Ashok Chavan, News, Aurangabad sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Constituency : हिंगोली मतदारसंघासाठी अशोक चव्हाण आग्रही; ठाकरे गट माघार घेणार...?

MahaVikas Aghadi News : हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी काँग्रेसने अशोक चव्हाणांवर सोपवली आहे.

Laxmikant Mule

Hingoli News : हिंगोलीच्या जागेवर ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांनी दावे केले आहेत, तर ही जागा आम्हीच लढविणार असल्याचे स्थानिक नेते ठामपणे सांगत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार व विजयाचे पेढे आम्हीच खाणार ,असा दावा केला होता. परंतु हिंगोलीची जागा आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेसनेही जोर लावला आहे.

याबदल्यात ठाकरे गटाला जालन्याची जागा देण्याची तयारी दर्शवल्याचीही माहिती आहे. मग अशावेळी ठाकरे गटाच्या दाव्याचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काँग्रेस हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही असून या मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भातील चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच काही मतदारसंघाची अदलाबदल केली जाणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्यातील आठ जागांपैकी धाराशिव व परभणी या दोन मतदारसंघांतील खासदार ठाकरे गटात आहेत, तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटाकडे. काँग्रेस (Congress ) व राष्ट्रवादीचा मराठवाड्यात एकही खासदार नाही. हिंगोलीच्या जागेवर ठाकरे गटाने आधीपासूनच दावा केला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आल्यामुळे ठाकरे गट या जागेवरचा दावा सोडणार नाही, अशीही चर्चा होती.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची व्होट बँक आहे. गेल्या निवडणुकीत खासदार हेमंत पाटील यांनी फारशी तयारी न करता खूप मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. या मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हादगाव व किनवट विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हादगाव, कळमनुरी, वसमत या मतदारसंघांवर शिवसेनेची चांगली पकड आहे.

तर काँग्रेसचे हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर काम आहे. ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली तर आमचा विजय निश्चित आहे, असा दावाही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत. याशिवाय मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे अलिकडच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतीत मतदारसंघात सहानुभूती आहे.

या जागेवर ठाकरेंच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना विजयाची खात्री असल्याने ठाकरे गटाचा दावा मजबूत समजला जातो. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात हिंगोली व जालना या दोन जागांची चर्चा आहे. हिंगोलीची जागा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेससाठी सोडवून त्यांचे समर्थक डॉ. अंकुश देवसरकर यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहेत. आता शिवसेना ठाकरे गट हिंगोलीची जागा काँग्रेससाठी सोडणार का? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT