Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : पंचवीस वर्ष शिवसेना-भाजप युतीची सत्ता असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली. 57 नगरसेवक निवडून आणत भाजपाने महापौर पद पटकावले. स्थायी समिती सभापती व इतर महत्त्वाची पदं आपल्याकडे राखली. नवे महापौर समीर राजूरकर यांच्या नेतृ्त्वाखाली भाजपाच्या महापालिकेतील कारभाराला शंभरी पूर्ण झाली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या या शंभर दिवसांच्या कारभाराचे वाभाडे विरोधक असलेल्या शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने काढले आहे. आमदार अंबादास दानवे यांनी या शंभर दिवसाच्या कारभाराचे वर्णन करताना घोषणांचा सुकाळ अन् कामाचा दुष्काळ असे केले आहे. घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही.
हेरिटेज वॉक आपण सुरू केल्याचा सपशेल खोटा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. तो खोडून काढताना महापालिकेने स्वतः 'हेरिटेज वॉक' सुरू केल्याचे सांगीतले जाते, मात्र हे वॉक सुमारे दहा वर्षांपासून शहरात सुरू आहेत. महापालिका त्यात जाऊन बसली एवढंच, असा टोला दानवे यांनी लगावला.
शहरातील नागरीक हे पाणीप्रश्न आणि टँकरच्या विळख्यात सापडले आहेत. पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही नागरिकांना हक्काचे पाणी मिळेना. 5-6 दिवसांऐवजी आता थेट महिन्यातून अवघे 3 (120 मिनिटे सरासरी) वेळा पाणी मिळत असल्याने संपूर्ण शहर पाण्यासाठी वणवण भटकत आहे.
नागरीकांच्या आरोग्याशी क्रूर खेळ सुरू असल्याचा दावा करताना पडेगाव कचरा डेपोला लागलेली आग आणि धुराच्या विळख्यामुळे परिसरातील नागरिकांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असा आरोप दानवे यांनी केला. लोकांना आपली घरे विकण्याची वेळ आली आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि निष्क्रीय महापौर सुस्त बसून आहेत.
पावसाळा दारावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडलेलीच आहेत. आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. सामान्यांचे मरण, पदाधिकाऱ्यांची चंगळ अशी सगळी परिस्थिती आहे. सर्वसामान्य छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे पारंपरिक रविवार, शुक्रवार आणि पीर बाजार बंद करण्याचा निर्णय केवळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी घेण्यात आला आहे.
एकीकडे मनपा 1200 कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली असताना, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या चैनीसाठी आलिशान ई-कार खरेदीचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी आहे! केवळ 'सिटी ट्रान्सफॉर्मेशन' आणि '2047 चे व्हिजन' अशा कागदी आणि चकचकीत घोषणा करून शहराचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचा हा 100 दिवसांचा कार्यकाळ शहराला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.