Sugar Factory News : साखर कारखान्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतकर्यांच्या शेतात सोडणे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या ट्वेन्टीवन शुगरला चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेत या कारखान्याला 1 कोटी 13 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लोहा येथील प्रा. मनोहर धोंडे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. 30 एप्रिल 2025 रोजी लवादाने निकाल देत कारखान्याला दणका दिला.
लातूर आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Dehsmukh) आणि त्यांचा परिवाराने मांजरा आणि इतर साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकाराचे मोठे जाळे निर्माण केले आहे. राज्यात सहकार क्षेत्रातील योगदानासाठी लातूरचे देशमुख कुटुंब ओळखले जाते. परंतु नादेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या शिवणी जामगा येथे असलेल्या ट्वेन्टीवन शुगर इंडस्ट्रीजच्या युनिट तीनमधून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतकर्यांच्या शेतात सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला होता.
याबद्दल शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या, परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, असे सांगितले जाते. (Nanded) सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करत साखर कारखान्यातील राख आणि दूषित पाण्यामुळे शेतकर्यांच्या जमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर सुनावणी झाल्यानंतर 30 एप्रिल रोजी लवादाने निकाल देताना कारखान्याला 1 कोटी 13 लाख 14 हजार रुपयाचा दंड ठोठावला.
शिवणी जामगा येथे ट्वेन्टीवन शुगर फॅक्टरी युनिट नंबर तीन आहे. कारखाना सुरू असताना त्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्याचा आरोप आहे. या दूषित पाणी व राखेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय काही जनावरे दगावली होती. त्यानंतर शेतकर्यांनी कारखाना प्रशासना विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार व उपोषणही केले होते. एवढेच नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदनही दिले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
अखेर प्रा. मनोहर धोंडे यांच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांनी 1 एप्रिल 2023 मध्ये हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. दोन आठवड्यापुर्वी 30 एप्रिल रोजी या प्रकरणाचा निकाल लागला आणि यात हरित लवादाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत अमित देशमुख यांच्या मालकीच्या कारखान्याला पाणी आणि हवेचे प्रदूषण केल्याबद्दल 1 कोटी 13 लाख 40 हजार रुपये दंड ठोठावला.
या शिवाय 31 शेतकऱ्यांना 54 लाख 43 हजार 955 रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिला जाणार आहे. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या साखर कारखान्याची राख आणि पाण्याच्या प्रदूषणाची चाचणी केली असता, यामध्ये प्रदूषण आढळून आल्याचे याचिकाकर्ते मनोहर धोंडे यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.