औरंगाबाद : शिवसेना ग्रामीण मधील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख तथा माजी समाज कल्याण सभापती राजेंद्र राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र त्रिवेदी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हे पद रिक्त होते. राजेंद्र राठोड हे गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेत असून जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती पद त्यांनी भूषवलेली आहेत. त्यांच्या पत्नी व मुलगी यादेखील जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत.
राजेंद्र राठोड हे सिल्लोड -सोयगाव मतदार संघात कार्यरत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांच्यावर आता सिल्लोड, पैठण व फुलंब्री मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या, अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली त्यापैकीच एक नरेंद्र त्रिवेदी.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र त्रिवेदी यांनी गेल्या महिन्यात आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदासाठी शिवसेनेत बरीच स्पर्धा होती परंतु राजेंद्र राठोड यांनी या स्पर्धेत बाजी मारत जिल्हाप्रमुख पटकावले. राठोड यांचा सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. याशिवाय जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती राहिल्यामुळे जिल्ह्यातील इतर भागात देखील ते संपर्क ठेवून आहेत.
राठोड यांच्या नियुक्तीने शिवसेनेला ग्रामीण मधील या तीनही मतदारसंघांवर आता अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. सिल्लोड, पैठण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे होते. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार तर पैठण मधून संदिपान भुमरे हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये या दोघांनाही मंत्रिपद देण्यात आले होते.
परंतु शिंदे बंडामध्ये सहभागी होत या दोघांनी गद्दारी केली. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्यासाठी राठोड यांना या दोन्ही मतदारसंघांमध्ये मजबूत संघटना बांधणी करावी लागणार आहे. राठोड यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.