Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा आता एकच नेता? शिवसंकल्प मोहिमेपासून चंद्रकांत खैरे हात राखून

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या लोकसभेत मराठवाड्यात सर्वत्र महाविकास आघाडीला यश मिळाले. अपवाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ ठरला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यापेक्षा येथे मराठा उमेदवार महत्वाचा ठरला आणि महायुतीने विजय मिळवला. या शिवाय ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. पण या पराभवातून ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी काही धडा घेतला असे दिसत नाही.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी निवड केल्यानंतर जिल्ह्यात आता दोन नेते झाले आहेत. आधीच चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यातून विस्तव जात नाही. त्यात दानवे यांना नेतेपदी बढती देत ठाकरे यांनी झुकते माप दिल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांनी माझे काम केले नाही, असा थेट आरोप केला होता.

लोकसभेला पराभव झाल्यानंतर संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास खैरे इच्छुक आहेत. मात्र त्यांचा हा मार्गही अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी पक्षात प्रवेश देऊन बंद केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणातून या प्रवेशाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एकूणच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेत दोन नेते असले तरी दोघांची तोंड विरुद्ध दिशेला असल्याचे पुन्हा दिसून येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे Ambadas Danve यांनी जिल्ह्यात शिवसंकल्प मोहीम 2024 सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढविसानिमित्त आठवडाभर ही मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या मोहिमेपासून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व त्यांचे समर्थक लांब असल्याचे चित्र आहे.

अंबादास दानवे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघातून या मोहिमेला सुरुवात करत बैठकांचा धडका लावला आहे. पैठण, कन्नड, गंगापूर, फुलंब्री तालुक्यात शिवसंकल्प मोहिमेच्या बैठका पार पडल्या. मात्र यापैकी एकाही बैठकीत चंद्रकांत खैरे किंवा त्यांचे समर्थक दिसले नाही. त्यामुळे शिवसंकल्प मोहिम एकट्या अंबादास दानवे यांची आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नव्याने पक्षात आलेले शिंदे गायब..

शिवसेना ठाकरे गटात दाखल झालेले राजू शिंदे हे देखील शिवसंकल्प मोहिमेपासून दूरच असल्याचे चित्र आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्या दोन दिवस राजू शिंदे यांनी शहरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी व इतरांच्या भेटीगाठी घेत आपण कामाला लागल्याचे चित्र निर्माण केले होते. पण त्यानंतर पक्षाच्या कुठल्याही बैठक किंवा आंदोलनात शिंदे दिसले नाही.

काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात लष्कराचे जवान शहीद झाले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील क्रांतीचौक येथे निदर्शने करण्यात आली होती. तिथेही चंद्रकांत खैरे, राजू शिंदे व त्यांचे समर्थक दिसले नाही. किशनचंद तनवाणी हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत.

गेल्या आठवड्यात मंत्री अतुल सावे Atul Save यांच्यासोबत एका खासगी कार्यक्रमात ते दिसले होते. पक्षाच्या कार्यक्रमात मात्र अजूनही ते सहभागी होताना दिसत नाहीत. एकूणच शिवसेना ठाकरे गटाची जिल्ह्यातील सगळी सूत्रे अंबादास दानवे यांच्या हाती गेल्याचे चित्र आहे. त्यामुळेच खैरे व त्यांचे समर्थक दानवे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमापासून अंतर राखून असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील नेत्यांमधील ही बेदिली पक्षाला परवडणारी नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT