Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने भरती महाराष्ट्रासाठी धोकादायक..

सरकारनामा ब्युरो

Monsoon Session : महाराष्ट्राचे पोलिस दल हे देशात कर्तबगार म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. अशा महत्वाच्या आणि राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा घाट घातला जातोय. (Ambadas Danve News) हा प्रकार अंत्यत चुकीचा आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा, असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला.

उद्या भरती केलेल्या कंत्राटी पोलिसांनी सरकारचे आदेश मानण्यास नकार दिला, तर काय होईल? याचा विचार करा, असे आवाहन करत दानवे यांनी या खाजगी कंपनीकडून पोलिसांच्या होणाऱ्या भरतीला कडाडून विरोध दर्शवला. (Shivsena) मुंबई पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस (Police) भरती करण्याचे धोरण राज्य सरकारने मंजूर केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तीन हजार पोलीसांची पदे अकरा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

शिपाई ते सहाय्यक निरीक्षक अशी ४० हजार ६२३ पदे मंजूर झाली आहेत. सदरील कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करणे गंभीर व धोकादायक ठरू शकते असे सांगतानाच दानवे यांनी थेट रशियातील उदाहरण दिले. (Monsoon Session) नुकतीच एक घटना अशा पद्धतीने रशियामध्ये घडली आहे. येथे वॅगनार नावाचा ग्रुप स्थापन झाला होता. रशियाच्या सरकारने या वॅगनार ग्रुपला प्रीगोझीन नावाच्या ईसामाच्या नेतृत्वाखाली खाजगी सैन्य निर्माण करण्याचे अधिकार दिले होते, त्याचे परिणाम आपल्या सर्वांच्या समोर आलेलेच आहेत.

पोलिस खाते हे सरकारच्या अधिकाराखालीच असायला हवे. अशा पद्धतीने कोणतीही खाजगी संस्था पोलिसांचे नेतृत्व करणारी नसावी, म्हणून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याच्या सरकारच्या योजनेला माझा विरोध आहे. सरकारच्या इतर शासकीय विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती केली जाऊ शकते. परंतु पोलीस प्रशासनात ही व्यवस्था नको. उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि या पोलिसांनी सरकारचे आदेश मानण्यास नकार दिला तर यामुळे अतिशय धोकादायक व गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे खाजगी पद्धतीने पोलीस भरती होऊ नये, अशी माझी मागणी असल्याचे दानवे म्हणाले.

तीन हजार पोलिसांची कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यांसाठी भरती करण्यात येणार आहे. हा निर्णय कशासाठी आणि कुणासाठी घेतला जात आहे? असा प्रश्न याच विषयावरील चर्चेत सहभाग घेतांना भाई जगताप यांनी उपस्थितीत केला. खाकी वर्दीचा एक धाक आहे, तो अशा कंत्राटी पद्धतीने केवळ अकरा महिन्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची भरती झाली तर राहणार नाही. सरकारच काॅन्ट्रॅक्टरच्या भूमिकेत आहे, हे राज्याच्या, मुंबईच्या आणि आमच्या महिला, मुलींच्या दृष्टीने धोकादायक आहे. पैसे घेवून पोलिस दलात बदल्या केल्या जातात, कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांची कंत्राटी भरती कुठल्याही परिस्थितीत केली जावू नये, असेही जगताप म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT