 23 जुलै 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सविस्तर चौकशी करून उत्तर देण्यास कळविले होते.

त्यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांना असे कळवले आहे की, श्रीमती लता सूर्यभान वाघमारे राहणार जटवाडा तालुका छत्रपती संभाजीनगर यांनी या कार्यालयास दाखल केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे मयत पावण्या भिका वाघमारे खापर पंजोबा राहणार मौजे जटवाडा- जोगवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतजमीन गट नंबर 174 मध्ये 23 एकर 303 गुंठे यांचे नावे व हक्कात प्रतिबंधित मालक म्हणून हैदराबाद कुळ कायदा 1950 च्या कलम 38 च्या आधारे जारी केलेल्या सरकारी ऐलानच्या मुद्द्यावर जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थांमार्फत 1971 छत्रपती संभाजीनगर येथे हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याने शेत जमीन बहाल केली आहे. त्या जमिनीचे आज रोजी बाजारमूल्य दीडशे कोटी सरकारी दप्तरी नोंद झालेली आहे.

याबाबतीत असे नमूद करण्यात येते आहे की, जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार 1985 चा आहे. यासाठी सोबत आधार कार्डचा पुरावा जोडला आहे. हा इसम सत्तारूढ पक्षाच्या एका संसद सदस्याचा वाहन चालक आहे. तरी याचा जन्म 1985 मध्ये झाला असेल तर 1971 येथे हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याचे शेतजमीन बहाल झाली कशी? हा प्रश्न माझ्या मनात आहे. शासनाचे कोट्यावधी रुपये गैर मार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत असताना जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे? याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

सदर बाबतीत प्रचंड अनियमितता शासनाचे आजच्या बाजारभावाने सुमारे 1150 कोटी रुपये हडप करण्याचा हा प्रयत्न आहे. सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी, शासनास अशा पद्धतीने फसविणाऱ्या व संबंधित अधिकारी व हिबानामा करणारी व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. याआधी सुद्धा संभाजीनगरत याच व्यक्तीने काल्डा कॉर्नर येथील जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीने केल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणतीही कारवाई केलेली नाही, याकडे मी आपले लक्ष वेधतो असेही अंबादास दानवे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT