Ambadas Danve- Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : अमित शहांचा तीस जागा जिंकण्याचा दावा, ठाकरे गटाचा नेता म्हणतो शक्यच नाही

Jagdish Pansare

Shivsena UBT-BJP Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठवाड्यात 46 पैकी 30 जागा महायुती जिंकेल, असा दावा त्यांनी केला. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला टोला लगावला आहे. मराठवाड्यात महायुतीला तीस हा आकडा गाठता येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांच्या मनोबलाला तासाभराच्या भाषणाचा कितीही मोठा टेकू दिला तरी हा आकडा महायुतीला गाठता येणार नाही. (Ambadas Danve) महाराष्ट्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा संबंध आपण देशातील अन्य आंदोलनांशी जोडलात आणि येथील आंदोलकांच्या मागण्यांना वाटण्याचा अक्षदा देण्याचा निर्णयच जणू जाहीर करून टाकलाय.

पण भाजपने हे ध्यानी ठेवावं की हा महाराष्ट्र आहे. इथे उत्तरेतील असली आक्रमणे खपवून घेतली जात नाहीत, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी अमित शहा यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शहा यांनी मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी संभाजीनगरात बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारे भाषण करत शहा यांनी मराठवाड्यात तीस जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठीची रणनिती, सल्ला, कानमंत्र देत भाजप कार्यकर्त्यांना बुस्ट दिला. (Amit Shah) शहा यांचे भाषण आणि गुप्त बैठकीचे पडसाद महाविकास आघाडीत उमटायला लागले आहेत. शिवसेना नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहा यांच्या तीस जागा जिंकण्याच्या दाव्यावर भाष्य केले.

महायुतीला मराठवाड्यात 30 जागांचा आकडा कदापी गाठता येणार नाही, असे सांगतानाच मराठवाडा आणि राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात शहा यांनी गुजरामधील पटेलांचे आंदोलन आपण कसे संपवले आणि विजय मिळवला हे सांगत या प्रश्नाला कशी बगल दिली ? याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. पण त्याचवेळी हा महाराष्ट्र आहे, याची आठवण करून देत शहा यांच्यावर टीका केली. दानवे यांच्या या पोस्टनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT